Saturday, November 10, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 17

मुलींनी खेळायचे नाजूक खेळ अन मुलांनी रांगडे. ही पारंपारिक समजूत अलीकडेच आलेल्या “दंगल” या चित्रपटाने मोडीत काढली आहे. आता मुलींनी ठोकलेल्या शड्डूचे आवाज घराघरात घुमू लागले आहेत. काही महिलांनीही,कुस्तीतील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे आव्हान निर्माण केले आहे. पण,लाल मातीत मुलींनी पैलवानकी करणे म्हणजे कायतरीच?असा समज आजही ग्रामीण भागात घट्ट पाय रोवून उभा आहे. पण,या साऱ्याला फाटा देऊन आव्हान उभी करणारी एक “दंगलगर्ल” सांगलीत आहे. तिचा प्रेरणादायी संघर्षमयप्रवास आज आपण पाहणार आहोत....

सांगली जिल्ह्यातील तुंग गावातली ही “दंगलगर्ल”. भाकरीच्या चंद्रासाठी मासेमारी करणाऱ्या कुटुंबातील तिचा जन्म.

असाच एक कुस्तांचा फड भरला होता. कुस्त्या पाहण्यासाठी गेलीली ही चिमुरडी त्यावेळी नऊ वर्षांची होती. चुलत्याने फड जिंकला त्यांचं कौतुक पाहुन भारावली.

‘मी कुस्ती शिकणारच’ असा धोषाच लावला. आई-बापाने जोरदार विरोध दर्शवला. मात्र, पोरीचा हट्ट काही गप्प बसू देत नव्हता. आज्जानं कुस्ती शिकवायला पुढाकार घेतला अन् चालू झाली या “दंगलगर्ल” ची कुस्ती तालीम. गावात मुलीसाठी तालीम कुठंय? मग आज्जानं मिळालेल्या घरकुलाच्या मागेच माती टाकली आणि नातीला कुस्तीचे डावपेच शिकवायला सुरुवात केली.

पावसाळ्यात घरामागच्या अंगणात चिखल होई. चार महिने कुस्तीचा अभ्यास थांबे. यावरही मात केली. बाजारातून थर्माकॉल आणले. त्या थर्माकॉलला बाहेरून जुन्या साडय़ांचे आवरण शिवले आणि गावठी पद्धतीचे मॅट तयार करून घरातच आखाडा तयार केला आणि “दंगलगर्ल”ची हौस भागविली.

एकदा दिल्लीला 'भारत केसरी' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रेल्वेतून जात असताना तिला तब्बल तीन दिवस उभे राहून प्रवास करावा लागला. पण,त्याही परिस्थितीत या “दंगलगर्ल”ने आपली छाप सोडत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धात यश संपादन करणारी ही “दंगलगर्ल” म्हणजे 15 वर्षाची संजना बागडी.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी, कमी वयात कुस्तीत नाव कमावणारी संजना आपणास जिद्द,चिकाटी या गुणांची शिकवण देते. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.

हा पुरुषांचा खेळ आहे. लोकं काय म्हणतील? माझं वय कमी आहे. आईवडिलांचा विरोध आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाही. गावात स्वतंत्र तालीम नाही. ही आणि या सारखी असंख्य कारणे तिला सांगता आली असती. शिवाय ती लहान होती. मोठ्यांच्या नकारात्मक विचारांनी ती लगेचच भारून गेली असती. पण,तिने या साऱ्या परिस्थितीला जुमानले नाही. यामुळेच, ती यशस्वी होऊ शकली. तिच्या या धाडसाचा आदर्श आपण साऱ्यांनी घ्यायलाच हवा.

टीप - हा लेख 17 जानेवारी 2018 रोजी लिहिला आहे.



No comments: