Thursday, November 15, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 44

संपूर्ण जगात सर्वाधिक खेळला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल. भल्याभल्यांना या खेळाची मोहिनी पडलेली आहे. या खेळावर जीवापाड प्रेम करणारी, खेळ पाहताना तहान भूक हरवून जाणारी अनेक फुटबॉल वेडी लोकं या जगात आहेत. एका देशातील एक प्रसंग सांगतो म्हणजे या खेळाचे आणि तो खेळणाऱ्या खेळाडूंचे महत्त्व आणि लोकप्रियता लक्षात येईल. नायझेरिया हा देश 1967 साली युद्धाने प्रभावित झालेला होता. या देशातील सैन्याला आणि विद्रोह्यांना फुटबॉलचा सामना पाहता यावा. यासाठी 48 तासांचा युद्धविराम घोषित करण्यात आला होता. निव्वळ फुटबॉलच्या सामन्यासाठी युद्धविराम घोषित करण्यात आला असेल का? तर नाही. त्या सामन्यात "ब्लॅक पर्ल" नावाचा एक प्रसिद्ध खेळाडू खेळत होता. त्याचा खेळ पाहता यावा. यासाठी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. तो ब्लॅक पर्ल कोण? जाणून घेऊ आजच्या भागात..

ब्राझीलसारख्या बलाढ्य देशात ब्लॅक पर्ल चा जन्म झाला. रंगाने कृष्णवर्णीय. वडिलांना फुटबॉलचे प्रचंड वेड. त्यांनीच त्याला फुटबॉल खेळायला शिकवला. त्याला या खेळात प्रचंड आवड निर्माण झाली. पण,घराच्या बिकट आर्थिक परिस्थितीने हा खेळ खेळण्यासाठी, फुटबॉल आणि बूट घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने रेल्वेस्टेशनवर बूट पॉलिश आणि चहा विकण्यासारखी कामे केली. पण,फुटबॉल वरील आपले प्रेम जरासुद्धा कमी होऊ दिले नाही.

वयाच्या 11व्या वर्षी त्याने आपला पहिला सामना नुसता खेळला नाही तर गाजवलासुद्धा. तिथून त्याने मागे वळून पाहिलं सुध्दा नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याची निवड राष्ट्रीय संघात झाली. त्याचवर्षी त्याने आपल्या बहारदार खेळाच्या जोरावर देशाला फुटबॉल विश्वचषक मिळवून दिला. आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत देशाला 3 वेळा विश्वचषक जिंकून दिला. तो महान खेळाडू ब्लॅक पर्ल म्हणजेच पेले.

पेलेसारख्या खेळाडूने आपल्या देशाकडून खेळावे. यासाठी इटलीने 25लाख डॉलरची आणि अर्जेंटिनाने एक जहाज पेट्रोल देण्याचे आमिष दाखवले. पण,या देशभक्त पेलेंनी तो प्रस्ताव झुगारून दिला म्हणून ब्राझील देशाने त्यांना राष्ट्रीय प्रतीक म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय प्रतीक असलेले पेले जगातील एकमेव व्यक्ती आहेत. म्हणूनच ते यशवंत आहेत.

एखाद्या व्यक्तीला मिळणारे यश हे त्याच्या रंगरूपावर अवलंबून नसते, तर त्याच्या बुद्धी,कौशल्य आणि परिश्रमावर अवलंबून असते. पेले यांनी आपलं ' बेस्ट ' ओळखलं होतं. त्यासाठी त्यांनी पडेल ते काम केले. कसलीही तडजोड केली नाही. कोणत्याही अमिषाला ते बळी पडले नाहीत. मी गरीब आहे. मी कुरूप आहे. माझ्याकडे बूट नाहीत. यासारखी कारणे पेलेंनी सांगितली असती. तर त्यांच्यासारखा पर्ल घडलाच नसता. तेंव्हा आपलं 'बेस्ट' ओळखा आणि कामाला लागा. कारणं सांगत बसू नका. 


1 comment:

Gautam Kamble, Sangli said...

ब्लॅक पर्ल तथा पेले यांच्याबद्दल थोडक्यात पण सुंदर माहिती. पेलेना भावपूर्ण श्रद्धांजली व आपणास लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा