Friday, July 25, 2025

माझ्या वर्गशिक्षिका – श्रीमती सुनिता अरुण जाधव बाई

 माझ्या वर्गशिक्षिका – श्रीमती सुनिता अरुण जाधव बाई

*१९९३ साली मी पहिल्यांदा शाळेचा उंबरठा ओलांडला. हातात पाटी, पेन्सिल आणि डोळ्यात अनामिक भीती. तेव्हा माझ्या आयुष्यात "शाळा" म्हणजे काय ? याची खऱ्या अर्थानं ओळख करून देणाऱ्या व्यक्ती होत्या, माझ्या वर्गशिक्षिका श्रीमती सुनिता अरुण जाधव बाई.*


जाधव बाईंचा जन्म १९ जुलै १९६७ रोजी, कलावती आणि प्राथमिक शिक्षक शिवराम माने गुरुजी यांच्या पोटी झाला. वडिलांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. १९७७ सालच्या निवडणुकीत ते उभे राहिले, पण दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं.


अशा खडतर परिस्थितीतही बाईंनी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी, १९८३ साली त्यांचा विवाह बावची येथील श्री. अरुण जाधव यांच्याशी झाला. सासऱ्यांचा आधार आणि स्वतःतील जिद्दी च्या जोरावर त्यांनी शिक्षण थांबू दिलं नाही. मुलगी लहान असतानाही त्यांनी डी.एड. पूर्ण केलं.


*९ जुलै १९९० हा त्यांचा स्वप्नपूर्तीचा दिवस. जिल्हा परिषद शाळा दिघंची, ता. आटपाडी येथे बाईंची पहिली नियुक्ती झाली.*


*तीन वर्षांतच त्यांची बदली जिल्हा परिषद शाळा दुधगांव नं. १, ता. मिरज येथे झाली. येथे त्यांनी अवघ्या चार वर्षांत आम्हां विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचे बीज पेरले. त्या काळात बाईंची माया, शिस्त आणि शिकवण्यातील ओलावा अजूनही जसाच्या तसा आहे.*


*बाईंच्या शिकवणीचा प्रभाव एवढा खोल होता की, आज दुधगावातील त्यांच्या अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी आहेत. विद्यासागर पाटील, रविकांत कोळी, सागर मोरे, दीपक आडमुठे हे यशस्वी उद्योजक त्यातलेच काही.*


दुधगांव नंतर बाईंची सेवा ही तीन शाळांमध्ये यशस्वीपणे पार पडली. त्यांनी जिल्हा परिषद शाळा गोटखिंडी नं. २ येथे १५ वर्षे, जिल्हा परिषद शाळा बागणी नं. २ येथे ७ वर्षे आणि जिल्हा परिषद शाळा बावची येथे ६ वर्षे सेवा केली. मार्च २०२४ मध्ये त्यांना बावची शाळेतच वरिष्ठ मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाली. 


*बाईंनी जिथे जिथे पाय ठेवला, तिथल्या शाळेने नवा उच्चांक गाठला. गोटखिंडीमध्ये त्यांनी "स्वच्छ सुंदर शाळा" स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. बागणी शाळेने आयएसओ मानांकन प्राप्त केलं. तर बावची शाळेने राज्य सरकारच्या मॉडेल स्कूल योजनेत आपली जागा निश्चित केली.*


मुख्याध्यापक म्हणून त्यांनी बावची शाळेला आधुनिकतेची दिशा दिली. वर्गखोल्यांची दुरुस्ती, बोलक्या भिंती, सीसीटीव्ही, शुद्ध पिण्याचे पाणी, टॅबलेट लॅब, खेळाचे मैदान बावची शाळा एका आदर्श स्वरूपात उभी राहिली. ती फक्त त्यांच्या नेतृत्वामुळे.


*ऑक्टोबर २०२० मध्ये मी आंतरजिल्हा बदलीने बागणी शाळा नं. २ मध्ये रुजू झालो. तिथे एका फलकावर एक नाव पाहिलं "सुनिता अरुण जाधव". डोळ्यांत ओळखीची चमक आली. माझ्या सहकारी वैशाली कोळी मॅडम यांना विचारलं, "बावची गावच्या आहेत का?" उत्तर ‘हो’ मिळालं आणि मन भरून आलं… बाईंचा नंबर घेतला, संपर्क केला आणि २३ वर्षांनी माझ्या वर्गशिक्षिका असलेल्या बाईंशी पुन्हा भेट झाली. त्या क्षणी पुन्हा एकदा मी 'पहिलीतील विद्यार्थी' झालो होतो.*


१९९३ साली मी जेव्हा पहिलीत होतो, तेव्हा माझी पाटी कोरी होती. त्या कोऱ्या पाटीवर 'अ' लिहून ज्ञानाचा श्रीगणेशा करणाऱ्या बाईंच्या आठवणी आजही जशाच्यातशा मनात कोरल्या आहेत. त्यांनी शिकवलेली 


ॐ तत् सत् श्री नारायण तू

पुरुषोत्तम गुरु तू ।

सिद्ध बुद्ध तू, स्कंद विनायक,

सविता, पावक तू ॥


प्रार्थना अजूनही ओठांवर रेंगाळत असते.


३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जुलै २०२५ रोजी बाई आपल्या सेवानिवृत्तीचा टप्पा पूर्ण करत आहेत. शाळा बदलले, विद्यार्थी बदलले, काळ बदलला. पण, बाईंच्या शिकवणीची ऊर्जा अजूनही अंतर्मनात कायम आहे.


*शाळेच्या दारातून आयुष्यात पहिलं पाऊल टाकताना ज्या हाताने माझं बोट धरलं, त्या हाताने मला लिहायला, वाचायला, वागायला आणि माणूस व्हायला शिकवलं. मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो, हे सांगण्यात मला आजही अभिमान वाटतो.*


*आज मी शिक्षक आहे. पण, आधी मी ‘जाधव बाईंचा विद्यार्थी’ आहे. शिक्षक म्हणून मी आज जे काही आहे, ते त्यांच्या बीजारोपणाचेच फळ आहे.*


माझ्या जीवनातील त्यांचं योगदान अमूल्य आहे आणि त्याचं ऋण अपरिमित आहे. मी शब्दांत मांडू शकणार नाही. 


*बाई आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त आपल्याला शतशः प्रणाम..!*


*आपल्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!*


*तुमचा लाडका विद्यार्थी,*

*संदीप.*


*धन्यवाद...!*

No comments: