Saturday, November 10, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 16

गेल्या अनेक दिवसांपासून मी माझ्या *यशवंत - एक प्रेरणास्रोत* या प्रेरणादायी लेखमालेद्वारे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, खडतर परिस्थितीवर मात करणाऱ्या मराठी व्यक्तींचा शोध, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या संघर्षातून मिळणारी प्रेरणा मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण या लेखमालेस जो प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.

आजवरच्या सर्वच यशवंतानी, त्यांच्या संघर्षातून दूरदृष्टी,जिद्द,कामावरची निष्ठा,दुसऱ्याचा विचार आदि विचारांची दीक्षा आपल्याला दिली आहे. आज आपल्याला यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या आणखी एका गुणाची दीक्षा आजच्या या सदरातून मिळणार आहे. आज अशा एका मराठी उद्योजकाचा खडतर प्रवास आपल्या समोर मांडतो आहे. ज्याला आज जगात ‘किंग’ म्हणून ओळखले जाते. चला तर मग.....

अमरावतीतील शिरखेडमध्ये 1964 मध्ये जन्मलेल्या या किंगच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती साधारणच होती. दोन वेळचे जेमतेम जेवण घेता येईल अशी परिस्थिती.

त्याचे वडील कामाच्या निमित्ताने दुबईत आले आणि त्या पाठोपाठ किंगचेही पाय अरबस्तानला लागले. पुढे जाऊन हा तरुण संयुक्त अरब अमिरातीतील आघाडीच्या भारतीय 100 उद्योजकांत 19व्या क्रमांकावर विराजमान होईल आणि किंग बनेल. असे कुणालाही स्वप्नांतही वाटले नसेल.

वडिलांनी दुबईत किराणा मालाचे छोटेसे दुकान सुरू केले. त्याच दुकानाच्या गोदामात राहून दिवस काढले. झाडू मारणे, पोते उचलणे या प्रकारची सर्व कामे त्याने केली. त्याची इच्छाशक्ती दांडगी व जीवनात काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा मोठी होती. त्यामुळे तो यशाच्या शिखरावर पोहोचला.

कोणताही उद्योग असो, त्यात संशोधनवृत्ती फार महत्वाची असते. यातूनच बाजारपेठेचा शोध लागतो. त्या काळात दुबईत भारतीयांची संख्या लक्षणीय होती. भारतीय खाद्यपदार्थ ते चढ्या किमतीने खरेदी करायचे आणि नेमका हाच धागा त्याला सापडला. त्याने भारतातून विविध प्रकारची खाद्यान्ने आयात करून त्याचे दुबईत वितरण करण्याचा नवा व्यवसाय सुरु केला आणि इथूनच सुरु झाला प्रवास खऱ्या ‘किंगचा’.’मसाला किंगचा’’धनंजय दातार’ यांचा.

आजही मराठी माणूस ‘आमची शाखा कुठेही नाही’, असे म्हणण्यात धन्यता मानतो. धनंजय दातार मात्र मराठी असले तरीही या ‘मराठी संकुचित’ मनोवृत्तीचे नाहीत. उलट ‘आमच्या जगभर शाखा आहेत’. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मराठी माणसाला एक नवी विचारदृष्टी श्री धनंजय दातार यांनी दिली आहे. म्हणूनच ते खरेखुरे यशवंत आहेत.

उद्योग व्यवसायात किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, चिकाटी आणि कष्ट या बरोबरच ‘संशोधनवृत्तीची’ ही गरज आहे आणि ती कशी असावी ? याचा प्रत्यय दातार यांच्या एकूण प्रवासातून दिसून येतो. भारतीय ग्राहकांची मागणी लक्षात घेतली नसती तर आज दातार मसालाकिंग असते का? या प्रश्नाचे उतर आपण शोधूया आणि आपल्या कार्यक्षेत्रात अमंलात आणून यशवंत होऊया. 


No comments: