WWE हा Tensports या चॅनेलवरील कार्यक्रम बऱ्याच लोकांना आवडतो. माझा एक मित्र या खेळाचे वर्णन "मर्दांचा खेळ'' असं करतो. तेही योग्यच आहे म्हणा. त्यातील हाणामाऱ्या,उड्या पाहताना अंगावर रोमांच उभे राहतेच. WWE ही एक व्यावसायिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत अनेक पैलवानांनी आपले कर्तृत्व आणि कौशल्य सिद्ध केले आहे. भारतीय मल्ल ' दि ग्रेट खली ' यांना आपण ओळखतोच. एक मल्ल म्हणून WWE मध्ये, सहभागी होण्यासाठी, प्रसंगी शौचालय साफ करण्याचे काम करावे लागलेल्या, एका ध्येयवादी तरुण मल्लाचा प्रवास आजच्या भागात पाहणार आहोत...
आपल्या स्वप्नांचा पाठलाग करता करता घरातून पळून आलेला, एक तरुण कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर फिरत होता. जवळचे पैसे संपले होते. घरी परत जाण्याचे, त्याचे मार्ग केंव्हाच बंद झाले होते. आता त्याच्यासमोर एकच मार्ग शिल्लक राहिला होता. तो म्हणजे पडेल ते काम करायचा.
त्याच्या सुदैवाने त्याला एका जिम मध्ये काम मिळाले. काम होते शौचालय साफ करण्याचे. तरी सुद्धा तो तरुण आपल्या ध्येयापासून परावृत्त झाला नाही. हाच त्याच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉईंट ठरला. इथेच त्याला एक मित्राकडून "अल्टीमेट प्रो रेसलिंग युनिव्हर्सिटी" मध्ये ट्रेनिंग घेण्याचा सल्ला मिळाला. त्याला तो पटला. त्याने ट्रेनिंग ला सुरुवात केली. सन 2000 साली त्याने प्रो रेसलिंग ची पहिली स्पर्धा जिंकली.
पण,त्याचं स्वप्न अजून अपूर्णच होतं. ते पूर्ण करण्याची संधी त्याला सन 2003 मध्ये मिळाली. पण,पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आलं. तो नाराज झाला नाही. कसून सराव सुरू ठेवला. 2004 साली WWE स्पर्धेत तो पुन्हा एकदा सहभागी झाला. यावेळी मात्र त्यानं बिग शो सारख्या प्रसिद्ध आणि मातब्बर पैलवानाला हरवलं आणि WWE चा चॅम्पियन बनला आणि आपलं ध्येय साध्य केलं. त्याचं नाव प्रसिद्धीझोतात आलं. त्याने 16 वेळा WWE चा खिताब पटकावला. आपलं ध्येय साध्य करणारा तो चॅम्पियन म्हणजेच जॉन सीना.
यशस्वी माणसाची ओळख त्याच्या जेतेपदावर अवलंबून नसते तर,तो कठीण परिस्थितीला कशाप्रकारे सामोरा जातो ? यावर असते. जॉन सीना वर आलेल्या कठीण प्रसंगातून त्याला पळ काढता आला असता. पण,तो त्या प्रसंगाला धैर्याने सामोरा गेला. आपल्या स्वप्नांपासून परावृत्त झाला नाही. म्हणूनच तो एक यशवंत आहे.
यशस्वी होणं तसं खुप सोपं असतं. कठीण असतं ते फक्त टिकून राहणं. जी लोकं यशाच्या खडतर रस्त्यावर टिकून राहतात. ती यशस्वी होतातच. ध्येयप्राप्तीसाठी चिकाटी असणे. फार महत्त्वाचे असते. ती चिकाटी जॉन सीना च्या आत्तापर्यंतच्या प्रवासातून लक्षात येते.
No comments:
Post a Comment