Saturday, November 10, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 18

जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला धावावेच लागते. सिंह हरणाच्या मागे,तर हरीण सिंहापासून जीव वाचवण्यासाठी धावते. पोलीस चोराच्या मागे,तर चोर पोलिसापासून वाचण्यासाठी धावतो. कोणी जीव वाचवण्यासाठी, तर कोणी पोटासाठी धावतो. धावणे म्हणजे जीवनाचा एक अविभाज्य भागच. पण, अशीही एक कन्या आहे, जिच्या आयुष्याचा प्रारंभ धावण्याने  झाला आणि त्यातच तिने आपले भवितव्य घडविले. तिचा तो संघर्षमय प्रवास आजच्या या सदरातून मांडतो आहे. आशा आहे. आपल्याला नक्कीच आवडेल...

कोरड्या पडलेल्या नद्या, सुकलेले बंधारे आणि ओसाड पडलेल्या जमिनी.....वर्षानुवर्षे हेच चित्र असलेल्या मोही या एका छोट्याशा गावात शेतमजूर  असलेल्या आई वडिलांच्या पोटी 2 जून 1989 रोजी तिचा जन्म झाला.

तिला पहिली धावाधाव करावी लागली ते शिक्षणासाठी. तिला शाळेत जाण्यासाठी दररोज चार किमी धावत जावे लागायचे. अशा खडतर परिस्थितीत तिचे शिक्षण झाले.

दररोज चार किमी धावुनही ती तिच्या शाळेत खो-खो ची उत्तम खेळाडू होती.

तिची दुसरी धावाधाव पाणी भरण्यासाठी. तिला घरापासून दूर असणाऱ्या विहिरीवरून पाणी दररोज भरावे लागायचे.

या सोबतच शेत पिकविण्यासाठी करावी लागणारी धावाधाव वेगळीच.

ही सगळी धावाधाव अनवाणीच.

ही सगळी धावाधाव करताना तिला जाणवले की, आपण या धावण्यात आपले भवितव्य घडवू  शकतो आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतो.

घरच्यांच्या परवानगीने आता ती फुल्ल मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन मध्ये धावू लागली. तिची ही तिसरी धावाधाव.

2004 साली वयाच्या पंधराव्या वर्षी तिने पहिली शर्यत जिंकली. तिने आजवर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. मुंबई मॅरेथॉन सलग तीन वर्षे जिंकणारी ती एकमेव. 2014 सालच्या एशियाडमध्ये ती स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाची मानकरी ठरली. मग 2015 साली आशियाई अॅथलेटिक्समध्ये तिनं स्टीपलचेसचं सुवर्णपदक जिंकलं. बीजिंगमधल्या जागतिक अॅथलेटिक्समध्ये तिनं स्टीपलचेसची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला.

2016 च्या रिओ ऑलम्पिक मध्ये तिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ती कन्या म्हणजेच साताऱ्याचा मान, सन्मान आणि अभिमान असलेली "माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर" होय.

ललिता बाबर यांनी मिळविलेले यश हे प्रतिकूल परिस्थितीवर मिळविलेला विजय आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वोत्कृष्ट स्टीपलचेस धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.

दुष्काळी परिस्थितीशी कठोर संघर्ष करून, ज्ञान, अन्न आणि पाणी मिळविण्यासाठी धावाधाव करून त्यांनी आपले भवितव्य निर्माण केले. धावाधाव हा तिचा जीवनाचा एक घटकच बनला असताना, त्यांनी त्यालाच आपल्या जीवनाचा आधार बनविले. त्यांना जीवनातील संकटांना टाळता आले असते. संकटांना शरण जाता आले असते. पण, संकटाला त्यांनी संधी म्हणून पाहिले. यामुळेच त्या इथवर येऊन पोहचल्या. त्यांचा हा संघर्ष आपल्यासाठी प्रेरणास्रोतच आहे...



No comments: