🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 79*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
*आपल्या कॉलेज जीवनात डिस्को पार्टीमध्ये बारटेंडरचं काम करावे लागलेल्या, एका सामान्य कुटंबातील, मुट्टी या नावाने प्रसिद्ध असलेल्या जर्मनीतील एका महिलेचा, बारटेंडर ते चांसलर पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत...*
मुट्टी चा जन्म 17 जुलै 1954 रोजी पूर्व जर्मनीतील हॅम्बर्ग येथे एका सर्व सामान्य कुटुंबात झाला. तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे, तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या घरच्यांनी पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतर केले. तिचे वडील एक समाजवादी विचारसरणी असलेले पादरी आणि आई एका पक्षाची सदस्य होती. त्यामुळेच राजकारणाचे बाळकडू तिला बालवयातच मिळाले होते.
मुट्टी अभ्यासात प्रचंड हुशार. मुट्टीच्या घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्यामुळे शिक्षण घेत असताना, तिला डिस्को पार्टीमध्ये बारटेंडरचं काम करावं लागलं. ते तिने हसत हसत केलं. क्वांटम केमिस्ट्रीमध्ये तिने डॉक्टरेट मिळवली आणि ती एका इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करू लागली. याच कालावधीत तिचे लग्न देखील झाले. पण,ते फार काळ टिकलं नाही. चारच वर्षात तिचा घटस्फोट झाला. ती खंबीर असल्याने, डगमगली नाही. ती एकटी आपलं जीवन फलवू लागली.
1989 साली बर्लिन ची भिंत पडली गेली. 1990 सालच्या अनेक वाटाघाटींनंतर पूर्व व पश्चिम जर्मन नेत्यांनी एकत्र व्हायचे ठरवले. या सर्व परिस्थतीचा मुट्टीने अतिशय गंभीरपणे विचार केला आणि वयाच्या 35 व्या वर्षी स्वतःला राजकारणात झोकून देण्याचा निर्णय घेतला. तिने पश्चिम जर्मनीतील सर्वात मोठ्या आणि पुरुषप्रधान सत्ता असलेल्या क्रिश्चियन डेमोक्रॅट युनियन (CDU) या पक्षासोबत स्वतःला जोडून घेतलं आणि कामाला सुरुवात. 1990 साली ती संसद सदस्य बनली. पुढे मंत्रिमंडळात स्थान मिळाले. इथून पुढे तिच्या यशाची कमान चढतीच राहिली.
1999 साली मुट्टी चे राजकीय गुरु आणि तत्कालीन चांसलर हेल्मुट कोल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि पक्षातील कोणीही त्यांच्याविरोधात आवाज उठविला नाही. पण, मुट्टीनी त्यांच्या याविरोधात आवाज उठवला आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला. या प्रकरणानंतर मुट्टीची तुलना ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्याशी होऊ लागली. मुट्टी 2000 साली सीडीयू ची पहिली महिला अध्यक्ष बनली. 2005 साल, मुट्टीसाठी एक नवी संधी घेऊन आले. संधी होती जर्मनीच्या चांसलर पदाची. मुट्टी ने या संधीचं सोनं केलं. ती निवडणूक जिंकून जर्मनीची पहिली महिला चांसलर बनली. ती मुट्टी म्हणजेच अँगेला मर्केल होय.
मर्केल आपल्या जनतेची आईसारखी काळजी घेतात. म्हणूनच, त्यांचे समर्थक त्यांना मुट्टी म्हणतात. जर्मन भाषेत 'मुट्टी' चा अर्थ 'आई' असा होतो.
आपण सामान्य कुटुंबात जन्माला आलो आहोत, आपण महिला आहोत, आपण एकटे आहोत, या सारख्या विचारांना मर्केल यांनी खतपाणी घातले नाही. उलट आलेल्या प्रत्येक समस्येकडे, एक संधी म्हणून पाहिलं. त्यामुळेच, पुरुष प्रधान संस्कृतीच्या राजकीय पक्षात, महिलांना दुय्यम स्थान असतानाही, आपले स्थान भक्कम करत, स्वतःला सिद्ध करत, आपल्या विरोधकांचे आव्हान पेलत, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या जर्मनीच्या पहिल्या महिला चांसलर बनल्या.
जीवनात काही संधी मिळतात तर, काही निर्माण कराव्या लागतात. मर्केल यांना काही संधी मिळाल्या. त्यांनी त्याचे सोनं केलं आणि काही संधी त्यांनी स्वतः निर्माण केल्या आणि त्याही साधल्या. त्या सलग चारवेळा जर्मनीच्या चांसलर बनल्या आहेत. 2014 साली फोबर्स ने, त्यांना सर्वात शक्तिशाली महिला म्हणून आणि टाइम्स ने 2015 साली 'पर्सन ऑफ द ईयर' म्हणून गौरव केला आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.
2 comments:
छान...
खूप छान sir photo सहित yashvantanchi ओळख होत आहे ..ते फक्त तुमच्यामुळेच..
Post a Comment