🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *मातृतुल्य सौ. रत्नप्रभा तुकाराम किणी मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने…*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2025/10/blog-post_31.html
काही माणसं अशी असतात की त्यांच्या सहवासानं आपण जसं होतो, त्याहून काहीतरी अधिक घडून जातं. जणू एखादा “परिसस्पर्श" लाभावा आणि साधं लोखंडही सोने बनावं. सौ. रत्नप्रभा तुकाराम किणी मॅडम माझ्यासाठी तशाच “परिस” ठरल्या. त्यांच्या सान्निध्यात मी केवळ शिकवायला शिकलो नाही, तर जगायलाही शिकलो.
किणी मॅडम माझ्यासाठी फक्त एक सहकारी शिक्षिका नव्हत्या, त्या माझ्या आयुष्यातील मातृतुल्य व्यक्तिमत्त्व होत्या. माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात मला त्यांनी दिलेला आधार, शब्दांत मांडणं कठीण आहे. तरी पण, मॅडम च्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने तो प्रयत्न करतो आहे.
सन २००९ मध्ये मी जिल्हा परिषद शाळा टेन मराठी, ता. पालघर येथे रुजू झालो. घरापासून साडेचारशे किलोमीटर दूर आई-वडील अन् कुटुंबापासून दूर एका नव्या प्रदेशात होतो. गाव ओळखीचं नव्हतं, माणसं नवी होती आणि पगार फक्त तीन हजार रुपये. जेवण, राहणं, सगळंच कठीण वाटायचं. पण, त्या अडचणीच्या काळात मॅडम माझ्या आयुष्यात, माझ्या पाठीशी आईसारख्या खंबीर उभ्या राहिल्या.
त्या दररोज आपल्या डब्यातून एक तांदळाची भाकरी जास्त आणायच्या “खावा हो संदीप, तुम्ही माझ्या योगेशसारखेच आहात.” असं म्हणून आग्रह करायच्या. ती भाकरी म्हणजे केवळ अन्न नव्हतं, तर मायेचा गोडवा होता. त्यांचं ते निस्वार्थी प्रेम आजन्म विसरता येणार नाही.
मॅडमचं व्यक्तिमत्त्व साधं. पण, तेजस्वी. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत, प्रसन्न हास्य असतं. जणू एखाद्या थकलेल्या मनाला आधार देणारं. त्या शाळेच्या परिसरात असल्या की, वातावरणातही एक वेगळी शिस्त आणि आधार यायचा.
मॅडम भावनिक, संवेदनशील आणि माणुसकीनं ओथंबलेल्या. एकदा शाळेची साफसफाई करताना माझ्याकडून पक्ष्याचं घरटं खाली पडलं. त्यातलं पिल्लूही जमिनीवर पडलं. जखमी झालेलं पिल्लू पाहून त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. मॅडमच्या संवेदनशीलतेची अनेक प्रसंग मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.
“शाळेसाठी सर्वस्व” हे माझं ब्रीदवाक्य. पण हे मी कुणाकडून शिकलो ? तर किणी मॅडमकडूनच. त्यांच्यासाठी शाळा म्हणजे फक्त कामाचं ठिकाण नव्हतं, तर एक घर होतं. त्या शाळेला, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबासारखं जपत.
शाळेच्या अडीअडचणी सोडवताना वेळ, पैसा आणि श्रम काहीच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं नव्हतं. “काम व्हायला हवं.” एवढीच त्यांची भूमिका असायची. मुख्याध्यापकांनी करायची कामं त्या स्वतः पुढाकार घेऊन करत. प्रसंगी घरची माणसं कामाला लावत. पण, काम पूर्ण करूनच घेत.
२०१५ साली माझी बदली साताऱ्याला नंतर सांगलीला. आज तब्बल दहा वर्षे उलटली. पण, त्यांचा तो जिव्हाळा अजूनही तसाच आहे. महिन्यातून एकदातरी त्यांचा फोन येतोच. “कसे आहात ?” हे त्यांचं नेहमीचं वाक्य आजही तितकंच आपुलकीचं वाटतं. माझ्या आईशी, पत्नीशी त्यांचं नातं अगदी मनापासून जुळलं आहे. मी पालघरला असताना सुद्धा माझ्या आईला त्या फोनवरून दिलासा द्यायच्या. “तुम्ही काळजी करू नका, मी आहे.” त्या एका वाक्यात किती मायेचा आणि जबाबदारीचा स्पर्श होता, हे शब्दांत सांगता येणार नाही.
श्री. तुकाराम किणी काकांचा स्वभावही मॅडमइतकाच मनमिळावू. राजकारणाची आवड असली तरी, त्यांचा भर सदैव समाजकारणावरच. लोकांची कामं करून घेणं, त्यांच्या समस्या सोडवणं, वेळप्रसंगी पुढं येऊन आंदोलन करणं, या सगळ्यात काका नेहमी आघाडीवर.
मॅडमचा मुलगा योगेश, सून सुविधा आणि नात अद्विता सगळे एकदम प्रेमळ. मॅडमचे आई-वडील, दोन्ही बंधू, दोन्ही बहिणी हे सगळे "बहाडोलीच्या जांभळा" सारखे स्वभावाने गोड अन् टवटवीत. कधीच कोणता गर्व नाही. कधी त्यांच्याशी बोललं की वाटतं, काही माणसं फक्त भेटण्यासाठीच नाही, तर आयुष्यात आधार देण्यासाठी येतात.
किणी मॅडम समर्पित आणि कार्यतत्पर शिक्षिका. १९८६ साली शिक्षक सेवेला सुरुवात करून ३९ वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात घर केलं.
१९ जानेवारी १९८८ पासून जिल्हा परिषद सेवेत रुजू झाल्या. त्यांनी खामलोली, बहाडोली, केळवे रोड, टेन मराठी आणि सावरे या शाळांत सेवा दिली.
उपशिक्षिका, पदवीधर शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि सध्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणूनही त्यांनी गुणवत्तेसाठी सातत्याने काम केलं. त्यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयतेचे नाते निर्माण केले. अध्यापनाबरोबरच शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पंचायत समिती पालघर ने त्यांना "आदर्श शिक्षिका पुरस्कार" देऊन सन्मानित केले आहे. ही त्यांच्या कार्याचे पोचपावतीच आहे. आज ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी त्या सेवानिवृत्त होत आहेत.
मॅडम, तुमच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मन कृतज्ञतेने भरून आलं आहे. तुम्ही माझ्यासाठी फक्त सहकारी नव्हता. तर माझ्या वर माया करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आई होता.
पालघरच्या त्या नव्या जगात तुमच्या एका भाकरीत प्रेम, आधार आणि मायेचं विश्व होतं. शाळेप्रती निष्ठा, माणुसकी मी तुमच्याकडूनच शिकलो.
मॅडम तुम्ही सेवानिवृत्त होत आहात. नव्या प्रवासाला सुरुवात करत आहात. तुम्ही सदैव आनंदी रहा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुमच्या पुढील वाटचालीसाठी सॉलिड शुभेच्छा...!
धन्यवाद...!
