Sunday, May 9, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 191

 


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 191*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/191.html

भारतीय संघाला एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणारा आणि या सगळ्या स्पर्धांचा मालिकावीर असलेल्या एका जिद्दी खेळाडूची आणि त्याच्या संघर्षशाली प्रवासाची ही प्रेरणादायी कथा...

12 डिसेंबर 1981 रोजी चंदिगढ पंजाब येथील एका जट शीख कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील एक नावाजलेले क्रिकेटपटू तसेच अभिनेते. त्यांना भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची फारच कमी संधी मिळाली. त्यामुळे ते नाराज होते. आपल्या मुलाने भारतीय संघाकडून खेळावे. अशी त्यांची इच्छा. पण, मुलाला टेनिस आणि रोलर स्केटिंग हे खेळ आवडायचे. 

एकदा मुलाने शाळास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मिळालेले मेडल आनंदाने वडिलांना दाखविले. वडिलांनी नाराज होऊन ते मेडल फेकून दिले आणि क्रिकेटवर 'फोकस' करण्यास सांगितले. मुलानेही वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी  क्रिकेटवर 'फोकस' केले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला सुरुवात झाली. त्याची जिद्द,चिकाटी, मेहनत आणि वडिलांचे खडतर प्रशिक्षण फळास येऊ लागले. विविध स्तरावरील स्पर्धेमध्ये पंजाबकडून खेळताना, आपल्या देदीप्यमान खेळीने त्याने अनेकांचे लक्ष आपल्यावर केंद्रित करण्यास भाग पाडले. यामुळेच, त्याची निवड भारताच्या 19 वर्षाखालील संघात झाली. 

मोहम्मद कैफच्या नेतृत्वात 19 वर्षाखालील भारतीय संघाने 2000 सालचा विश्वचषक आपल्या नावावर केला. या स्पर्धेत त्याने दिलेल्या अष्टपैलू योगदानबद्दल ‘प्लेयर ऑफ़ दी टूर्नामेंट’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या बहारदार कामगिरीमुळे भारतीय संघाचे मुख्य दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. चॅम्पियन्स ट्रॉ़फी साठी त्याची निवड झाली. केनिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला आपली कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळाली नाही. परंतु, याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियासारख्या दादा संघाविरुद्ध 80 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी करून त्याने भविष्यातील यशाची पायाभरणी केली. शिवाय, तो संघाच्या मधल्या फळीचा कणाच बनला. 

2007 च्या टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, दमदार कामगिरी करून, त्याने संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले. तिन्ही विश्वचषक स्पर्धेचा 'मालिकावीर', सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारा तो जिद्दी खेळाडू म्हणजे युवराज सिंग होय.

युवराज सिंगचा हा प्रवास त्याच्यातील जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक विचार करण्याच्या वृत्तीची जाणीव करून देतो. वडिलांचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपल्या आवडत्या खेळावर पाणी सोडण्याची, आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतरही आपल्या ध्येयावरून विचलित न होण्याची, सहा चेंडू सहा षटकार ठोकण्याची आणि फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करून, पुन्हा एकदा मैदानात उभं राहण्याची क्षमता जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक विचार यातूनच निर्माण होते.

आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी युवराज सिंगचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे. क्रिकेटमधील त्यांच्या सेवेबद्दल 2014 साली त्याला भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहेत. 

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: