Sunday, October 20, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 123

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 123*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

आपल्या देशाला अराजकतेतून बाहेर काढून,  विकासाच्या उंबरठ्यावर आणून उभं करणाऱ्या आणि आपल्या कृतीतून जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या एका नेत्याचा हा प्रेरणादायी प्रवास...

18 जुलै 1918 रोजी एका कृष्णवर्णीय निग्रो,झोसा (xhosa) जमातीच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे खरे नाव रोलील्हाल्हा. त्याचे वडील जमातीचे सरदार. सरदाराच्या मुलाला 'मडीबा' म्हटले जायचे. त्यामुळे त्याचे नाव 'मडीबा' असेच पडले.

मडीबाची आई एका ख्रिश्चन संप्रदाय समूहाची सदस्य होती. त्यामुळे मडीबाचे प्राथमिक,माध्यमिक जवळच्या मिशनरी शाळेत झाले. मडीबा बारा वर्षाचा असतानाच त्याचे वडील वारले. पुढे त्याने वकीलीचे शिक्षण घेतले. परंतु, वकिलीचे शिक्षण घेत असतानाच, वयाच्या अठराव्या वर्षीच, राजकारणात सक्रिय होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि तो सक्रिय देखील झाला. त्याची  राजकारणातील आवड पाहून घरचे हैराण आणि चिंतित झाले. त्याचे लग्न करून त्याला द्यावे म्हणजे तो घरात लक्ष देईल. या विचाराने त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. परंतु, मडीबा घरातून पळून गेला. 

याच कालावधीत मडीबाला वाटर सिसलु आणि वाटर एल्बरटाईन हे दोन नवे मित्र मिळाले. या मित्रांचा मडीबावर खूप मोठा प्रभाव पडला आणि मडीबा राजकारणाकडे अधिकच आकर्षित झाला. 

1951 साली तो ज्या पक्षाचे काम करत होता. त्या पक्ष्यांच्या युवक आघाडीचा तो अध्यक्ष बनला. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 

निग्रो हे दारिद्रय़, अज्ञान, रोगराई यांनी ग्रस्त होते अन् वर्णद्वेषी सरकारच्या अन्याय्य धोरणांमुळे ही निरपराधी, साधीभोळी जनता साध्या माणुसकीलाही पारखी झाली होती. देशात रंगभेदावरुन कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध मडीबाने आवाज उठविला. पण, तेथील सरकार गेंड्याच्या कातडीचे होते. ते कृष्णवर्णीयांवर अधिकच अन्याय करू लागले. मडीबाने केलेल्या चळवळीने, तो अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला. त्याची लोकप्रियता हुकुमशाही सरकारसाठी डोके डोकेदुखी होऊ लागली. त्यामुळे, त्याच्यावर वेगवेगळे निर्बंध घातले जाऊ लागले. त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तो काळ होता, 64 सालचा अन् मडीबा होता 46 वर्षांचा. 

तुरुंगातदेखील मडीबाने आंदोलन सुरूच ठेवले. कृष्णवर्णीयांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत होता. त्याच्या या आंदोलनाने साऱ्या जगाचे लक्ष केंद्रित झाले. संपूर्ण जगाचा दबाव सरकारवर वाढू लागला. वाढत्या दबावाने सरकारने मडीबाला तुरुंगातून मुक्त केले, तेंव्हा मडीबा 72 वर्षाचे होते. त्यांनी 27 वर्षे तुरुंगवास भोगला. 

मडीबाच्या आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली होती. पण, ही देशासाठी नवी पहाट होती. 1994 साली देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत मडीबा मोठ्या बहूमताने सत्तेत आला आणि त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला. मडीबा राष्ट्राध्यक्ष बनल्याने, ज्या देशात नवीन पहाट उदयास आली, तो देश म्हणजेच दक्षिण आफ्रिका आणि मडीबा म्हणजेच नेल्सन मंडेला होय. 

ताठ मानेने, दमदार पावले टाकीत, हसतमुखाने आणि खंबीर मनाने त्यांनी द. आफ्रिकेची सूत्रे हाती घेतली. मंडेलांचे प्रत्येक पाऊल हे दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याकडे, स्वयंशासनाकडे, लोकशाहीकडे नेणारे ठरले. एका मृतप्राय झालेल्या राष्ट्राला संजीवनी देण्याची, राष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न साकारण्याची, लोकांच्या आशाआकांक्षांना मूर्तरूप देण्याची खडतर जबाबदारी मोठय़ा विश्वासाने जनतेने आपल्या मडिबांकडे सोपवली. पाच वर्षांच्या आपल्या लोकाभिमुख, सर्वसमावेशक कारभारामुळे मडिबांनी हा विश्वास सार्थ ठरवला. 

व्यवसाय असो, नोकरी असो अथवा राजकारण प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करावाच लागतो.  राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी जितका संघर्ष करावा लागतो, त्यापेक्षा अधिक टिकवण्यासाठी करावा लागतो. प्रचंड कष्ट आणि पराकोटीचा संयम यामुळेच, उतवयात त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करता आले. तेंव्हा आपल्या ध्येयासाठी वेळ द्या, कष्ट करा, संयम बाळगा.

तुरुंगात मोठा छळ झाला. मोठा त्रास सहन करावा लागला. एवढा भयानक तुरुंगवास भोगल्यानंतर एखादा सामान्य माणूस पार खचून गेला असता. परंतु, मंडेला हे एक अजब रसायन होते. म्हणूनच, भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. शिवाय, शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना दुसरे म. गांधी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: