Thursday, November 15, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 43

मैदान खचाखच भरलं होतं. फुटबॉल च्या सामन्याला सुरुवात झाली होती. आपल्या संघाचा स्टार खेळाडू कोठे गायब झाला होता?काहीच पत्ता नव्हता. प्रशिक्षक हैराण झाले. कारण,त्यांचा संघ 0-1ने पिछाडीवर होता. इकडे तो स्टार खेळाडू टॉयलेटमध्ये अडकला होता. त्याला बाहेर पडता येत नव्हते. त्याने टॉयलेटच्या खिडकीची काच फोडून उडी मारली. तो मैदानात उतरला.bत्याच्या संघाने तो सामना 3-1 ने जिंकला आणि ते तिन्ही गोल त्या स्टार खेळाडूनेच केले. तो स्टार खेळाडू कोण? जाणून घेऊ आजच्या भागात...

त्याला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड. त्याला त्याच्या वडिलांकडूनच हे वारसारूपाने मिळाले. वयाच्या 11व्या वर्षापर्यंत सर्व काही ठीक होते. पण,अचानक त्याला हॉर्मोन्स डिफीसिएन्सी नावाचा रोग झाला. त्याच्या जीविताला या रोगाने कोणताच धोका नव्हता. मात्र त्याचे मानसिक खच्चीकरण होणारे होते हे नक्की. त्या रोगाने त्याची शारीरिक वाढ होणार नव्हती. यावरचा उपाय म्हणजे दररोज एक इंजेक्शन. ते ही पायात आणि ते ही सलग तीन वर्षे. उपचाराचा खर्च त्याच्या कुटुंबाला परवडणारा नव्हता. त्याला फुटबॉल खेळणे जवळजवळ बंदच करावे लागणार होते. पण, त्याची इच्छाशक्ती प्रबळ होती. या संकटातून आपण बाहेर पडू. असा विश्वास त्याला वाटत होता.

त्याची इच्छशक्ती फळाला आली. त्याला एका अशा फुटबॉल क्लबचा पत्ता मिळाला कि, जो फुटबॉल खेळाडूंचा वैद्यकीय खर्च करायचा. मात्र, ही मदत मिळविण्यासाठी, त्याला त्या अवस्थेत क्लबसमोर आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागली. त्या क्लबने त्याला संधी दिली. क्लबने त्याच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आणि दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी तो जीव तोडून मेहनत करू लागला. इतर खेळाडू मैदानात येण्याअगोदर तो मैदानात असायचा आणि सर्व खेळाडू गेल्यावरच तो मैदान सोडायचा. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना बार्सिलोनाकडून खेळला. आपल्या मेहनतीच्या बळावर काही वर्षातच तो जगातील सर्वाधिक यशस्वी स्टार खेळाडू बनला. तो स्टार खेळाडू म्हणजेच लिओनेल मेस्सी.

आपल्या आयुष्यातील खडतर प्रसंगांना धैर्याने तोंड देऊन त्यावर मात करून लिओनेल मेस्सी फुटबॉल जगताचा सुलतान बनला. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

आज यशाच्या शिखरावर असलेल्या लिओनेल मेस्सी ला आपल्या सुरुवातीच्या काळात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. संकटं ही अल्पकालीन असतात. आपण या संकटांना घाबरलो, तर ती अधिकच घाबरतात. संकटांचा सामना करा. विश्वास ठेवा, यशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल.

यशवंत मालिकेच्या निमित्ताने अनेक नवे मित्र मिळाले. त्यांनी जीवनातील चांगले वाईट प्रसंग माझ्यासोबत शेयर केले. त्यातीलच एका मित्राला कमी वयातच रक्तदाब आणि मधुमेह सारख्या रोगाने गाठले. त्याचे मानसिक खच्चीकरण झाले असावे. असे त्याच्यासोबतच्या गप्पांतून जाणवले. त्या मित्राला या पोस्टच्या माध्यमातून सांगावे वाटते कि,आपल्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाचा गुलाम न होता. त्याला मेस्सीसारखे धैर्याने सामोरे जा. यशवंत व्हा.


3 comments:

माझे जगणे said...

पेटते पलिते घडवणारी लेखणमाला.

Sandeep Patil, Dudhgaon said...

Thank You Very Much

YES ! I CAN !!! said...

Great 👍