तुमच्या एखाद्या चांगल्या कामाबद्दल देव तुमच्यावर प्रसन्न झाला आणि वरदान दिले. तर तुम्ही काय मागाल?पैसा,घर,गाडी,प्रसिद्धी. तेही स्वतःसाठी.दुसऱ्यासाठी काहीच नाही मागणार. आपण दुसऱ्याचा कधी विचार करणार? या जगात दुसऱ्याचा विचार करणारी माणसाचं खुप मोठी झाली आहेत. हे कालच्या भागातील महाजन सरांच्या उदाहरणावरून हे लक्षात येते. माणसं मोठी होतात, ती छोट्या छोट्या लोकांचा विचार करूनच.. एक छोटासा दुसऱ्याचा विचार, एका मराठी माणसाला इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतो कि, त्या माणसाचा साऱ्यांनाच हेवा वाटतो. अशाच एका यशस्वी उद्योजकाचा, जो स्वतःला एक समाजसेवक मानतो. त्या समाजसेवकाचा हा प्रेरणादायी प्रवास......
त्याचा जन्म साताऱ्यातील कोरेगावचा.
वडील कारकून आणि आई गृहिणी.
अभ्यासात प्रचंड हुशार. पैकीच्या पैकी गुण मिळविणारा. घराच्या नाजूक आर्थिक परिस्थितीने लहानपणी त्याची हौसमौज झालीच नाही. याउलट, घराला हातभार लावण्यासाठी त्याला आंबे विकावे लागले. वडील आजारी पडले आणि आईला मंगळसूत्र देखील गहाण ठेवावे लागले.
अश्या बिकट परिस्थितीतही त्याने आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर दहावीत 88% गुण मिळविले व पोलीटेकनिक ला प्रवेश घेतला. संकटांनी अजूनही पाठलाग सोडला नव्हता. त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि कुटुंबावर मोठे संकट कोसळले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आता हा जीवतोड मेहनत करू लागला.
पॉलिटेक्निक कोर्स पूर्ण केल्यानंतर बी-टेकसाठी पुण्यात एका घराजवळच्या कॉलेजात प्रवेश मागितला, तेथे त्याला एक लाख रुपये डोनेशन मागितलं गेलं. म्हणून त्याने 22 किमी लांब असणाऱ्या कॉलेजात प्रवेश घेतला. दररोज 44 कि.मी. सायकलवरून प्रवास करून त्याने शिक्षण घेतले. कधीही कंटाळा केला नाही. कारण, त्याला आपली परिस्थिती बदलायची होती. यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे. याची त्याला जाणीव होती.
आईला आर्थिक मदत म्हणून शिकवणी घ्यायला सुरुवात केली. सॉस, जामची विक्री केली. रंगकाम मजूर म्हणूनही आणि ठेकेदार म्हणून काम केले. या सर्व कामांनी भविष्यातील यशस्वी उद्योजकाची पायाभरणी केली.
इंजिनियरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर टेल्कोमध्ये नोकरी मिळाली. आपला उद्धार करण्यासाठी प्रत्येकाला एखादी संधी मिळतेच. ती संधी यालाही टेल्कोत मिळाली. त्याने कंपनीच्या गोदामात वर्षांपासून पडून असलेल्या केबल वायरचा पुनर्वापर करायच्या पद्धती हुडकून काढली. केबलचा पुनर्वापर केला गेल्यामुळे टेल्को कंपनीला कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला. या कामावर खुश होऊन बॉसनी बक्षीस मागण्यास सांगितले. तेंव्हा त्याने स्वतःसाठी काही न मागता, नोकरीच्या आशेने त्याच्याकडे आलेल्या गावातील काही तरुणांसाठी कंपनीत काम मागितले. तेंव्हा साहेबांनी त्याला एक संस्था स्थापण्याचा सल्ला दिला आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गावाकडच्या या तरुणांना नोकरी देण्याचे सुचविले. त्याने वेळ न दवडता ‘भारत विकास प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केली आणि गावाकडच्या ८ तरुणांना नोकरी मिळवून दिली.
सेवाभावी वृत्तीने सुरू केलेल्या या कंपनीने त्याला यशाचा मार्ग मोकळा करून दिला. पहिले कंत्राट मिळाले. पहिल्या वर्षी 8 लाख, दुसऱ्या वर्षी 30 लाख आणि तिसऱ्या वर्षी 60 लाखांचा नफा झाला. हे यशाने त्याने नोकरीला रामराम केला आणि खऱ्या अर्थाने एक समाजसेवक आणि मोठा उद्योजक होण्यास तो सज्ज झाला.
कंपनीचे ‘भारत विकास सर्विसेस’ असे नामकरण केले. या संस्थेने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांना आणि संस्थाना विविध सेवा पुरवण्याचे काम सुरु केले. गरजेनुसार साफ-सफाई करणाऱ्या अद्ययावत मशीनरीज् खरेदी केल्या. यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत गेला.
वर्ष 2004 साली 'भारत विकास सर्विसेस' ला भारतीय संसद भवनाचे काम मिळाले. पुढे पंतप्रधान कार्यालयाचे कामही या संस्थेला मिळाले. त्यांच्या संस्थेच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत गेला. देशातल्या मोठमोठ्या संस्थांची कामं मिळाली. सरकारी भवन, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानक, एअरपोर्ट, कॉर्पोरेट भवन, मंदिरं यासारख्या अनेक ठिकाणच्या कामाची जबाबदारी या संस्थेवर सोपवण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचे जाळे उभे करण्यात आले आणि त्याला ‘भारत विकास ग्रुप’ म्हणजेच ‘BVG’ असे नाव देण्यात आले. आणि तो समाजसेवक आणि यशस्वी उद्योजक म्हणजेच या संस्थेचे संस्थापक श्री. हणमंतराव गायकवाड.
हणमंतरावांना टेल्कोतील बक्षीस मागण्याच्या वेळी स्वतःसाठी घर, गाडी, प्रमोशन, पगारवाढ यापैकी काहीही मागता आले असते आणि त्यांना ते सहज मिळालेही असते. पण,आज ते कोठे असते?... श्री. हणमंतराव गायकवाड हे नाव कुणाला माहितही झाले नसते. ते लोकांचा विचार करत गेले आणि मोठे होत गेले. आपणही आजपासून लोकांचा विचार करूया आणि मोठं होऊया...
एकेकाळी आंबे विकणाऱ्या, शिकवणी घेणाऱ्या, रंगकाम करणाऱ्या हणमंतरावांच्या हाताखाली आज ‘BVG’ मध्ये 65000 कर्मचारी आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत..
5 comments:
Great and inspiring blog
Big hands for this blog
Thank you very much
खूपच प्रेरणा देणारा लेख आहे .
खूप छान, प्रेरणादायी तसेच गायकवाड यांचा पूर्ण जीवन
पट मार्गदर्शक वाटला.
Very good Sir
Post a Comment