Thursday, November 15, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 45

महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राने त्याला प्रश्न विचारला. " तुझं लक्ष्य काय आहे ? " यावर तो म्हणाला " वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत लक्षाधीश होण्याचं माझं लक्ष्य आहे." यावर तो मित्र त्याच्यावर हसला. त्या तरुणाचे लक्ष्य पूर्ण झाले का ?  महाविद्यालयात शिकत असतानाच आपले लक्ष्य ठरविणारा तो तरुण कोण ? असा प्रश्न तुम्हांला पडला असेलच.. काय त्याचा संघर्ष ?? जाणून घेऊया आजच्या भागात. चला तर मग.

28 ऑक्टोबर 1955 रोजी वॉशिंग्टन येथे पेशाने वकील असलेल्या वडिलांच्या आणि बँकेत संचालिका असलेल्या आईच्या पोटी, एका उच्च -मध्यम वर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. 

तो लहानपणापासूनच प्रचंड हुशार. इतका की त्याने हायस्कूल परीक्षांमध्ये 1600 पैकी 1590 गुण मिळविले होते. त्याला संगणकाची प्रचंड आवड. तो त्याच्या आवडीचा विषय. 

संगणकाची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्याला उत्सुकता असायची. संगणका विषयी त्याला अनेक प्रश्न पडायचे. त्याचे कामकाज कसे चालते ?  हे जाणून घेण्याची त्याला प्रचंड ओढ असायची. म्हणून तासनतास तो संगणकावर काम करत असायचा.


वयाच्या केवळ पंधराव्या वर्षीच त्याने आपल्या मित्राच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले आणि याबद्दल त्याला खूप पैसे मिळाले. 


संगणक क्षेत्रात असलेल्या संधीची जाणीव वयाच्या पंधराव्या वर्षीच झाल्यावर, सतराव्या वर्षीच स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा विचार त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितला. परंतु, मुलाने आपल्यासारखेच वकील व्हावे. असा वडिलांचा हट्ट. त्यामुळे त्याने तो विचार काही काळासाठी मनातून काढून टाकला. वडिलांच्या इच्छेखातर त्याने हॉवर्ड विद्यापीठात वकिली शिक्षणासाठी प्रवेश घेतला खरा परंतु, त्याच्या मनातील सुप्त इच्छा त्याला गप्प बसू देत नव्हती. वकिलीचे शिक्षण घेण्यापेक्षा, संगणकाबद्दल अधिक जाणणे. त्याला आवडे. हार्वर्ड विद्यापीठात देखील त्याने आपली आवड जपली. विद्यापीठातील संगणक कक्षात तो दिवस-दिवस बसून आपले काम करायचा. 


एकेदिवशी त्याला एका मित्राने विचारले, " तुझं लक्ष्य काय आहे ? " यावर तो म्हणाला " वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत लक्षाधीश होण्याचं माझं लक्ष्य आहे." यावर तो मित्र त्याच्यावर हसला आणि निघून गेला. या प्रसंगात त्याने स्वतःचे खच्चीकरण होऊ दिले नाही. 


1974 साली वयाच्या 19 व्या वर्षी त्याच्यासमोर एक संधी चालून आली. संधी होती एका कंपनीसाठी, संगणकाला चालविणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याची. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने, दिवसरात्र मेहनत करून केवळ दोन महिन्यातच संगणकासाठी सॉफ्टवेअर विकसित केले. तो या प्रयत्नांत यशस्वी झाला. या बदल्यात त्याला खूप पैसे मिळाले. 


हा त्याच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण होता. त्याने निर्णय घेतला, ' कधीच न थांबण्याचा.' सतराव्या वर्षी मनी असलेला विचार, प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने आपले शिक्षण अर्ध्यातच सोडून, आपल्या मित्राच्या मदतीने वयाच्या विसाव्या वर्षी संगणकाला चालविणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याची कंपनीची स्थापना केली. इथून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 


या कंपनीच्या माध्यमातून त्याने प्रचंड पैसा मिळवला. वयाच्या तिसाव्या वर्षी तो कोट्याधीश झालाच शिवाय, वयाच्या अडतीसाव्या वर्षी तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. जवळजवळ चौदा वर्षे तो जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान होता. तो धनाड्य व्यक्ती म्हणजेच बिल गेट्स होय.  


" बिल गेट्स यांना एक देश म्हणून मानले गेले, तर ते जगातील ३७ व्या क्रमांकाचे श्रीमंत देश ठरेल." "बिल गेट्स दर सेकंद सात हजार रुपये कमावतात." वरील विधाने
कदाचित  रंजक वाटत असतील. पण, तितकेच ती खरी देखील आहेत. हे सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र एक करून, भविष्यातील आव्हाने जाणून घेवून , व्यवसायातील चढ-उतार, तीव्र स्पर्धा यासारख्या आव्हानांना सामोरे जात, प्रचंड मेहनत घेऊन मायक्रोसॉफ्ट कंपनी उभी केली आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.


ज्या गोष्टीत आपल्याला विशेष आवड आहे. त्याच गोष्टीसाठी सर्वाधिक वेळ देणे आणि इतर काय म्हणतात ? याचा विचार न करता, आपल्या आवडीच्या क्षेत्रातच, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे. मोठा विचार करून, आपले लक्ष्य निश्चित करणे आणि लक्ष्य प्राप्त होईपर्यंत अभ्यास आणि मेहनत करणे. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. कट्ट्यावर बसून, मोबाईल मध्ये डोकं घालून, गेम खेळत बिल गेट्स होता येत नाही. हे नक्की. 






धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.


कृपया Blog वर आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आवडल्यास Blog ला fallow करा.


No comments: