Wednesday, October 1, 2025

मनात कोरलेला एक दिवस...

यशवंत - एक प्रेरणास्रोत

मनात कोरलेला एक दिवस...

श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.



आजचा दिवस मनात कायमचा कोरला गेला. सकाळीच माझे मित्र श्री. महेश पाटील सर यांचा फोन आला. आपल्याला बिळाशीला जायचं आहे. तेंव्हापासून मनात एकच विचार होता. गुरुवर्य श्री. बाबासाहेब परीट यांच्या घरी जाऊन सांत्वन करायचं. 


बाबासाहेब परीट हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. लेखक, ग्रामीण कथाकार आणि साहित्यिक अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे. "माझ्या गावचा धडा" या उपक्रमामुळे त्यांच्याशी स्नेह जुळला. सरांनी त्यांच्या लेखणीतून गावकुसाच्या आतल्या मातीचा गंध, साध्या माणसांचं आयुष्य आणि संस्कार वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवन फक्त शब्दरूपात नाही, तर जिवंत चित्रांसारखं उभं राहतं.


परीट सरांचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं कथाकथन. ते मंचावर उभे राहिले की सभागृहात एक वेगळं तेज निर्माण होतं. आवाजात ओज, भावनांमध्ये प्रामाणिकपणा आणि कथानक जगून दाखवण्याची ताकद यामुळे श्रोते क्षणात त्यांच्या कथांच्या जगात रमून जातात. कधी हसू, कधी अश्रू तर कधी विचारांची गंभीरता. या सगळ्या छटा त्यांच्या वाणीने श्रोत्यांपर्यंत पोहोचतात.


त्यांचं व्यक्तिमत्व साधं असूनही प्रभावी आहे. गावरान सुगंध असलेल्या त्यांच्या कथा ऐकताना आपल्याला आपल्या मातीशी, आपल्या लोकांशी आणि आपल्या संस्कारांशी पुन्हा एकदा जवळीक साधल्यासारखं वाटतं. 


शनिवारी सरांचा आधारवड हरपला. त्यांच्या वडिलांचे देहावसन झाले. तेंव्हापासून सरांना भेटण्याची हुरहुर मनाला लागली होती. 


माझे मित्र महेश पाटील सर यांचेसोबत बिळाशी गाठली. घरात प्रवेश करताना जाणवलं दुःखाचा काळ जितका खोल, तितकीच माणसांची एकमेकांतली साथ महत्वाची ठरते.


परीट सरांच्या डोळ्यांत अश्रू दडलेले होते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील ही अपरिहार्य पोकळी किती मोठी असते ? हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवलं. काही क्षण मी काहीच न बोलता फक्त शांत बसून राहिलो. शब्द कधीकधी थकतात. पण, उपस्थिती बरंच काही बोलते.


या गंभीर वातावरणात एक सुंदर योगायोग घडला. मराठी साहित्यविश्वाला "पानिपत"सारखे अमरकाव्य देणारे, आणि सातारा येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. विश्वास पाटील सर तेथे आले. हे नाव पुस्तकांतून, व्याख्यानांतून ऐकलेले. पण प्रत्यक्ष पाहण्याचा हा पहिलाच अनुभव. त्यांचा साधेपणा मनाला भिडला. डोळ्यांत ओलावा, आवाजात माणुसकीचा स्वर आणि व्यक्तिमत्वात एक वेगळं तेज. जणू साहित्य आणि जीवन एकत्र कसे जगायचे ? याचं उत्तर त्यांच्या उभं राहण्यातच मिळत होतं.


त्यांच्याशी थोडा संवाद साधताना मला जाणवलं की मोठेपण म्हणजे दुरून पाहावं असं काही नसतं. ते तर साध्या क्षणांमध्ये, साध्या शब्दांमध्ये आणि साध्या भेटीत जाणवतं. त्या क्षणी माझ्या मनात एक अनोखी ऊर्जा निर्माण झाली. दुःखाच्या छायेतही आशेचा दिवा पेटला.


आजचा अनुभव हा विरोधाभासांनी भरलेला होता. एकीकडे विरहाचा दु:खद प्रसंग, तर दुसरीकडे प्रेरणेचा उजेड.जीवन आपल्याला असे क्षण देतं जे आपल्या विचारांना नवीन दिशा देते. परीट सरांच्या घरातून बाहेर पडताना मनात वेगळंच भावविश्व उभं राहिलं होतं. "दुःख, संवेदना आणि प्रेरणा" या तिन्ही छटा अनुभवून आम्ही परतीचा प्रवास केला. जणू तो फक्त गावाकडे परतण्याचा नव्हता, तर अविस्मरणीय आठवणींनी समृद्ध झालेला अंतर्मनाचा प्रवास होता. हा क्षण आयुष्यभर सोबत राहणारा आहे.



धन्यवाद...!


No comments: