Wednesday, October 15, 2025

सौ. वैशाली कोळी मॅडम यांच्या बदलीच्या निमित्ताने...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *सौ. वैशाली कोळी मॅडम यांच्या बदलीच्या निमित्ताने...*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*




आजचा दिवस जिल्हा परिषद शाळा बागणी नं. २ शाळेसाठी भावनिक ठरला. सहकारी शिक्षिका सौ. वैशाली कोळी मॅडम यांची बदली फाळकेवाडी येथे झाली. सन २०१८ पासून त्यांनी बागणी शाळेत निष्ठा, प्रेम आणि समर्पणाने काम केलं. शाळेला पुढे नेण्यात त्यांचा वाटा अत्यंत मोलाचा राहिला.

२०२० पासून मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात त्यांनी मला केवळ सहकार्यच नव्हे, तर एक दृढ पाठबळ दिलं. मी राबवलेल्या प्रत्येक उपक्रमांमध्ये त्यांनी मनापासून सहकार्य केलं. उन्हाळी वर्ग, मुलाखत — आधुनिक दुर्गांची किंवा माझा संवाद — माझ्या आईशी या संवेदनशील उपक्रमांच्या अंमलबजावणी दरम्यान त्या नेहमी माझ्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एका मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन आणि पाठराखण केली.

त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका, प्रेमळ, विश्वासू आणि सडेतोड. काही काळ त्यांनी शाळेचे आर्थिक व्यवहार अतिशय प्रामाणिकपणे सांभाळले आणि प्रत्येक कामात पारदर्शकता जपली.

त्या गावच्याच असल्यामुळे गावकऱ्यांशी त्यांचा संवाद अतिशय आत्मीयतेचा होता. याचा पट वाढीसाठी हातभार लागला. मॉडेल स्कूल उपक्रमात लोकसहभाग वाढवण्यात त्यांचा सहभाग नेहमीच महत्त्वाचा ठरला. त्यांच्या कार्यकाळातच शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक मिळवला. हे त्यांच्या परिश्रमाचं उत्तम फलित होतं.

आज शाळेत भावनिक वातावरण होतं. निरोप समारंभात त्यांना सन्मानित करताना अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. विद्यार्थिनींना त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम स्पष्ट जाणवलं.

माझ्या मनात मात्र एक वेगळी आठवण कायम राहील. त्यांचा इयत्ता चौथीचा वर्ग मी मागितल्यावर त्यांनी तो क्षणात माझ्याकडे दिला. अशा छोट्या पण मनाला भिडणाऱ्या कृतींनी त्यांनी सहकार्याचा खरा अर्थ सांगितला.

सौ. वैशाली कोळी मॅडम यांच्या प्रामाणिकतेचा, आत्मीयतेचा आणि कार्यतत्परतेचा सुगंध बागणी शाळेत सदैव दरवळत राहील. नव्या ठिकाणीही आपली हीच ऊर्जा, हसरा चेहरा आणि संवेदनशीलता कायम राहो. आपल्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

धन्यवाद…!

No comments: