Sunday, October 27, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 124

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 124*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

तुम्हांला रोवन एटकिंसन माहिती आहे का ? बहुतेकांना माहितीच नसेल ! पण, ही एक अतिप्रसिद्ध व्यक्ती आहे. तो तब्बल 8000 कोटींचा मालक आहे. जगभरात याचे अनेक चाहते आहेत. तुम्ही सुद्धा ओळखता, या रोवन एटकिंसनला. पण, या खऱ्या नावाने नव्हे, तर टोपण नावाने. याचं रोवन एटकिंसनचा हा प्रेरणादायी प्रवास...

6 जानेवारी 1955 रोजी एका शेतकरी कुटुंबात रोवन चा जन्म झाला. त्याला चार भाऊ आणि तो सर्वात छोटा. लहानपणापासूनच त्याला बोलताना अनेक अडथळे जाणवायचे. Speaking Disorder या आजाराने तो त्रस्त होता.

रोवन अतिशय गमतीशीर होता. तोंड वेडेवाकडे करून इतरांना हसावयाचा. तो जितका गमत्या होता, तितकाच हुशार. त्याने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. 

कॉलेजमध्ये असताना तो विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचा. विशेषतः नाटकात विनोदी भूमिका करायला त्याला आवडायचे. त्याचे नाटकातील काम प्रभावी व्हायचे आणि त्याचे कौतुक देखील व्हायचे. 

"आपण उत्तम विनोदी अभिनेता होऊ शकतो." असा विश्वास त्याच्या मनी निर्माण झाला. म्हणून तो वेगवेगळ्या टीव्ही कार्यक्रमात काम मिळविण्यासाठी धडपड करू लागला. या ठिकाणी त्याच्या Speaking Disorder या आजाराचा फटका बसू लागला. त्याला अनेकदा निवड प्रक्रियेतून बाहेर काढले गेले. तो निराश व्हायचा. पण, स्वतःवर, तो करत असलेल्या कामावर, अभिनयावर त्याचा प्रचंड विश्वास होता. 

रोवनने खूप विचार केला आणि त्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे 'आपण ज्यावेळी व्यक्तिरेखेत असतो, त्यावेळी आपण उत्तम प्रकारे बोलू शकतो. परंतु, व्यक्तिरेखेतून बाहेर आल्यानंतरच बोलताना अडथळे निर्माण होतात.' त्याचा विश्वास वाढला. त्यामुळेच, तो नव्या उत्साहाने पुन्हा तयारीला लागला. आता मात्र वेगळीच अडचण त्याच्यासमोर उभी राहिली. 'त्याचा चेहरा चांगला नाही आणि त्याची बॉडी व्यवस्थित नाही.' या कारणाने त्याला पुन्हा नाकारले जाऊ लागले. आता मात्र कहरच झाला. 

एखादा सर्वसामान्य व्यक्ती असता, तर त्याने पुढील समस्यांना शरण जाऊन त्याने मार्ग बदलला असता. पण, रोवन सामान्यातील असामान्य होता. त्याने मार्ग बदलला नाही. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की, "आपल्या या आजारावर आपण मात करू शकत नाही. आपल्याला प्रत्येकवेळी या समस्येमुळे बाहेर पडावेच लागते. आपल्या पुढील सर्वात मोठ्या समस्येचे रूपांतर, सर्वात मोठ्या संधीत कसे करता येईल ? " यावर उपाय शोधायला त्याने सुरुवात केली. 

आणि एका टीव्ही शोच्या रूपाने, एक संधी त्याच्या पुढे उभी राहिली. त्या संधीचं त्यानं सोनं केलं. जीव तोडून मेहनत केली. मिळालेली व्यक्तीरेखा अजरामर केली. त्या व्यक्तिरेखामुळे तो जगातील सर्वात मोठा विनोदी कलाकार बनला. ती व्यक्तीरेखाच रोवनची ओळख बनली. ती व्यक्तीरेखा म्हणजे मि. बीन होय आणि मि. बीन म्हणजे रोवन एटकिंसन होय. 

मि. बीन यांना अनेक टी.व्ही. शोज मधून नाकारण्यात आले. पण, त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. मेहनत आणि कौशल्याच्या बळावर ते एक यशस्वी विनोदी कलाकार होऊ शकले. त्यांनी आजाराला अडथळा न मानता, त्याचे रूपांतर संधीत केले. त्यामुळेच तर ते यशस्वी होऊ शकले. सर्व सामान्य माणूसं आजारपणाला कवटाळून बसतात आणि आपण यशस्वी का होऊ शकलो नाही ? याचे एकच कारण सांगत बसतात. या जगात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी आजारावर मात करत यशाचे शिखर गाठले आहे. मि. बीन त्यांपैकीच एक.

यशस्वी होण्यासाठी सुंदर चेहरा आणि रुबाबदार शरीराची नव्हे, तर सकारात्मक मन आणि प्रयत्न करण्याच्या वृत्तीची आवश्यकता असते. आपल्या पुढील सर्वात मोठ्या समस्येचे रूपांतर सर्वात मोठ्या संधीत करता येते. हाच एक संदेश मि. बीन यांच्या जीवन प्रवासातून मिळतो. 

अनेक समस्यांवर मात करत मि. बीन यशस्वी झाले आहेत. रोवनकडे आज 8000 कोटींची संपत्ती आहे. मि. बीनला अभिनयासाठी ब्रिटनच्या राणी ने 2013 साली '' कमांडर ऑफ द मोस्ट एक्सेलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर '' हा मानाचा खिताब देवून सन्मान केला. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!

No comments: