🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *पापर्डेच्या अमेयची मनाला भिडलेल्या भेटीच्या निमित्ताने...*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
आजचा दिवस कसा बदलला ? हे कळलंच नाही. दुपारच्या सुमारास अमेय पाटील बागणी शाळेत आला. पापर्डे ता. पाटणचा मुलगा. भेटायला येण्यासाठी तो आधी दुधगावला जाऊन आला होता. तिथे त्याला राजू सरडे भेटले. त्यांना माझ्या विषयी विचारलं. त्यांच्याकडून माझा नंबर घेतला, मला फोन केला आणि नंतर थेट बागणीत उभा राहिला.
आल्याआल्या अमेय पाया पडला आणि त्या क्षणी एक शांत, निरुपद्रवी भाव मनात दाटून आला. मी त्याला घडवलं नव्हतं, पण त्याचं माझ्याबद्दलचं प्रेम मात्र अगदी खरं वाटलं.
अमेय माझ्या पापर्डे शाळेतील काळात नववी-दहावीला असावा. मी त्याचा वर्गशिक्षक नव्हतो, तरीही त्याने धरलेली माणुसकीची नाळ आज जाणवली. तो आता इस्लामपूरमध्ये राहतो. त्यानं MBA केलं आहे. डायनोसिस सेंटरना साहित्य पुरवण्याचं काम करणाऱ्या मामांच्या कंपनीत काम करतो. राहणीमान साधं. स्वतःचं जेवण स्वतः करतो. प्रामाणिक मेहनत करतो. त्याच्या बोलण्यातही तो प्रामाणिकपणा जाणवतो. त्याला कामाची लाज किंवा कष्टाची भीती वाटत नाही आणि विशेष म्हणजे स्वतः चा मार्ग स्वतः तयार करण्याची जिद्द बाळगतो.
"मी पापर्डेत पुन्हा यावं." अशी त्याची मनापासूनची इच्छा. त्यानं ते बोलूनही दाखवलं. शिक्षक म्हणून ही भावना मोठी असते. पण, ते आता शक्य नाही हे त्याला नीट समजावून सांगितलं. त्यानेही शांतपणे ते ऐकलं.
भेटीच्या शेवटी आम्ही एक सेल्फी काढला. नंतर त्याकडे पाहताना जाणवलं, की शिकवणं हे फक्त पुस्तकातलं ज्ञान देणं नसतं. कधी कधी आपल्या वागण्यातून आणि संवादातूनही कोणाच्या आयुष्यात एक छोटासा ठसा उमटतो. ते ठसेच कधीतरी परत आपल्याला भेटायला येतात आणि दिवस उजळवतात. अमेयची आजची भेट तशीच होती. साधी, पण मनाला थेट भिडणारी.
त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. त्याच्यातील तो प्रामाणिकपणा आणि जिद्द कायम राहो.
धन्यवाद...!

1 comment:
खूप खूप धन्यवाद सर आज आपल्या यशवंत एक प्रेरणा स्रोत या प्रसिद्ध लेखामध्ये आज मला यायची संधी मिळाली हे माझ्यासाठी इतर कुठल्याही गौरवापेक्षा कमी नाही. आपण जेव्हापासून आमच्या पापर्डे गावाच्या शाळेतून गेल्यापासून नेहमी आपल्या भेटीची _भेटीलागीं जीवा लागलीसे आस या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे_*सदा इच्छा*_ असायची आणि तीच काल आपल्या गावी दुधगाव मधून आणि नंतर जि प बागणी येथे आपली *सदिच्छा* भेट झाली .... सर आपले जे शाळेसाठी सर्वकाही अन् कामातून ओळख निर्माण होते हे दोन वाक्य मला मनाला भिडले आणि आपल्या या ब्रीद वाक्या सारखे माझ्यामध्ये सुद्धा संधी मिळाली की तिचं सोनं करून प्रामाणिक राहून काम करण्याची जिद्द आणि नवी उर्मी प्राप्त झाली...सर आपण भेटलात आणि यापुढेही आपण भेटत राहू हे आश्वासन दिलं या भावनेने खूप ऊर्जा मिळते... खूप खूप धन्यवाद सर असेच आपले आशीर्वाद आणि प्रेम सदैव या विद्यार्थ्यावर राहुदे हीच इच्छा 👏👏👏
Post a Comment