Showing posts with label पर्व तिसरे 51 ते 75. Show all posts
Showing posts with label पर्व तिसरे 51 ते 75. Show all posts

Wednesday, November 21, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 75

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 75*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*एक दिवस ती आपल्या मैत्रिणीबरोबर तृतीय पंथीयांच्या एका गल्लीमध्ये गेली. त्याठिकाणी तिला एक भयानक वास्तव पाहायला मिळाले. तृतीयपंथीयांच्या जीवनात येणारे प्रसंग तिला पाहायला मिळाले. त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना, प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. केवळ 20 रुपयांसाठी तिच्यासारख्याच एका तृतीयपंथीयाला आपले शरीर विकावे लागले. या प्रसंगाचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. पुढे काय झाले ?? कोण ती तृतीयपंथीय जाणून घेऊ आजच्या भागात..*

1979 साली त्याचा जन्म ठाणे जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याची आई त्याला लाडाने राजू म्हणायची. राजू पाच - सहा वर्षांचा असेल तेव्हाची घटना. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त तो आपल्या गावी गेला होता. या ठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले. हे अत्याचार एकदा - दोनदा नाही, तर दोन-तीन वर्षे सलग चालूच राहिले. यामुळे त्याच्या मनात भीतीचे आणि न्यूनगंडतेचे वातावरण निर्माण झाले. कालांतराने त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी राजूने आवाज उठवला. या प्रसंगाचे खोल परिणाम त्याच्या बालमनावर झाला. 

राजूला नृत्याची खूप आवड. तो भरतनाट्यम नृत्यात पारंगत झाला. वयाच्या बाराव्या वर्षीच त्याने स्वतःचा नृत्य प्रशिक्षण वर्ग (डान्स क्लास) सुरू केला. त्याचे अनेक विद्यार्थी बुगी-वुगी सारख्या नृत्यावर आधारित असलेल्या कार्यक्रमांमध्ये चमकले. तो एक उत्तम नृत्यशिक्षक बनला. तो कमवता झाला, स्वावलंबी बनला.

राजू एक पुरुष होता. परंतु, त्याच्या मनाच्या खोल गाभाऱ्यात एक स्त्री लपलेली होती. त्याला मुलींसारखे कपडे घालण्याची,वागण्याची, नटण्या-मुरडण्याची इच्छा निर्माण व्हायची आणि तो वागायचाही तसाच. या काळात त्याला एक गोष्ट कळली. कळली म्हणण्यापेक्षा समाजाने त्याच्या निदर्शनास आणून दिली. तो पुरुष जरी असला तरी त्याचे वागणे,बोलणे,चालणे, हावभाव,त्याच्या हालचाली,त्याचे राहणीमान हे सर्व एका स्त्री सारखेच होते. त्यामुळेच राजू समाजामध्ये चर्चेचा आणि थट्टेचा विषय बनला. समाजाच्या या चर्चेने त्याला कळले की, तो पुरुष जरी असला, तरी तो स्त्री आहे. तो पुरुषी नाही आणि तो स्त्री ही नाही. लोक त्याला हिजडा,छक्का,तृतीयपंथी, किन्नर,  समलिंगी अशा एक ना अनेक नावांनी त्याला संबोधून, त्याच्याकडे तिरस्कारी नजरेने पाहू लागले. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. पण,त्याचे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे, तो घाबरला नाही, डगमगला नाही. तो धैर्याने सामोरा गेला. त्याने उत्तम प्रकारचे शिक्षण घेतले. 
याच काळात त्याची मैत्री त्याच्यासारख्याच इतरांशी झाली. या ठिकाणी त्याने एका गुरूंचे दास्यत्व स्वीकारले आणि राजू "तो" चा "ती" झाली.

1999 सालची एक घटना. एक दिवस ती आपल्या लता गुरु या मैत्रिणीबरोबर तृतीय पंथीयांच्या एका गल्ली मध्ये गेली. त्याठिकाणी त्याला एक भयानक वास्तव पाहायला मिळाले. 20 रुपयांसाठी तिच्यासारख्याच एका तृतीयपंथीयाला आपले शरीर विकावे लागले. या प्रसंगाचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला आणि तिने लता गुरू यांच्या नेतृत्वाखाली दाई वेल्फेअर असोसिएशन सुरू झाली. एड्स प्रतिबंध आणि काळजी यांच्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हिजडा समाजासाठी कार्य करणारी ती संस्था. हिजडा समाजासाठी समाजसेवेचे तिने टाकलेले हे पहिले पाऊल होते. समाजाच्या हक्कांसाठी तिने न्यायालयीन लढाई सुरू केली. याच काळात तिने एक याचिका दाखल केली. समानतेची वागणूक मिळावी. यासाठीची ती याचिका होती. सोळा वर्षे ती लढली. 15 एप्रिल 2014 साली ती जिंकली. देश स्वतंत्र झाल्यानंतर 67 वर्षांनी, सातत्याने समाजाची अवहेलना सहन करणाऱ्या, रोजगाराची आणि शिक्षणाची संधी नाकारल्या जाणाऱ्या तृतीय पंथीयांना सर्वोच्च न्यायालयाने एक कायदेशीर अस्तित्व बहाल केले. हे कायदेशीर अस्तित्व जिच्यामुळे तृतीयपंथीयांना लाभले, ती तृतीय पंथीय म्हणजेच *लक्ष्मीनारायण त्रिपाठी होय.*

लक्ष्मी त्रिपाठी यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकत असताना एक गोष्ट लक्षात आली की, स्व चा शोध लागला की, व्यक्तीला त्याच्या जीवनाचं ध्येय सापडतं, साध्य सापडतं. ज्यावेळी आपण कोण आहोत ? आणि काय करू शकतो ? याची त्याला जाणीव होते, केवळ त्यावेळीच त्याला यशाचा मार्ग ही सापडतो. मग तुमच्यावर होत असलेल्या, टिकांचे तुम्हांला काहीही वाटत नाही. ज्या क्षणी लक्ष्मी त्रिपाठी यांना स्व ची निर्मिती जाणीव झाली, त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या टीकांकडे दुर्लक्ष करून, मनावर न घेता, त्या समस्येला सामोरे गेल्या. आपल्यातील क्षमतेची त्यांना जाणीव झाली. त्यामुळेच ,कालांतराने या समस्येशी लढताना, लढ्याची धार अधिक तीव्र झाली.

आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे. आपले हक्क आपण मिळवले पाहिजेत. त्यासाठी मोठा संघर्ष केला करण्याची तयारी असली पाहिजे. जोपर्यंत, आपल्याला विजय प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण संघर्ष कायम ठेवला पाहिजे. लक्ष्मी त्रिपाठी यांचा जीवन प्रवास हा याचसाठी अधिक प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 74

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 74*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/74.html

*2016 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातल्या एका तरुणीने 773 वा क्रमांक पटकावला. तिला रेल्वे मध्ये नोकरी मिळाली. पण,भारतीय रेल्वे मंत्रालयाने तिला नोकरी देण्यास नकार दिला. रेल्वे मंत्रालयाने नकार देण्यामागचे कारण काय असावे ? ज्या तरुणीवर हा अन्याय झाला, ती तरुणी कोण ? न्याय मिळविण्यासाठी तिला कोणता संघर्ष करावा लागला ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग.*

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील वडजी या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. आईवडील नोकरीच्या निमित्ताने उल्हासनगरला ठाणे येथे स्थायिक झाले होते. त्यामुळे तिचे बालपण उल्हासनगरमधेच गेले. लहानपणापासूनच तिची नजर कमकुवत होती. वयाच्या बारा वर्षापर्यंतच ती पाहू शकेल. असा अंदाज डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितला होता. पण,वयाच्या सहाव्या वर्षी तिच्या वर्गमित्राने डोळ्यावर पेन्सिल मारली आणि तिचा एक डोळा कायमचा निकामी झाला. 

वयाच्या सातव्या वर्षी ती आजारी पडली आणि या आजारपणातच तिचा दुसरा डोळाही कायमचा निकामी झाला. ती ज्या शाळेत शिकत होती, त्या शाळेने तिच्या अंधत्वामुळे तिचा प्रवेश कायम करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे तिला घरापासून दूर, दादरच्या एका अंध विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागला आणि घरापासून दूर होस्टेलमध्ये राहावे लागले. दहावीचं वर्ष तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. या वर्षी तिने कधी नव्हे तो खूप अभ्यास केला आणि चांगल्या मार्कांनी पास झाली.

अकरावी आणि बारावीचे शिक्षण तिने उल्हासनगर येथेच घेतले. बारावीला भरपूर परिश्रम घेतले. कॉलेजमध्ये तर ती पहिली आलीच शिवाय जिल्ह्यातही पहिली आली. पुढे तिला झेवियर्स कॉलेजला प्रवेश घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि तिने प्रवेश घेतला सुद्धा. उल्हासनगर ते सीएसटी ती दररोज लोकल ट्रेनने एकटीच प्रवास करायची. "तू अंध आहेस. तुला दिसत नाही. तुला घराजवळच्या कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळाला असता. एवढ्या लांबचा प्रवास करायची काय गरज आहे ?" तिच्यासोबतचे डोळस लोक तिला असे विविध प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. पण, ती या प्रश्नांना दाद द्यायची नाही. मुंबई युनिव्हर्सिटीत राज्यशास्त्र मध्ये ती पहिली आली आणि ती करत असलेल्या प्रवासाचे सार्थक झाले. आता तिने जे.एन.यु. दिल्ली या युनिव्हर्सिटीत पुढील शिक्षणासाठी अर्ज केला. यासाठी तिने प्रवेश परीक्षा दिली,मुलाखत दिली आणि ती यशस्वी सुद्धा झाली. आता तिला घरापासून पाच दहा किलोमीटर नव्हे, तर हजारो किलोमीटर दूर दिल्लीला जाऊन राहावे लागले. ते ही एकटी. तिथे तिने एम.फिल आणि पी.एच.डी. सोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. याच कालावधीत तिचे लग्न झाले. परंतु, तिच्या पतीने शिक्षण सुरू ठेवण्याची अट घातली. त्यामुळे तिने आपले शिक्षण सुरूच ठेवले. 

2016 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालात तिने 773 वा क्रमांक पटकावला. इंडियन रेल्वे अकाउंट सर्विस मध्ये तिला नोकरीसुद्धा मिळाली. पण, तिचा आनंद फार काळ टिकला नाही. रेल्वे मंत्रालयाने तिच्या अंधत्वाचे कारण पुढे करत, तिला नोकरी नाकारली. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. परंतु, ती या धक्क्यातून लवकरच सावरली. पुन्हा जोमाने तयारीला लागली. 2017 साली पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी तिने जबरदस्त कामगिरी करत देशात 124 वा क्रमांक पटकावला आणि ती बनली *भारतातील पहिली अंध जिल्हाधिकारी. ती फर्स्ट लेडी म्हणजेच प्रांजल पाटील.*

*प्रांजली पाटील यांचा प्रवास अतिशय खडतर असा आहे. "त्यांचा प्रवास सहज सोपा होता, त्यांना नशिबाची साथ होती." यासारखी वाक्यं त्यांच्या बद्दल कोणीच काढणार नाहीत. त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. स्वतः शी लढता लढता समाजाशी लढणं सोपं नसतं. डोळस व्यक्तीला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जेवढा वेळ लागतो. त्यापेक्षा कैकपटीने अधिक वेळ अंध व्यक्तींना लागतो. याची आपल्याला जाणीव असेलच. अनेक समस्यांवर मात करत सौ. प्रांजल पाटील यांनी मिळवलेले यश डोळे दिपवणारे आहे. अंधत्वावर मात करून दुर्दम्य इच्छाशक्ती,आत्मविश्वास आणि परिश्रमाने प्रांजल पाटील यांनी मिळवलेले यश, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी तर आहेच. शिवाय तो, डोळे असूनही स्वप्नं न पाहणाऱ्या, प्रयत्न न करणाऱ्या अंधासाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 73

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 73*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*तिला उत्तम नर्तिका बनायचं होतं. ती उत्तम भरतनाट्यम करायची. तिला क्रिकेटदेखील खूप आवडायचे. वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये ती सहभागी व्हायची. यासाठी तिला खूप लांब प्रवास करावा लागायचा. क्रिकेटमुळे तिचा नृत्याचा सराव जवळपास होतच नव्हता. हे पाहून, तिच्या गुरुंनी, तिच्यापुढे एक प्रश्न उभा केला, "तुला क्रिकेट किंवा नृत्य या दोन्ही पैकी फक्त एकच निवडावे लागेल". या प्रश्नाने ती खूप विचारात पडली. तिने कशाची निवड केली असावी ? क्रिकेट की नृत्य ? कोण ती यशवंत ? काय तिचा प्रवास ? जाणून घेऊ, आजच्या भागात. चला तर मग...*

3 डिसेंबर 1982 रोजी, राजस्थानमधील जोधपूर येथे, एका मध्यमवर्गीय कुटुंबात, तिचा जन्म झाला. वडील भारतीय हवाई दलात एअरमॅन होते. तिच्या आईने, मुलीच्या करियरसाठी नोकरी सोडली. ती उत्तम प्रकारे नृत्य करायची. शिवाय ती क्रिकेट ही उत्तम प्रकारे खेळायची. तिच्या वडिलांची इच्छा होती कि ,तिने क्रिकेटर बनावे. जेव्हा तिच्या गुरूंनी क्रिकेट आणि नृत्य या पैकी एक निवडण्यास सुचवले, तेव्हा मात्र तिने क्रिकेटची निवड केली आणि स्वतःला झोकून दिले.

वयाच्या 10 व्या वर्षी तिच्या क्रिकेटमधील प्रशिक्षणाची सुरुवात झाली. तिने ज्या वयात, ज्या काळात क्रिकेटची बॅट हातात धरली होती, त्या काळात मुली फक्त भातुकलीचा खेळ खेळायच्या. त्यामुळे तिला बऱ्याच वेळा क्रिकेटचा सराव मुलांसोबत करावा लागायचा. या काळात तिला अनेक बोचऱ्या टिकांनी हिणवण्यात आलं. मुलं सहजपणे म्हणायची, "अरे मुलगी आहे. हळू चेंडू टाक. तिला जखम होईल." यासारख्या टीकामुळे तिने धीर सोडला नाही. तिने हिंमत सोडली नाही.

आपल्या मेहनतीच्या जोरावर, वयाच्या चौदाव्या वर्षी, तिने भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळविले. तब्बल दोन वर्षानंतर, तिला आपला पहिला सामना खेळण्याची संधी प्राप्त झाली. प्राप्त संधीचं, तिनं सोनं केलं आणि शतक झळकाविलं. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. 2013 साली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या जागतिक क्रमवारीत, ती पहिल्या स्थानावर विराजमान झाली, शिवाय याच वर्षी भारतीय संघाची कर्णधार बनली. तिच्या नेतृत्त्वाखाली 2017 सालच्या विश्वचषक स्पर्धेत, भारतीय संघ उपविजेता ठरला. महिला संघाची, आजवरची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. क्रिकेटमधील तिच्या अतुलनीय कामगिरीमुळे, तिला "महिला क्रिकेटची तेंडुलकर" म्हणून गौरविले जाते. ती खेळाडू म्हणजेच, मिताली राज होय.

जेव्हा आपल्या समोर एकापेक्षा अधिक पर्याय असतात, तेव्हा निवडलेला पर्याय, सर्वोत्तम बनवण्यासाठी, अतोनात कष्ट करावे लागतात. आपण निवडलेल्या पर्यायामुळे आपल्यावर अनेक टीका होण्याची शक्यता असते. पण, निवडलेला पर्याय योग्यच आहे, हे सिद्ध करण्यासाठी आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची, धमक आपल्या अंगी असली पाहिजे. ही धमक आपल्या अंगी निर्माण होण्यासाठी, सातत्य आणि मेहनत या गोष्टी महत्वाच्या असतात.

भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 72

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 72*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*मार्च 2015 साली एका महिलेला भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा पुरस्कार दिला. सर्वात कमी वयात हा मानाचा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच महिला ठरली. एवढ्या कमी वयात तिला हा पुरस्कार का देण्यात आला असावा ? असा कोणता पराक्रम तिने केला ? पद्मश्री पुरस्कार मिळवणारी ती तरुणी कोण ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग.*

5 जुलै 1995 रोजी हैदराबाद येथे तिचा जन्म झाला. आई आणि वडील दोघेही हॉलीबॉल चे प्रसिद्ध खेळाडू होते. तिच्या वडिलांना मानाचा अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तिच्या रक्तातच खेळाप्रती विशेष आवड होती. तिला हॉलीबॉल आवडायचे. पण, एका कार्यक्रमात पी. गोपीचंद यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होत होता. हा समारंभ पाहण्यासाठी ती उपस्थित होती. त्यावेळी तिचे वय सहा ते सात वर्षे असावे. त्या पुरस्कार समारंभाचा तिच्यावर खुप मोठा प्रभाव पडला आणि तिने बॅडमिंटन हा खेळ निवडला. त्यालाच आपले साध्य बनविले. वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. वयाच्या 8 वर्षापासूनच तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. तिचा पहिला संघर्ष म्हणजे प्रवास. ती ज्या ठिकाणी राहायची तेथून, तिचे प्रशिक्षण स्थळ 56 किलोमीटर इतके दूर होते. इतके अंतर पार करून, ती दररोज प्रशिक्षणस्थळी पोहोचायची. तेही अगदी वेळेत. 

2004 साली पी गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली, वयाच्या नवव्या वर्षीच, तिने दहा वर्षाखालील एक टूर्नामेंट जिंकली. हा तिच्या आयुष्यातला पहिलाच विजय होता. इथून पुढे तिच्या विजयाची कमान चढतीच राहिली. सन 2009 ला तिने कनिष्ठ आशियाई बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत कास्य पदक पटकावलं आणि साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतलं.

ऑलिंपिकमध्ये देशासाठी पदक मिळवणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्नं असतं. तसे ते तिचे ही होतंच. 2016 साली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ती फायनलमध्ये पोहोचली. पण, सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. *ऑलम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये रौप्य पदक मिळवणारी, ती पहिली भारतीय महिला बनली. ती फर्स्ट लेडी म्हणजेच पी.व्ही.सिंधू होय.*

*सिंधूच्या व्यक्तिमत्त्वाची एक खास गोष्ट म्हणजे, ती कधीच हार मानत नाही. ती सदैव प्रयत्न करत राहते. 56 किमी अंतरावर असलेल्या प्रशिक्षण स्थळी,ती अगदी वेळेत दाखल व्हायची. या प्रसंगावरून खेळाप्रतीचं, तिचं समर्पण लक्षात येतं. अगदी लहान वयातच, तिनं आपलं ध्येय निश्चित केलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी, ती तेंव्हापासूनच खडतर श्रम करत आली होती. त्यामुळेच, ती अगदी कमी कालावधीत यशाच्या शिखरावर पोहोचू शकली. आपलं ध्येय निश्चित करणं आणि त्यासाठी सर्वस्व अर्पण करणं. हाच बोध आपल्याला सिंधूच्या जीवनप्रवासातून मिळतो. 2015 साली भारत सरकारने, पद्मश्री हा किताब देऊन, सिंधूचा गौरव केला आहे. हा किताब मिळवणारी ती सर्वात तरुण महिला ठरली. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.*


उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 71

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 71*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*सन 2000 सिडनी ऑलम्पिकमध्ये,कर्णम मल्लेश्वरी ने वेटलिफ्टिंग मध्ये ब्राँझ मेडल मिळवले. ते ऑलम्पिकमध्ये भारतीय महिलेने मिळवलेले पहिलेच पदक होते. तिने मिळवलेल्या पदकाचा खूप मोठा परिणाम हरियाणातील एका व्यक्तीवर झाला. त्याने विचार केला, "जर कर्णम मल्लेश्वरीसारखी एक मुलगी पदक जिंकू शकते, तर माझी ही मुलगीदेखील पदक जिंकू शकते." असा विचार ज्या व्यक्तीने केला, त्याच्या मुलीने त्याचे स्वप्नं पूर्ण केले का? ती मुलगी कोण? जाणून घेऊ आजच्या भागात.चला तर मग...*

हरियाणा राज्यातील, भिवानी जिल्ह्यातील बिलाली एक छोटसं गाव. या गावात मुलींचं जन्माला येणं, एक शापच मानलं जायचं. मुलींचा जन्म झाल्यावर आनंद होण्याऐवजी दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखी अवस्था त्या गावातल्यांची व्हायची. एवढंच नाही तर, मुलींना शाळेत जाण्यावर मनाई होती. अशा परिस्थितीत 15 डिसेंबर 1988 रोजी त्या गावात एका मुलीचा जन्म झाला. आजही आपल्या देशात मुलांच्या जन्माची अपेक्षा करणारी अनेक कुटुंब आहेत. त्यांपैकीच एका कुटुंबात या मुलीचा जन्म झाला. या कुटुंबात जन्माला येणारी ती पहिलीच. पण, मुलाच्या अपेक्षेने तिच्या आई वडिलांनी आणखी तीन मुलींना जन्म दिला. तिचे वडील आपल्या काळातील, एक प्रसिद्ध पैलवान  आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक होते. 

सन 2000 सिडनी ऑलम्पिकमध्ये, कर्णम मल्लेश्वरीने, वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझ मेडल मिळवले. आपलीही मुलगी असा पराक्रम करू शकेल. असा विश्वास मनी बाळगून वडिलांनी आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. जे वय भातुकली खेळण्याचे नटण्या-मुरडण्याचे होतं, त्या वयात तिला जोर बैठका आणि व्यायाम करावा लागे. तालमीमध्ये तासन् तास कसरत करावी लागायची. तालमीत असणाऱ्या मुलांसोबत कुस्ती खेळावी लागायची. ज्या गावात मुलींच्या शिक्षणावर बंदी होती. त्या गावात ती कुस्ती खेळत होती. यामुळे तिला खूप टीकांना सामोरे जावे लागले. खूप बोल ऐकून घ्यावे लागले. ती कुस्ती खेळायची म्हणून, ती बिघडली आहे. असा समज गावातील इतर पालकांनी आपल्या मुलींवर बिंबवून, तिच्याशी बोलणे, खेळणे बंद करून एक प्रकारे तिला वाळीत टाकले. पण, तिने आणि तिच्या कुटुंबाने याकडे दुर्लक्ष करून आपले संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रित केले.

जर हेतू मजबूत असेल आणि तो पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. नेमकं हेच तिच्या बाबतीत घडलं. तिच्या प्रयत्नांना यश आलं. सन 2009 साली राष्ट्रकुल कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. *सन 2010 साली दिल्लीमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 55 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकले. असा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. ती फर्स्ट लेडी म्हणजेच गीता फोगट होय.*

*गीताचा जन्म ज्या बिलाली गावात झाला, ते सामान्य आणि पुरातनवादी विचारांचा पगडा असलेलं गाव होतं. बिलाली गावात मुलींनी जन्म घेण्यापूर्वीच त्यांची हत्या केली जायची. जरी एखाद्या मुलीचा जन्म झाला तरी, आनंदाऐवजी दुःखचं व्हायचे. मुलींना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. अशा गावात जन्म घेऊन सुद्धा गीताने केलेला पराक्रम म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल. गीताच्या पराक्रमानंतर बिलाली आणि हरियाणातील हजारो गावे बदलली आहेत. तेथील लोकांचे विचारही बदलले आहेत. आता मुलीच्या जन्माचे दुःख न करता,तेथील लोक आनंद साजरा करून स्वागत करत आहेत. मुलींना मुलांसारखे स्वातंत्र्य मिळाले आहे. या सर्वाचे श्रेय गीता फोगट यांना जाते. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


Tuesday, November 20, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 70

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 70*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत* ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पोस्टच्या शेवटी लिंकवर क्लिक करा.


*1994 साली एका महिलेच्या जीवनावर आधारित चित्रपट आला. या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. या  चित्रपटाचा वाद न्यायालयातही गेला. या चित्रपटाचा वाद विकोपाला गेल्यामुळे, या चित्रपटाच्या पटकथा लेखिकेने चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला. चित्रपटाचा वाद वाढण्यामागचे कारण काय ? तो चित्रपट कोणता ? ती पटकथा लेखिका कोण ? पुढे काय झाले तिचे ? जाणून घेऊ आजच्या भागात..*

24 नोव्हेंबर 1961 ला तिचा जन्म तत्कालीन आसाम मधील शिलाँग मध्ये झाला. सध्या शिलाँग मेघालय राज्याची राजधानी आहे. वडील बंगाली हिंदू तर, आई ईसाई. वडील चहाच्या बागेचे व्यवस्थापक होते. ती दोन वर्षाची असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. ती आईबरोबर केरळला गेली. आई महिलांच्या अधिकारांसाठी लढणारी कार्यकर्ती. आईचा अन्यायाविरुद्ध  लढण्याचा संस्कार तिच्यावर बालपणापासूनच झाला. 16 व्या वर्षी ती आर्किटेक्चर च्या शिक्षणासाठी दिल्लीला आली. याच काळात तिची भेट एका आर्किटेक्ट सोबत झाली. दोघांनी लग्न केले. पण, चारच वर्षात ते वेगळे झाले. ती नोकरीला लागली. 1984 साली तिची भेट चित्रपट दिग्दर्शक प्रदीप कृष्णन सोबत झाली. त्यांनी तिला आपल्या चित्रपटात तिला संधी दिली. तिने या संधीचे सोने केले. तिला चित्रपटात काम मिळू लागले आणि ती चित्रपटासाठी पटकथा लिहू लागली. नंतर दोघांनी लग्न केले. 1988 साली तिने एका नाटकासाठी लिहालेल्या पटकथेसाठी राष्ट्रीय पुस्कारही प्राप्त झाला. 

1994 साली फुलन देवी यांच्या जीवनावर आधारित Bandit Queen या चित्रपटाच्या बाबतीत अनेक वाद निर्माण झाले म्हणून, तिने चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला आणि तिने स्वतः ला लेखनासाठी वाहून घेतले. आपल्या प्रतिभेची, क्षमतेची तिला जाणीव होती. त्यामुळेच, तिने चित्रपटसृष्टीचा नाद सोडून, पूर्ण वेळ लेखनाकडे वळली. याकाळात आर्थिक स्थैर्यासाठी नोकरी आणि शिकवणी घेतली. ती एक प्रतिभाशाली लेखिका असल्याने, तिचे लेखन, लोक आवडीने वाचू लागले. 1997 साली तिने आपली पहिली कादंबरी "The God Of Small Things" पप्रकाशित केली. त्या वर्षी या पुस्तकाला साहित्य क्षेत्रातील मानाचा बुकर पुरस्कार मिळाला आणि *बुकर पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. ती फर्स्ट लेडी म्हणजे अरुंधती रॉय.*

व्यक्तीच्या आयुष्यातील प्रसंग, त्याला यशाच्या शिखराकडे मार्गक्रमण करण्यास मदत करत असतात. जसे की, अरुंधती रॉय यांना Bandit Queen या चित्रपटाच्या बाबतीत अनुभवास आले. या घटनेने त्याचे संपूर्ण जीवनच बदलले. जीवनात येणारे वाईट प्रसंग, दुःख, अडचणी या बदल घडविण्यासाठीच येत असतात. अशा प्रसंगात आपण सकारात्मक राहून मार्गक्रमण करत राहिले पाहिजे. यशाचे शिखर आपोआप सर होईल.

*2014 साली टाइम्सने जगातील शंभर प्रभावी महिलांच्या यादीत अरुंधती रॉय यांचा समावेश करून, त्यांचा सन्मान केला आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 69

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 69*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*लल्ली एक शालेय मुलगी. तिच्या शाळेतील इतर मुली, तिला हत्तीचं पिल्लू म्हणून चिडवायच्या. आपलं हसं होतंय. याचं तिला खूप वाईट वाटायचं अन् आपल्या लठ्ठपणाचा ती तिरस्कार करायची.तिला रडू यायचं. तिच्या या लठ्ठपणाचा ती फक्त राग करत, रडतच बसली? कि,तिने काही करून दाखवलं? कोण ही लल्ली? जाणून घेऊ तिचा प्रवास. चला तर मग...*

लल्लीचा जन्म ३ जुलै १९८६ चा पंजाबमधील अमृतसरचा. तिचा जन्म झाला,तेव्हा तिचे वजन पाच किलो होते. जे सामान्य नव्हते. ती दोन वर्षाची असतानाच तिच्या वडीलांचा मृत्यू झाला. वयाच्या तेवीसाव्या वर्षीच तिच्या आईला वैधव्य आले. तिच्या आईने दुसरे लग्न करण्याऐवजी संघर्ष करण्याचा मार्ग निवडला. आईच्या याच विचाराचा प्रभाव  लल्लीवर पडला. 

लल्ली आता शाळेत जाऊ लागली. पण, तिच्या पुढे आता वेगळीच समस्या उभी राहिली. शाळेतील सर्वच मुली,तिला हत्तीचं पिल्लू म्हणून चिडवत असत. आपलं हसं होतय. याचं तिला वाईट वाटायचं अन् आपल्या लठ्ठपणाचा तिला प्रचंड राग यायचा, रडू यायचं. जसं शालेय जीवनात अनुभवलं, तसं कॉलेज जीवनातही. पण, वाईट वाटून घेणे थांबवून, तिने स्वतःला याची सवय करून घेतली होती. तिनं आपलं सारं लक्ष शिक्षणावर केंद्रित केलं. तिनं नेमबाजीत कौशल्य प्राप्त केलं. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पंजाबचे प्रतिनिधित्व केलं. अनेक मेडल प्राप्त केले. पण, घरातील आर्थिक समस्येमुळे तिला नेमबाजीत करीयर अर्धवट सोडावे लागले. याकाळात तिच्या नातेवाईकांनी तिला कसलेही आर्थिक सहकार्य केले नाही. पण,ती डगमगली नाही. आता तिने आपले लक्ष चित्रपटसृष्टीकडे वळविले. ती मुंबईला आली. तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले. याकडेही तिने दुर्लक्षच केले. तिच्या लठ्ठपणामुळे तिला काम मिळणे कठीण झाले. म्हणून ती खचली नाही. तिने प्रयत्न सुरूच ठेवले. तिला एक संधी मिळाली. एक विनोदी कार्यक्रम स्पर्धा होती. "The Great Indian Laughter Challenge " असे त्या शो चे नाव होते. यात तिने सहभाग घेतला. तिला असं लक्षात आलं की, लोकांना आपल्या लठ्ठपणाचा अधिक आनंद होत आहे. तिने विचार केला, "ज्या लठ्ठपणामुळे आपलं बालपणापासून हसं झालं आहे, याच लठ्ठपणामुळे आपण स्वतः चं हसू करून घेऊ आणि लोकांना आनंद देऊ." तिने आपल्या लठ्ठतेचा विनोदनिर्मितीसाठी वापर सुरू केला. या शो मध्ये तिने लल्ली हे पात्र रंगविले आणि प्रसिद्ध केले. तिला लोकं लल्ली या नावानेच ओळखू लागले. या शो चा निकाल लागला. ती उपविजेती ठरली. पुढे कॉमेडी सर्कस 3, कॉमेडी नाईटस बचाओ, कॉमेडी नाईटस लाईव्ह,द कपिल शर्मा शो या सारख्या कार्यक्रमात तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. *ती लोकप्रिय लल्ली, कॉमेडी क्विन म्हणजेच भारती सिंग.*


*भारती सिंग चा हा प्रवास अतिशय विलक्षण असा आहे. जे लोक तिला फॅटी म्हणायचे, तेच आज तिच्यासोबत फोटो काढत असतात. जे नातेवाईक तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत, तेच आज तिच्याकडे आपल्या मुलांच्या भविष्याबाबत मार्गदर्शन घेत असतात. जे लोक तिच्या लठ्ठपणावर हसायचे, तेच आज तिचा हेवा करतात. पण, हे सारं कधी शक्य झालं? जेंव्हा भारती यांनी आपल्या लठ्ठपणाकडे ' शाप ' म्हणून न पाहता ' वरदान ' म्हणून पाहिले. प्रत्येकाच्या जीवनात समस्या असतातच.  म्हणून,आपणही आपल्या जीवनातील समस्यांकडे, संकटांकडे संधी म्हणून पाहिले, तर आणि तरच भारती सिंग यांच्यासारखे नेत्रदीपक यश आपल्याला मिळविता येईल. फोर्ब्स च्या 2016 सालच्या जगातील 100 विनोदी कलाकारांच्या यादीत भारती सिंग यांचा समावेश झाला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 68

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 68*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*1985 मध्ये केंद्र सरकारच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी विश्व बँकेने 450 कोटी डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली. या प्रकल्पाने तीन राज्यांचा दुष्काळ संपुष्टात येणार होता. या प्रकल्पाचे जिव्हढे फायदे होते. त्यापेक्षा अधिक तोटे होते. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आपली पीएचडी अर्धवट सोडून एक तरुणी पुढे आली. तिने या प्रकल्पाने होणारे नुकसान जगासमोर आणले. सरकारला या प्रकल्पाचा पुनर्विचार करायला भाग पाडले. आवाज उठविणारी ती तरुणी कोण ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..*

तिचा जन्म 1 डिसेंबर 1954 सालचा. मुंबईतील एका गांधीवादी विचारधारा असलेल्या कुटुंबातला. वडील वसंत खानोलकर स्वातंत्र्यसेनानी, तर आई इंदु महिलांसाठी कार्य करणारी समाजसेविका. आईवडिलांच्या या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव तिच्यावर पडला. तिला याचा लाभ भविष्यात सामाजिक जीवनात झाला. तिचं संपूर्ण शिक्षण मुंबई मध्येच झाले. 1976 साली TISS (Tata Institute Of Social Science) मध्ये तिने एम.ए.पूर्ण केलं आणि त्याच संस्थेत तिनं 2 वर्षे शिक्षक म्हणून कामही केलं. याच काळात तिने मुंबईतील सेवाभावी संस्थामध्ये काम करायला सुरुवात केली. सात वर्षे तिने मुंबईत काम केलं. तिचं लग्न झालं आणि लगेचच घटस्पोट देखील झाला. पुढे पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता.

1985 साली वर्ल्ड बँकेने एका प्रकल्पासाठी कर्ज दिले. या प्रकल्पामुळे गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यातील पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघणार होता. या तीन राज्यांची भरभराट होणार होती. पण, या प्रकल्पाने 37000 हजार गावांचे, लाखो लोकांचे विस्थापन होणार होते. अनेक लोकं बेघर होऊन बेरोजगार होणार होते. सोबतच, पर्यावरणाची मोठी हानी होणार होती. यावर कहर म्हणजे, विस्थापित लोकांना मिळणारी मदत अतिशय तुटपुंजी होती. 

मुंबईत पीएचडी करणाऱ्या त्या तरुणीने या प्रकल्पातील विस्थापितांसाठी वाहून घेतले. वेळ कमी पडू लागला. म्हणून, पीएचडी अर्धवट सोडून तिनं स्वतःला या लढयात पूर्णपणे वाहून घेतलं. सुरुवातीला तिने या प्रकल्पाने पर्यावरणाचे होणारे नुकसान जगासमोर मांडले. पण, नंतर या प्रकल्पाने बाधित लोकांना अधिक सुविधा मिळाव्यात. यासाठी लढा उभारला आणि या लढ्याने ती बनली विस्थापितांचा, उपेक्षितांचा आवाज. *तो हा लढा होता, नर्मदा बचाव आंदोलनाचा आणि तो विस्थापितांचा, उपेक्षितांचा आवाज म्हणजे मेधा पाटकर होय.*

*काही लोकं केवळ स्वतःचा विचार करतात. पण, मेधाजी याला अपवाद आहेत. विस्थापितांना न्याय मिळवून देण्यासाठी पीएचडी अर्धवट सोडणं, आईच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी पुन्हा आंदोलनात सक्रिय होणं, सलग 22 दिवस उपोषण करणं, प्रसंगी जीव धोक्यात घालणं, या साऱ्या गोष्टी, त्यांची ध्येयाप्रती असलेली बांधिलकी दर्शवितात. ध्येय गाठण्यासाठी त्यांनी स्वतःला ज्याप्रमाणे झोकून दिलं, त्याप्रमाणेच आपणही झोकून दिलं पाहिजे. हाच धडा त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे.*

नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून विस्थापितांना न्याय मिळवून देण्याचे मोठं काम त्यांनी केले. या आंदोलनासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील, ऐन तारुण्यातील 16 वर्षे दिली आहेत. ' पर्यायी नोबल पारितोषिक ' म्हणून गणला जाणारा ' राइट लाइव्हलिहुड ॲवॉर्ड ' देऊन स्वीडन देशाने त्यांचा सन्मान केला आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 67

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 67*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



*7 जुलै 2016 रोजी एक बातमी सर्व वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेलवरती झळकत होती. आंतरराष्ट्रीय मेरिटाईम संस्था (IMO) ने "अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी " हा पुरस्कार प्रथमच एका महिलेला प्रदान केला होता आणि प्रत्येक भारतीयाला अभिमानही वाटला. कारण, तो पुरस्कार प्राप्त करणारी महिला भारतीय होती. कोण आहे ती महिला? काय तिचा पराक्रम? जाणून घेऊ आजच्या भागात.*


तिचा जन्म केरळचा. कोदूनगलर सारख्या खेडेगावातला./समुद्र किनारा जवळच असल्यानं, तिथं तिचं फिरणं अन भटकणं व्हायचं. समुद्राच्या लाटा जेंव्हा तिच्या पायाला स्पर्श करायच्या, तेंव्हा तिच्यावर स्वार होऊन सफरीला जाण्याचा विचार तिच्या मनात यायचा. त्यामुळंच तिने नौसेनेत जाण्याचं स्वप्नं पाहिलं.

पदवी प्राप्त केल्यावर नौसेनेत जाण्यासाठी रेडिओ कोर्स करण्याची इच्छा तिनं आपल्या घरच्यांना बोलून दाखवली. मुलींमध्ये असणारा नाजूकपणा, समुद्रातील धोके आणि जोखमीची नोकरी या सर्वांची जाणीव असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिच्या या निर्णयाला विरोध केला. पण,जीवनात काहीतरी वेगळं करून दाखविण्याची प्रबळ इच्छा मनी बाळगणाऱ्या तिने, कुटुंबीयांना राजी केलंच. रेडिओ कोर्स,जहाजातील संवाद प्रणाली याचं प्रशिक्षण उत्तमप्रकारे पूर्ण करून तिने शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळविली आणि समुद्र सफरीला जाण्याचं, नेव्हीत जाण्याचं स्वतःचं स्वप्नं तिनं पूर्ण केलं. तिच्या आवडीच्या कामात ती रमत होती आणि रोमांचकारी प्रवासाचा आनंद घेत होती. 2012 साली तिला एक संधी चालून आली. संधी होती नेव्ही कॅप्टन बनण्याची. तिनं या संधीचं सोनं केलं आणि *ती बनली देशातली पहिली महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन.*


2015 सालची एक घटना. कॅप्टन पदाचा पदभार सांभाळून दोन वर्षाहून अधिक काळ लोटला होता. ती 'संपूर्ण स्वराज्य' जहाजावर तैनात होती. रात्रीचे अकरा वाजले होते. समुद्रात प्रचंड वेगाने वारा वाहत होता. जोराच्या लाटा उसळत होत्या. एकदम भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. मासेमाऱ्यांची एक नाव या वादळात सापडली असल्याची बातमी तिला समजली. अवघ्या पाचच मिनिटांत तिने बचाव कार्य हाती घेतले. पण,जोरदार वारा आणि भयानक उसळणाऱ्या लाटा यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. तिच्या टीमने दोनदा प्रयत्न केला. पण, अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात, त्या मच्छिमारांना वाचविण्यात तिला यश आले. तिच्या या साहसाचं जगभर कौतुक झालं. तिच्या या पराक्रमाबद्दल आंतरराष्ट्रीय मेरिटाईम संस्था (IMO) ने *"अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी " हा पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला. हा पुरस्कार मिळविणारी ती जगातील पहिली महिला ठरली. ती सुपरवुमन म्हणजेच राधिका मेनन होय.*

*राधिका यांचा पहिली महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर आहे. समुद्रातील वारा आणि लाटा यातून प्रवास करणं जोखमीचं तर होतंच. पण, घरच्यांचा विरोध, काम करण्यासाठी घरापासून दीर्घकाळ दूर राहणे, आई बनल्यानंतर बाळापासून दूर राहण्याचं दुःख, कौटुंबिक जबाबदाऱ्या, पहिली महिला कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पाडताना, निर्णय घेताना आलेल्या समस्या यासारख्या अडचणी नजरेआड करून चालणार नाही.*

*राधिका यांचा धाडसी,चिकाटी आणि धैर्यवान स्वभाव, काहीतरी वेगळं करून दाखविण्याची प्रबळ इच्छा, इच्छापूर्ती साठी आवश्यक शक्ती हे गुणविशेष राधिका यांच्या अंगी आहेत. यामुळेच त्यांना "अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी " हा पुरस्कार मिळाला. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 66

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 66*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*सन 2016 सालचा प्रसंग. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत ,महिलांच्या कुस्तीचा एक सामना सुरू होता. भारतीय खेळाडू त्या सामन्यात 0 - 5 ने पिछाडीवर होती. शेवटची काहीच मिनिटे उरली होती. भारतीय खेळाडू हा सामना हरल्यात जमा होती. पण, तिने मुसंडी मारली आणि अति महत्वाच्या असणारा हा सामना ती 8 - 5 ने जिंकली. या विजयानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. कोण ती महिला कुस्तीपट्टू ? जाणून घेऊ आजच्या भागात.*

हरियाणासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या, जिथे आजही भारतातील सर्वाधिक भ्रूणहत्या केल्या जातात, अशा राज्यात 3 सप्टेंबर 1992 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. वयाच्या 7 व्या वर्षापर्यंत ती आपल्या आजोळी वाढली. तिचे आजोबा एक प्रसिद्ध पैलवान होते. त्यामुळे त्यांना गावात प्रचंड मानसन्मान मिळायचा. त्यामुळे आपणही असा मानसन्मान मिळविण्यासाठी पैलवान बनायचं. असं तिनं त्यावेळीच पक्क ठरवलं होतं. 2004 साली वयाच्या 12 व्या वर्षी तिने कुस्तीचा श्रीगणेशा केला. तिने कुस्ती शिकण्याला घरातून विरोध झाला. कारण, त्या काळात मुलींनी कुस्ती खेळणे संयुक्तिक नव्हते. पण, कालांतराने हा विरोध मावळला. तिने ईश्वर दहिया यांच्याकडे कुस्तीचे डावपेच शिकण्यास सुरुवात केली. आता,बाहेरच्या लोकांनी तिच्या कुस्ती शिकण्याला आणि वस्तादांच्या शिकविण्याला विरोध सुरु केला. "कुस्ती हा फक्त पुरुषांचा खेळ आहे. मुलींनी तो खेळ खेळू नये." यासारख्या टीकांना तिला सामोरे जावे लागले. शिवाय तिच्यासोबत कुस्ती खेळणारी एकही मुलगी नव्हती. त्यामुळे तिला मुलांच्या बरोबरच कुस्ती खेळावी लागली.

सन 2010 साली ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तिनं आपलं पहिलंवहिलं पदक जिंकलं.  तिच्या यशाचा प्रवास सुरु झाला. 5-6 वर्षात तिने जिंकलेल्या पदकांमुळे तिची खोली भरून गेली होती. पण, त्यात एका पदकाची भर पडणे अजूनही बाकी होते. जे प्रत्येक खेळाडूचे स्वप्नं असतं. ते म्हणजे ऑलंम्पिकमध्ये पदक मिळविणे. ती ऑलंम्पिक स्पर्धेत पात्र होण्यात यशस्वी झाली. 2016 च्या रियो ऑलंम्पिकमध्ये तिला प्रवेश मिळाला. आता या संधीचं सोनं करण्याची सर्वस्वी जबाबदारी तिची होती. तिचा अंतिम सामना सुरू झाला. या सामन्यात सुरुवातीला ती 0 - 5 ने पिछाडीवर पडली होती. "आता ती हरणार" असं उपस्थित प्रत्येकाचं पक्क झालं होतं. पण, तिने पराभव अजून मान्य केला नव्हता. या ही परिस्थितीत 'आपणच जिंकू' असा तिचा ठाम विश्वास होता. शेवटच्या 6 मिनिटांपैकी 5 मिनिटात तिने अत्यंत चपळाईने सामना 5 - 5 असा बरोबरीत आणला. सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना तिने 2 गुण मिळवले आणि ती विजयी झाली. तिच्यातला जबरदस्त आत्मविश्वास आणि जिगरबाजपणा याठिकाणी उपयोगी आला. तिच्या विजयाला प्रतिस्पर्ध्याकडून आव्हान दिले गेले. पण, सामान्यांचा निकाल तिच्या बाजूनेच लागला, शिवाय 1 गुण अतिरिक्त मिळाला. तिने हा सामना 8 - 5 असा जिंकला. तिने कांस्यपदक जिंकले. देशाला 2016 च्या रियो ऑलम्पिक स्पर्धेतील पदकांचं खातं तिनं उघडलं आणि *महिला कुस्ती प्रकारात आतापर्यंतचं पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं. असा पराक्रम करणारी ती महिला खेळाडू म्हणजे साक्षी मलिक होय.*

*घरच्यांचा, समाजाचा विरोध, मुलगी म्हणून समाजाकडून मिळालेली हीन वागणूक, अपुऱ्या सोयीसुविधा, मुलांच्या सोबत सराव करताना महिला म्हणून येणाऱ्या समस्या, यासारख्या असंख्य अडचणींना साक्षी ने धोबीपछाड करून यशाचे शिखर गाठले आहे. साक्षी ने नियमितपणे  6 - 7 तास व्यायाम केला आहे, शिवाय वजन नियंत्रित करण्यासाठी विशेष डायटही केला आहे. ऑलम्पिकमध्ये भारतीय महिलांनी पदक मिळविणे सोपे नाही. आतापर्यंत केवळ चारच महिला अशी कामगिरी करू शकल्या आहेत. साक्षी त्यापैकीच एक. साक्षी मलिक यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव भारत सरकारने त्यांना ' पद्मश्री ' हा मानाचा किताब देऊन केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


Monday, November 19, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 65

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 65*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*एक विवाहिता, जिला स्वतःची दोन मुलं आणि मृत सवतीच्या चार मुली होत्या. नवरा कॉन्ट्रॅक्टर च्या हाताखाली काम करणारा एक साधा मजूर. मोठे कुटुंब तशा गरजा ही मोठया. पण,पगार मात्र छोटा. गरजा काही पूर्ण होत नव्हत्या. मग तिने कंबर कसली आणि तिच्या संसाराची गाडी रुळावर आणली. तिने एक असा काही पराक्रम केला कि,ती आशियातील पहिलीच महिला ठरली. चला तर मग जाणून घेऊ, आजच्या भागात, त्या विवाहितेबद्दल आणि तिच्या पराक्रमाबद्दल.*


भारतातील कोटयावधी तरुणांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक असलेल्या कन्याकुमारीत 17 एप्रिल 1959 रोजी तिचा जन्म झाला. ती अगदी लहान असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला.म्हणून, तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. वयाच्या 14 व्या वर्षी ती चारचाकी वाहन चालवायला शिकली. बालपण तसे हलाखीतच गेले आणि तरुण झाल्यावर वयाच्या 19 व्या वर्षी तिला बापाने एका 4 मुली असलेल्या विधुराच्या गळ्यात मारली. लग्नानंतर हिला 2 मुलं झाली. कुटुंबाचा पसारा वाढला होता. पण, मजूर असलेल्या नवऱ्याच्या पगाराचा विस्तार काही होत नव्हता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. काय करावे? असा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला होता. 

संकट म्हणजे संधी. तिच्यासाठी देखील संधीच. कारण, घर चालविण्यासाठी तिला घरातून बाहेर पडावे लागले. एका संस्थेत ती सचिव म्हणून काम करू लागली. घरातून बाहेर पडल्याने तिच्या प्रगतीला सुरुवात झाली.


तामिळनाडू परिवहन मंडळाने बस चालक पदासाठी जाहिरात दिली. तिला चारचाकी वाहन चालविता यायचे. नोकरीत महिलांसाठी 30 टक्के जागा आरक्षित ठेवल्या होत्या. त्यामुळे तिने यासाठी अर्ज केला. कित्येक दिवस तिला मुलाखतीसाठी बोलावणेच आले नाही. पण,ती आशावादी होती. तिने प्रयत्न सुरु केले. तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. पण,महिलांना चालक म्हणून नोकरीत घेण्यास शासन आणि प्रशासन दोन्हीही निरुत्साही होते. "या जगात खूपच कमी महिला, चालक म्हणून काम करता आहेत. आपण पुरुषांबरोबर काम करू शकाल का?"  असा प्रश्न तेथील अधिकाऱ्यांने तिला विचारला. पण, तिचा निर्धार पक्का होता. आपल्यावर उठलेल्या या प्रश्नाला पुढे तिने कृतीतूनच उत्तर दिले. तिच्या या निर्धारापुढे प्रशासनाला झुकावे लागले. 1993 साली वयाच्या 34 व्या वर्षी तिला नोकरी द्यावीच लागली. *ती आता पहिली महिला बस चालक बनली, केवळ भारतातीलच तर आशिया खंडातील पहिली महिला बस चालक. ती फर्स्ट लेडी म्हणजेच वसंतकुमारी.*


*वसंतकुमारी यांनी गाडीचं स्टेयरिंग त्या काळात सांभाळलं आहे, ज्या काळात महिला एकट्याने प्रवास करताना घाबरायच्या. आपल्या तान्हुल्यांना सोडून कधी त्या सकाळी 6 च्या शिफ्ट ला जायच्या, तर कधी रात्री 10 वाजता घरी यायच्या. ट्राफिक रुपी संकटांवर मात करत, त्या आपल्या संसाराचा गाडा चालविण्यात यशस्वी झाल्या. त्यांचा आत्मविश्वास एव्हढा मजबूत होता कि, त्यांच्या स्वप्नांच्या गाडीचा ब्रेकडाऊन कधी झालाच नाही. घरचे अत्यंतिक दारिद्र्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, महिला म्हणून असणाऱ्या मर्यादा, पुरुषांच्या बरोबरीने काम, वेळेत आणि कामात कसली ही सूट नाही, कोणतीही सहानभूती नाही, या सर्वांवर मात करून, महिलांनी परिस्थितीशी झगडून सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रेरणा असणाऱ्या वसंतकुमारी एक यशवंत आहेत.*


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 64

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 64*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*एका ध्येयवादी तरुणीने समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचे स्वप्न मनी बाळगून 1978 मुंबई ते कोलोंबो असा समुद्रमार्गे आपला पहिला प्रवास पूर्ण केला. यामुळे तिचा आत्मविश्वास आता वाढला. आता तिला समुद्रपर्यंटनाची आवड निर्माण झाली होती. 1979 मध्ये तिने इंग्लड ते तांबडा समुद्र असा प्रवास सुरु केला. पण,तिची बोट तांबड्या समुद्रात बुडाली. कसा बसा तिने आपला जीव वाचवला आणि ती भारतात परत आली. पुढे काय झाले?तिचे समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचे स्वप्नं पूर्ण झाले का? कोण ती महिला? जाणून घेऊ आजच्या भागात.*

सांगली जिल्ह्यातील करंजवडे सारख्या एका खेडेगावात, एका शेतकरी कुटुंबात 1955 साली तिचा जन्म झाला. वडील पुरोगामी विचाराचे असल्याने तिला बरेच स्वातंत्र्य होते. लहानपणापासूनच ती धाडसी होती. अतिशय जिद्दी आणि महत्वाकांक्षी होती. खो-खो, कबड्डी, हायकिंग, माउंटनेयरिंग, ट्रेकिंग आणि शूटिंग यासारख्या साहसी,आव्हानात्मक खेळात तिने हिरीरीने सहभाग नोंदवला होता. तिने शूटिंगमध्ये तर तब्बल 150 पदक जिंकले आणि राज्य, राष्ट्रीय पातळी, तसेच प्री ऑलंपिक ट्रायल्समध्ये भाग देखील घेतला. तिच्या कॉलेज च्या मित्रांमुळे तिला नौकानयन ची ओळख झाली. त्यात तिला आवड निर्माण झाली.  तिने नेव्हिगेशन चा कोर्स पूर्ण केला आणि ती निघाली आपल्या पहिलवहिल्या समुद्रप्रवासाला.

वयाच्या 23 व्या वर्षी म्हणजेच 1978 साली मुंबई ते कोलोंबो असा प्रवास समुद्रमार्गे पूर्ण केला, तो ही शिडाच्या बोटीतून. तिचा आत्मविश्वास वाढला होता. तिने 1979 साली इंग्लंड ते तांबडा समुद्र असा प्रवास करण्याचे आव्हान स्वीकारले आणि तिची बोट पळत सुटली. काही तांत्रिक गोंधळामुळे नेव्हिगेशन उपकरण अयशस्वी झाले आणि तिची बोट बंद पडली. चार दिवस ती या प्रसंगात सापडली होती. सभोवती केवळ खवळलेला समुद्र आणि जोराने वाहणारा वारा. सुदैवाने एका नॉर्वेजियन जहाजाने तिला वाचवले अन्यथा बोटीसह तिला जलसमाधी मिळाली असती.

या जीवघेण्या प्रसंगातून वाचल्यानंतर एखाद्याने समुद्र पर्यटनाला रामराम केला असता. पण, ती याला अपवाद.  मुळातच धाडसी असल्याने आणि आव्हाने झेलण्याची आवड असल्यानं ती पुन्हा पाण्यात उतरली. 1981 साली तिने इंग्लंड ते मुंबई असा सुएझ कालव्यातून यशस्वी प्रवास केला. या प्रसंगातून एखाद्या संकटाला घाबरून ध्येयापासून पळ काढू नये याचाच बोध मिळतो. आता तिच्या मनात पृथ्वीप्रदक्षिणेच्या स्वप्नाने जन्म घेतला होता. यासाठी मोठा निधी आवश्यक होता. पण, आपल्या जिद्दीने तिने तो मिळविला देखील. 

मिळालेल्या निधीतून तिने आपली बोट तयार करून घेतली आणि 13 जून 1987 साली वयाच्या 32 व्या वर्षी गेट वे ऑफ इंडिया मुंबई पासून तिने जगप्रदक्षिणेला सुरुवात केली. समुद्रातील अनेक समस्यांना तोंड देत, त्यावर मात करत 15 ऑक्टोबर 1988 ला पृथ्वीप्रदक्षिणा करून ती गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे परत आली. तिच्या या प्रवासाने एक नवा विक्रम केला होता. हा प्रवास यशस्वी करून *ती बनली समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा करणारी भारताची पहिली महिला. ती फर्स्ट लेडी म्हणजेच उज्वला पाटील धर.*

*उज्वला यांचा हा प्रवास सुगम होता; असं कोणीच म्हणणार नाही. हा पराक्रम ज्या काळात त्यांनी केला, त्याकाळात माहिती तंत्रज्ञान आजच्या एव्हढं पुढारलेलं नव्हतं. खराब हवामान, जोरदार वारे आणि प्रचंड लाटा या साऱ्या आव्हानांवर मात करत त्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा पुर्ण केली आहे. आपल्यालाही जीवनात वरील संकटांपासून पळ न काढता सामोरे जावेच लागते. त्यावर मात करून, आपलं ध्येय साध्य करण्याची प्रेरणा आपल्याला उज्वला पाटील यांच्याकडून मिळते.*

*उज्वला पाटील धर यांच्या या पराक्रमाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत..*



यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 63

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 63*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत* ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पोस्टच्या शेवटी लिंकवर क्लिक करा.*

*1982 चं वर्ष.भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्वाचं आणि आनंदाचं वर्ष. याच वर्षी देशाला पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कार मिळाले,तेही दोन.पण,या दोनपैकी एक पुरस्कार एका महिलेमुळे मिळाला."तुला पुरस्कार मिळाला खरा.पण,त्यात तुझं काम किती साधं वाटतंय?" पुरस्कार मिळाल्यावर तिला देशातल्या लोकांनी असे प्रश्न विचारून भंडावून सोडले. तिचं काम इतकं साधं होतं का? कोण ती महिला? जाणून घेऊ आजच्या भागात.*


28 एप्रिल 1929 साली तिचा जन्म कोल्हापुरातील एका सधन कुटुंबात झाला. वडील छत्रपतींचे पुरोहित, शिवाय उत्तम चित्रकारही. वडिलांची ही कला तिनेही आत्मसात केली. तिने चित्रकलेची दोस्ती केली. याच काळात तिला एका चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 

ती नऊ वर्षाची असतानाच, तिच्या वडिलांचे निधन झाले आणि दुःखाचा मोठा पहाड तिच्या कुटुंबावर कोसळला. वडिलांच्या माघारी आईने तिच्याकडे अधिक लक्ष दिले. तिच्यातील आवडू निवडी जाणून तिला शिक्षण दिले. तिची चित्रकलेचे आवड पाहून घरच्यांनी तिच्यासाठी घरीच एका शिक्षकांची सोय केली आणि चित्रकलेतील पुढील शिक्षणासाठी तिला मुंबईतील जे.जे.स्कुल ऑफ आर्टमध्ये पाठवले. तिथेही तिने उत्तमप्रकारे शिक्षण घेतले. अथक परिश्रमातून तिथे तिने सुवर्णपदक मिळविले आणि पदवी पूर्ण केली.

1956 साली तिने आपल्या चित्रपटातील करियरला सुरुवात केली. तिने आस या चित्रपटासाठी वेशभूषाकार म्हणून काम केले. तिने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि जीवापाड मेहनत केली. या चित्रपटानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.


1982 साली 55 व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात गांधी या चित्रपटाला दोन पुरस्कार प्राप्त झाले. एक होता बेस्ट पिक्चर आणि दुसरा होता सर्वोत्कृष्ट वेशभूषा. या चित्रपटासाठी तिने (वेशभूषाकार) कॉश्चूम डिझायनर म्हणून काम केले होतं आणि ती *भारतीय चित्रपटसृष्टीत ऑस्कर मिळवणारी पहिला महिला ठरली.ती फर्स्ट लेडी म्हणजेच भानू अथय्या.*

पुरस्कार मिळाल्यानंतर तिला अनेकांनी प्रश्न विचारले कि, "चित्रपटातील कलाकारांची वेशभूषा तर साधीच आहे. तुझं काम किती साधं वाटतंय?मग तु काय विशेष केलंस?" तिने उत्तर दिलं कि,"या वेशभूषेचे साधेपण हेच माझ्या कामाचं सौन्दर्य आहे. म्हणूनच मला पुरस्कार मिळाला आहे."

*भानू यांचं काम जरी साधारण वाटत असलं तरी त्यांनी केलेलं कष्ट असाधारण आहे. या कामात भानू यांनी तहान,भूक हरपून कष्ट केले आहेत. आपल्याला ही यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक कामात तहान,भूक हरपून कष्ट केलं पाहिजे. याची जाणीव भानू यांच्या प्रवासातून लक्षात येते.*

*भानू यांना त्यांच्यातील बेस्ट चा शोध खूप आधीच लागला होता. म्हणूनच, त्या बेस्ट वर अधिक फोकस देता आला. त्यांच्या यशाचं हे एक रहस्यच आहे. असं म्हणावं लागेल. भानू अथैय्या आजही ऑस्कर अवॉर्ड मिळवणाऱ्या एकमेव भारतीय महिला आहेत. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.-

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 62

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 62*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



*8 मार्च 2011 चा दिवस. पुणे ते मुंबई धावणाऱ्या रेल्वेतील एका महिलेचा तेथील काही लोकांनी सत्कार केला आणि ती रेल्वे मुंबईकडे रवाना झाली. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर त्या महिलेचा सत्कार करण्यासाठी मुंबईच्या तत्कालीन महापौर उपस्थित होत्या. काय कारण असावे बरे त्या महिलेच्या सत्काराचे? कोण ती महिला? जाणून घेऊ आजच्या भागात.*


2 सप्टेंबर 1965 रोजी तिचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी मातापित्यांच्या पोटी झाला. बालपणापासून अभ्यासात हुशार. त्यामुळे तिची कराड शासकीय तंत्रनिकेतन येथे इलेक्ट्रिक इंजिनियरिंग च्या डिप्लोमासाठी निवड झाली. तिचा डिप्लोमा कोर्स पूर्ण झाला. आता काय करायचं?असा प्रश्न तिच्या समोर निर्माण झाला. नोकरी हाच पर्याय. महिलांना कंपनीत नोकरी मिळायची. पण, वेळीअवेळी कामावर जावं लागण्यामुळे ती नोकरी टिकवणं महिलांसाठी मुश्किल होतं.


1986 साली तिच्यासाठी एक संधी चालून आली. संधी होती रेल्वेतील चालक पदासाठी. तिने जाहिरात वाचली. महिला अर्ज करू शकतात असे वाचल्यावर तिने अर्ज केला. तिने परीक्षा दिली. सायको टेस्ट झाली. मेडिकल झाले आणि तिची निवड झाली. इथंपर्यंतचा तिचा प्रवास तसा अतिशय सोपा होता. पण,पुढचा प्रवास अवघड होता. तिच्यासोबत रेल्वे प्रशासनासमोरही मोठे आव्हान होते. कारणही तसेच होते. यापूर्वी कोणत्याही महिलेने रेल्वे चालवली नव्हती. तिला हे जमेल का? ती हे करू शकेल का? हे प्रश्न जसे प्रशासना पुढे होते, तसेच ते तिच्या समोरही होतेच. पण, तिने हे आव्हान पेलले. मन लावून ट्रेनिंग पूर्ण केले.आणि ती बनली *भारतातील पहिली महिला रेल्वे चालक. ती म्हणजेच सुरेखा यादव.*

सुरेखा यांचा प्रवास जरी सोपा वाटत असला, तरी तो म्हणावा तितका सोपा नाही. मोठ्या जिद्दीनं आणि चिकाटीने त्यांनी काम केलं. त्यांनी केवळ लोकल रेल्वेच चालवली असं नाही, तर त्यांनी मालगाडी सुद्धा यशस्वीपणे चालविली आहे. 8 मार्च 2011 रोजीच्या महिलादिनी, त्यांनी पुणे ते मुंबई प्रवास करणारी, अत्यंत अवघड मार्गाने जाणारी, वेळेत पोहचण्यासाठी प्रसिद्ध असलेली, मेल गाडी श्रेणीतील डेक्कन क्वीन नावाने प्रसिद्ध रेल्वे चालवली. मेल रेल्वे चालवणारी केवळ भारतातीलच नव्हे, तर आशियातील त्या पहिल्याच महिला चालक बनल्याने त्यांच्या पहिल्या प्रवासाची सुरुवातही अन् शेवटही सत्कारानेच झाली.

*सुरेखा यांचा रेल्वेतील नोकरी करायची कि नाही?याचा विचार जेंव्हा सुरु होता, तेंव्हा त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आलेली संधी साधण्याचा निर्णय घेतला. आपल्याही जीवनात महत्वाचे निर्णय घेताना असे प्रसंग निर्माण होतात. त्यावेळी आपण पुढेच जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मी महिला आहे. मला हे जमेल का? अपयश आलं तर लोक हसतील. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, ही आणि यासारखी अनेक कारणे देऊन सुरेखा यांना आलेली संधी सोडता आली असती,जी 1986 साली रेल्वेच्या भरतीसाठी आलेली जाहिरात पाहून भारतातील त्याकाळी अनेक पात्र असणाऱ्या महिलांनी सोडली. सुरेखा यांनी संधी ओळखली आणि त्या संधीचं सोनं केलं. म्हणूनच त्यांचा फर्स्ट लेडी म्हणून भारत सरकारने सन्मान केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 61

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 61*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्या भारत देशात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती जशीच्या तशी आहे. याची प्रचिती वेळोवेळी येतंच. बऱ्याचदा स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, त्यांचे होणारे अपमान, दुखावला जाणारा स्वाभिमान यामुळे त्या मृत्यूला जवळ करता. याची अनेक उदाहरणे आपल्या पाहण्यात आली असतीलच. असाच एक प्रसंग उत्तरप्रदेशातील एका विवाहितेच्या जीवनात आला. ती विवाहिता एक वेटलिफ्टिंगची खेळाडू होती. लग्नानंतर तिला आपला खेळ कायम ठेवण्याची इच्छा होती. तिने हे आपल्या सासरच्यांना सांगितले. पण, सासरच्यांनी तिला नकार दिला. खेळ तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. त्यामुळे तिने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला..........पुढे काय झाले? ती महिला कोण? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...*


भारतातील सर्वाधिक स्त्री भ्रूण हत्त्या होणाऱ्या, दुसऱ्या क्रमांकाच्या हरियाणासारख्या राज्यात तिचा जन्म झाला. कुटुंब मोठे आणि घराची परिस्थिती देखील गरीबच. अशा वातावरणात ती मोठी होत होती. तिच्या भावाच्या प्रेरणेने तिने उच्च शिक्षण घेत वेटलिफ्टिंग करण्यास सुरुवात केली. तिची मेहनत सुरु झाली. काटकसर करून दिवस काढू लागली. टूथपेस्ट संपली तर कडूलिंबाच्या काड्या वापरल्या. खूपच गरज होती म्हणून एकदा मंदिरातील देवासमोरचे 15 रुपये सुद्धा उचलले. पण,ती आपल्या ध्येयापासून परावृत्त झाली नाही.


2007 पर्यंत ती अनेक स्पर्धा जिंकत राहिली. तिच्या मेहनतीचे फळ तिला 2008 मध्ये मिळाले. तिला सशस्त्र सीमा सुरक्षा दलात खेळाडू कोट्यातून नोकरी मिळाली. 2009 साली तिचे लग्न उत्तरप्रदेशातील एका तरुणासोबत झाला,जो सशस्त्र सीमा सुरक्षा दलात कार्यरत तर होताच पण,एक खेळाडूदेखील होता. 2010 साली तिने नोकरी सोडली. 2012 साली ती आई झाली. याच काळात तिच्या सासरच्यांनी तिला खेळ बंद करून ' चूल आणि मूल ' यावर लक्ष देण्यावर दबाव निर्माण केला. खेळ तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. शेवटी तिने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. पण,ती वाचली. इतकं सारं महाभारत घडल्यानंतर मग सासरचे शहाणे झाले.
ती नव्या जोमाने तयारीला लागली. 2016 साली दक्षिण आशियाई खेळात,75 किलो वजनी गटात, वेटलिफ्टिंग तिने मध्ये सुवर्णपदक मिळविले.


2017 सालं तिच्यासाठी बरंच काही घेऊन आलं. तिला यश,पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. पण, वेटलिफ्टिंगमध्ये नाही बरं का. ती आता एका नव्या खेळाकडे वळली. ती एका कंपनीशी जुळली. तिथेच तिला ट्रेंनिग मिळाले. तिने घाम गाळायला सुरुवात केली. तेथील तिचे गुरु होते दि ग्रेट खली. कंपनी होती CWE अर्थात कॉन्टिनेन्टल रेसलिंग एंटरटेनमेन्ट. इथं ती एक महिला पैलवान म्हणून, 'हार्ड केडी'  या नावाने प्रसिद्धी झोतात आली. हा खेळ तिच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. हा खेळ तिच्या WWE (वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेन्ट) मधील प्रवेशाचे तिकीट बनले. तिने WWE त प्रवेश केला आणि *WWE त प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला पैलवान बनली. ती पैलवान म्हणजे कविता देवी.*


*प्रचंड गरिबी, त्यामुळे करावा लागलेला संघर्ष अन् चोरी, लोकांची बोलणी ऐकणे, घर आणि मूल सांभाळत, घरगुती हिंसाचार, स्त्री म्हणून हेटाळणी होणे, दुय्यम वागणूक या आणि यासारख्या अनेक संकटांना तोंड देत, कविता देवी इथंपर्यंत आल्या आहेत. आपल्या कडे पाहून मुलींना कोणताही संकोच वाटू नये. यासाठी त्या WWE च्या रिंगणात त्या सलवार परिधान करून कुस्ती खेळतात. त्यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायक असा आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*



Sunday, November 18, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 60

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 60*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


1995 सालची ही घटना. एक 45 वर्षाची इंजिनियर महिला,जिचा पती एक बलाढ्य कंपनीचा मालक होता. ती विचार करत बसली होती कि,"आपण आपल्या आयुष्यातील 25 वर्षे स्वतःचं करियर घडविण्यासाठी घालवली आणि 20 वर्षे पतीच्या कंपनीसाठी दिली. ईश्वराने आज मला खुप संपत्ती दिली आहे. ती नक्कीच माझ्या हातून काहीतरी चांगले घडावं म्हणूनच ना? मग आपण काहीतरी केलं पाहिजे." या विचाराने एका सेवाभावी संस्थेचा जन्म झाला. आज त्या संस्थेचा,त्या परोपकारी महिलेचा सर्वत्र बोलबाला आहे.ती महिला कोण? ती संस्था कोणती? का यांचा इतका बोलबाला आहे? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...

19 ऑगस्ट 1950 साली तिचा जन्म कर्नाटक मधील एका खेड्यात झाला. बालपणापासूनच ती धाडसी अन हुशार. जे काही केलं,त्यात पहिलाच नंबर. ज्या काळात मुली इंजिनियरिंग निवडत नव्हत्या, त्याकाळात तिने इंजिनियरिंग करायचं ठरवलं. नुसतं ठरवलंच नाही, तर तिनं इंजिनियरिंगमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होत, गोल्ड मेडल देखील मिळवलं. आता शोध होता नोकरीचा.

एकेदिवशी वर्तमान पत्रात नोकरीसाठी एका नावाजलेल्या कंपनीची जाहिरात वाचली आणि ती आनंदी झाली. पण,तिचा हा आनंद क्षणभंगूर ठरला. त्या कंपनीत महिलां इंजिनियर ना नोकरी नव्हती. ती नाराज झाली. कंपनी करत असलेल्या अन्यायाविरुद्ध ती पेटून उठली. तिने कंपनीला एक पत्र लिहले आणि महिलांवर कंपनी करत असलेल्या अन्यायाविरोधात जाब विचारला. ते पत्र कंपनीच्या प्रमुखांनी वाचले आणि तिला मुलाखतीसाठी बोलाविले. कंपनीच्या प्रमुखांनी स्वतः तिची मुलाखत घेतली आणि तिची नेमणूक केली. ज्या कंपनीत तिला नोकरी मिळाली, ती कंपनी होती टेल्को आणि कंपनीच्या ज्या प्रमुखांनी तिची मुलाखत घेतली ते होते, जे.आर.डी.टाटा..टेल्कोत दाखल होणारी ती पहिली महिला इंजिनियर होती. तिच्या या लढ्यामुळे त्या कंपनीत अनेक महिलांना संधी मिळाली.

सन 1981 साली तिच्या ध्येयवादी नवऱ्याने कंपनी सुरु करण्याचे ठरविले. तिने केवळ आपल्याजवळची रक्कमच दिली नाही, तरआपल्या पतीच्या पाठीमागे  ठाम उभी राहिली. त्यांचे कष्ट,प्रामाणिकपणा यामुळे थोड्याच दिवसात त्यांची ती कंपनी नावारूपाला आली.

वयाच्या 45 व्या वर्षी आपल्याकडे आलेल्या संपत्तीचे कारण शोधत असताना, तिला जाणीव झाली की,"ईश्वराने इतरांचे भले करण्यासाठी आपल्याकडे संपत्ती दिलेलीआहे. त्याचा वापर समाजासाठीच आपण करायला हवा." या विचारातून एका सेवाभावी संस्थेचा जन्म झाला. *ती संस्था म्हणजे इन्फोसिस फौंडेशन आणि ज्यांच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत, त्या या फौंडेशनच्या अध्यक्षा म्हणजे सुधा मूर्ती.* 

*सुधा मूर्ती या स्वभावाने अतिशय साध्या, प्रेमळ अशा आहेत. 2 अब्ज कोटी रुपयांच्या कंपनीच्या सहमालकीण असूनही त्यांचे राहणीमान अतिशय साधे आहे. त्या परोपकारी आहेत. त्यांनी  इन्फोसिस फौंडेशन च्या माध्यमातून देशभरात अनेक सामाजिक कामं केली आहेत. दरवर्षी त्या 250 कोटी रुपयांची मदत या फौंडेशन च्या माध्यमातून केली जाते. काही लोकं यशस्वी होण्यासाठी, मोठं स्वप्न उराशी बाळगून जगत असतात. तर काही लोकांच साधेपणाने आणि परोपकारीवृत्तीने जगण्यामुळेच यशस्वी बनतात. असंच काहीसं सुधा मूर्तीच्या बाबतीत वाटतं. त्यांच्या या कार्यामुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 59

*2011 सालची घटना. ती एक नामांकित खेळाडू. अतिशय महत्त्वाची अशी आशियाई स्पर्धा चीनमध्ये भरणार होती. येणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ही स्पर्धा फार महत्वाची होती. त्या स्पर्धेत तिला सहभागी व्हायचे होते. पण,तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचे हृदयाचे ऑपरेशन करायचे होते. ज्या मुलाला आपण नऊ महिने पोटात वाढविले,दूध पाजले,त्याच्यासाठी थांबावे कि जे स्वप्न उराशी घेऊन आपण जगतोय. तिकडे जावे. तिच्यासमोर आजपर्यंतच्या आयुष्यातला सर्वात कठीण असा प्रसंग उभा राहिला होता. तिने काय निवडले? काय घडले असेल पुढे? ती खेळाडू कोण? जाणून घेऊ आजच्या भागात..*

मणिपूर राज्याच्या दुर्गम खेड्यात,गरीब आई वडिलांच्या पोटी 1 मार्च 1983 ला तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेमच. तरीही ती शिकली.

ती जेमतेम 16 वर्षांची असेल. बँकॉक मधील आशियाई स्पर्धेत माणिपूरच्या डिंको सिंह या बॉक्सर ने सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या या यशाने ती अधिक प्रभावित झाली आणि तिने ठरविले कि आपण बॉक्सर व्हायचे. घरच्यांच्या विरोधानंतर ही तिने आपले बॉक्सर व्हायचे स्वप्न सुरूच ठेवले.2000 साली वयाच्या 17 वर्षीच तिने चुणूक दाखवायला सुरु केली. तिने राज्यस्तरीय जेतेपद पटकाविले आणि घरच्यांचा विरोध मोडीत काढला. मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर तिने आपली ओळख निर्माण केली. तिने सलग पाचवेळा विश्व बॉक्सिंग स्पर्धा जिंकली. त्यातील तीन लग्नापूर्वी आणि दोन आई झाल्यावर जिंकली आहेत.

2011 ची घटना आपल्या मुलाचे हृदयाचे ऑपरेशन करण्यासाठी न थांबता ती चीनमधील आशियाई स्पर्धेसाठी निघून गेली. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, " विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात." नेमकं हेच तिने केलं. ती नुसती गेलीच नाही तर तिने सुवर्णपदक जिंकले. म्हणून तिला सुपरमॉम म्हंटले जातं. *या  सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुपरमॉमने 2012 साली भारताला ऑलम्पिक मध्ये ब्रॉन्झ मिळवून दिलं आहे. ती आयर्न लेडी,अनब्रेकेबल वुमन, सुपरमॉम म्हणजेच मेरी कोम होय.*

*मेरी यांचा प्रवास अतिशय खडतर असा आहे. घरच्यांचा विरोध, टीका, महिला म्हणून मिळालेली वागणूक,झालेले अपमान, स्वाभिमानाला पोहचवलेली ठेच. या प्रत्येक संकटाला 'पंच' मारत. त्या यशस्वी झाल्या आहेत. त्याचा ध्यास,कष्ट करण्याची तयारी,धाडसीवृत्ती हे गुण घेण्यासारखे आहेत. 2016 सालच्या रियो ऑलम्पिकमध्ये मेरी पात्र होऊ शकल्या नाहीत. त्यांची कारकीर्द संपली असे वाटत असतानाच, मेरी यांनी 2017 मध्ये व्हिएतनाम मधील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. ते ही वयाच्या 35 व्या वर्षी, तीन मुलांची आई आणि राज्यसभेची खासदार असताना शिवाय अकादमीची जबाबदारी सांभाळताना. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा द्वितीय सर्वोच्च मनाचा किताब देवून सन्मानित केले आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 58

*2002 सालची ही घटना. एक पुरोगामी विचाराचे,पेशाने इंजिनियर असलेले वडील. आपल्या कन्येला घेऊन,नागपूरमधील एका इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेशाबाबत चौकशी करण्यासाठी गेले. त्याठिकाणी एका मुलीला पाहून आणि त्या कॉलेजमध्ये तिच्या इंजिनियरींग प्रवेशाबाबत ऐकल्यावर तेथील लोकांनी,"तिला हे जमणार नाही. ती टिकणार नाही. तिने आर्मी किंवा नेव्हीत प्रयत्न करावेत." असा सल्ला देऊन परत पाठविले. कारणही तसंच होतं. 1954 पासून आतापर्यंत तिथं एकाही मुलीनं प्रवेश घेतला नव्हता. नेमकं ते कोणत्या प्रकारचं इंजिनियरींग होतं?आतापर्यंत तिथं एकाही मुलीनं प्रवेश का घेतला नव्हता? त्या मुलीनं पुढं काय केलं? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..*

ती कॉलेजमध्ये असताना एन.सी.सी.मध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे तिच्या मनात खाकी वर्दीचे आकर्षण निर्माण झाले होते. तिला सैन्यात भरती व्हायची आणि अंगावर खाकी परिधान करण्याची इच्छा होती. पण, घडलं काहीसं वेगळंच.

तिचे वडील तिला घेऊन आशियातील एकमेव असलेल्या, नागपूरमधील फायर इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेशाबाबत चौकशी करण्यासाठी गेले. यापूर्वी त्या कॉलेजमध्ये एकाही मुलीने प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे साहजिकच तिला तिथं पाहून कॉलेजमधील प्रशासन आश्चर्य चकित झाले आणि त्यांनी "तिला हे जमणार नाही."असे सांगितले. यामुळे तिचा स्वाभिमान दुखावला आणि तिने जाणीवपूर्वक याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारी ती पहिलीच ठरली. या काळात तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेक कठीण प्रसंग तिच्या समोर उभे राहिले. तरीही तिने जिद्दीने आपले संपूर्ण शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आणि 2006 साली तिची निवड ओ.एन.जी.सी. (ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन) मध्ये अग्निशमन अधिकारी पदी झाली. कॉलेजमध्ये पाहिलेलं वर्दी चढविण्याचं स्वप्न तिनं पूर्ण केलं. स्वतंत्र झाल्यानंतर भारताला 58 वर्षानंतर *पहिली महिला फायरवुमन मिळाली. ती फायरवुमन म्हणजेच हर्षिनी कान्हेकर.*

*कॉलेजमधील प्रवेश, तेथील अभ्यासक्रम पूर्ण करताना आणि पहिली महिला फायरवुमन बनताना हर्षिनी यांच्या समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. आगीप्रमाणेच त्यातील थोड्या नैसर्गिक होत्या आणि बऱ्याच मानवनिर्मित होत्या. यशाची पायरी चढताना प्रत्येक पायरीवर त्यांच्यापुढे "तुला हे जमेल का?" हा प्रश्न निर्माण केला गेला.पण,त्या मोठ्या धाडसाने,धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामोरे गेल्या. प्रत्येकवेळी त्यांनी "होय, मी हे करणारच." असे ठामपणे सांगितले. आपल्या स्वाभिमानाला लागलेली आग त्यांनी पहिली महिला फायरवुमन होऊनच विझवली. पुरुषांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी केलेल्या चंचू प्रवेशाने अनेक महिलांचा प्रवेश सुकर काही केला. हर्षिनी कान्हेकर या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 57

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 57*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*तिला बाईक्स ची खुप आवड. या बाईक्स च्या आवडीमुळेच तिचा प्रेमविवाह सैन्य दलातील एक कर्नलशी झाला. त्यांच्या संसाराच्या वेलीवर दोन फुले उमलली होती. सर्व काही उत्तम चाललं होतं. अचानक तिच्या आयुष्यात अशी घटना घडली कि, ती वयाच्या तिसाव्या वर्षी अपंग झाली. काय घडले असावे ? तिला अपंगत्व का आले असावे? तिच्या पुढच्या आयुष्यात काय घडले असेल?? जाणून घेऊ आजच्या भागात..*

ती एका सैन्य अधिकाऱ्याची मुलगी. 30 सप्टेंबर 1970 चा तिचा जन्म. कर्नल विक्रम सिंह यांच्यासोबत तिचा प्रेमविवाह झाला.

1999 चा काळ. तिच्या सुखी संसारात आता दोन मुली आल्या होत्या. तिचे पती कारगिल युद्धात सहभागी झालेले होते. अचानक तिला पाठीच्या दुखण्याचा त्रास सुरु झाला. तिला पाठीचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. तिकडे नवरा भारतमातेसाठी, देशासाठी सीमेवर लढत होता आणि इकडे ही दोन मुलींची आई आपल्या चिमुकल्यांसाठी जीवनमरणाचा लढा देत होती. तिचे ऑपरेशन झाले. पण, तिच्या छातीपासूनचे खालचे संपूर्ण शरीर लकाव्याने प्रभावित झाल्याने तिला कायमचे अपंगत्व आले. आता व्हिलचेयर ची चाक चं तिचे पाय बनले होते. 

आता तिच्या नजरेसमोर केवळ अंधार आणि अंधारच होता. नवरा टाकून देईल. अशी भीती आणि अंधकारमय भविष्य. पण, तिच्या नवऱ्याने तिला टाकले नाही. तो तिच्या पाठीशी ठाम राहिला. यामुळे तिच्या मनाने उभारी घेतली.

अपंगत्व येऊन सहा वर्षे उलटली होती. ती आता एक छानसं रेस्ट्रॉरंट चालवत होती. या निमित्ताने नवीन मित्रमैत्रिणी रोज भेटायला येत होते. त्यामुळे दिवस मजेत जात होते.

तिची बाईक्स मधील रुची एका तरुण अधिकाऱ्याने ऐकली आणि त्याने तिला या अवस्थेत बाईक शिकण्यास प्रेरित केले. सुरुवातीला तिचा नकारघंटाच वाजला. पण, ती तयार झाली. तिचा व्यायाम सुरु झाला. त्यात तिचा पोहण्याचा व्हिडिओ एका खेळ अधिकाऱ्याने पाहिला आणि तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी बोलावले.

संधी तुमचे दार ठोठावते. तेंव्हा,त्यातून जाण्याचे धैर्य ज्याच्या अंगी असते. तोच विजेता बनतो. नेमकं हेच तिने हेरलं आणि या संधीचं तिनं सोनं केलं. तिनं आपल्या मेहनतीच्या बळावर पदक जिंकलं. तिचा आत्मविश्वास वाढला.

*पोहणे,गोळाफेक आणि बाईक चालविणे या गोष्टी ती आता लिलया करू शकत होती. 2016 साली तिने पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत भारतासाठी पहिलंवहिलं रौप्यपदक मिळवलं. ते पदक मिळविणारी ती म्हणजेच दीपा मलिक.*

राष्ट्रीय स्तरावर 54 सुवर्ण पदके, आंतरराष्ट्रीय स्तरावर 13, तीन वेळा विश्वविजेत्याचा किताब, एक रौप्य पदक आणि सगळ्या स्पर्धांमध्ये कमीत कमी पहिल्या पाचात स्थान मिळविले. धडधाकट खेळाडूंबरोबर स्पर्धा करताना, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये, त्या पॅरा-स्पोर्टस् विभागातील आदर्श बनल्या.
त्यांनी प्रवाहाविरुद्ध पोहत यमुना नदी पार करुन चार लिम्का वर्ल्ड ऍडवेंचर रेकॉर्डस् केले. हिमालयन रेस मध्ये भाग घेतला, जे अतिशय अवघड मार्ग आहेत. या ठिकाणी शून्याच्या खालील तापमानात आठ दिवसांच्या काळात समुद्रसपाटीपासून 18000 फूट उंचीवरून 1700 किमी बाईक चालविली.

*दीपा यांची ही कामगिरी संपूर्ण जगाला आवाक करणारीच आहे. कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी सकारात्मक राहणाऱ्या आणि आपल्या उदाहरणातून इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या दीपा मलिक यांनी भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा किताब देऊन सन्मानित केलं आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*


यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 56

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 56*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*एका नामांकित विद्यालयाच्या कार्यक्रमासाठी त्या राज्याचे राज्यपाल आले होते. राज्यपालांच्या दिमतीला सैन्यातील काही अधिकारी होते.  त्या अधिकाऱ्यांचा रुबाब पाहून नववी च्या वर्गातील काही मुली अतिशय प्रभावित झाल्या. त्यातील काही मुलींनी मोठेपणी एखाद्या सैन्य अधिकाऱ्याशीच लग्न करण्याचे इच्छा व्यक्त केल्या. पण, एका मुलीने आपली सैन्य अधिकाऱ्याशी लग्न करण्याची इच्छा नाही. असेच ठामपणे सांगितले. तिने असे का सांगितले? यामागचे कारण काय?काय असावी तिची महत्वाकांक्षा? ती मुलगी कोण?तिचे पुढे काय झाले? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...*

तिचा जन्म शिमल्यातला. वडील पोलीस अधिकारी. त्यामुळे घरी प्रचंड शिस्त. पण,ती लहानपणापासून खोडकर. जणू टॉमबॉयच.

शाळेतील एका समारंभात तिने Aide-de-camp(ADC) अर्थात सेनाधिकाऱ्यांचा मदतनीस अधिकारी यांना प्रथमच पाहिले आणि ती प्रभावित झाली. त्यावेळी ती म्हणाली, "मी सैन्य अधिकाऱ्याशी लग्न करणार नाही. तर मी स्वतःच एक सैन्य अधिकारी बनणार." पण, त्या अजाण मुलीला हे माहित नव्हते की, भारतीय सैन्यदलात महिलांना अधिकारी होण्याची संधी नव्हतीच.

शालेय शिक्षण संपल्यावर ती वकिली चे शिक्षण घेत होती. तिला वकील होण्यात मुळीच रस नव्हता. तिला सैन्य अधिकारी व्हायचे होते. एकदा सैन्यातील भरती बाबतची एक जाहिरात तिने पाहिली. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण,हा आनंद क्षणभंगूर ठरला. तिने जाहिरात वाचली. तिच्या लक्षात आले की, यात महिलांसाठी एकही जागा नाही. सोबतच सैन्यात महिलांची भरती केली जात नाही. याचीही तिला माहिती मिळाली. ती नाराज झाली. पण, तिने आपले प्रयत्न थांबविले नाहीत.

तिने एक पत्र सेना अधिकऱ्यांना लिहले आणि त्यात महिलांना सैन्यात भरती न करण्यामागचे कारण विचारले. यावर काही दिवसातच उत्तर आले कि, लवकरच भारतीय सैन्य दलात महिलांची भरती केली जाईल. या उत्तराने ती खूपच आनंदित झाली. पण,भरतीची जाहिरात यायला 4 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला. एकदाची जाहिरात आली. तिने अर्ज भरला,परीक्षा दिली आणि ती यशस्वी देखील झाली. *ती बनली भारतीय सैन्य दलात दाखल होणारी पहिली महिला अधिकारी. ती महिला सैन्य अधिकारी म्हणजेच प्रिया झिंगन होय.*

*प्रिया झिंगन यांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्नं तेंव्हा पाहिले होते, जेंव्हा भारतीय सैन्य दलात महिलांची भरती केली जात नव्हती. स्वप्नांचा पाठलाग कसा करावा? हे प्रिया यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. सैन्य दलात महिलांना भरती होण्याचा मार्ग हा केवळ प्रिया यांच्या प्रखर निर्धाराने, महत्वाकांक्षेने, प्रयत्नानेच शक्य झाला आहे. त्यामुळे कित्येक महिला आज सैन्यदलात कर्तव्य पार पाडत आहेत. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*