🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 73*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
*तिला उत्तम नर्तिका बनायचं होतं. ती उत्तम भरतनाट्यम करायची. तिला क्रिकेटदेखील खूप आवडायचे. वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये ती सहभागी व्हायची. यासाठी तिला खूप लांब प्रवास करावा लागायचा. क्रिकेटमुळे तिचा नृत्याचा सराव जवळपास होतच नव्हता. हे पाहून, तिच्या गुरुंनी, तिच्यापुढे एक प्रश्न उभा केला, "तुला क्रिकेट किंवा नृत्य या दोन्ही पैकी फक्त एकच निवडावे लागेल". या प्रश्नाने ती खूप विचारात पडली. तिने कशाची निवड केली असावी ? क्रिकेट की नृत्य ? कोण ती यशवंत ? काय तिचा प्रवास ? जाणून घेऊ, आजच्या भागात. चला तर मग...*
3 डिसेंबर 1982 रोजी, राजस्थानमधील जोधपूर येथे, एका मध्यमवर्गीय कुटुंबात, तिचा जन्म झाला. वडील भारतीय हवाई दलात एअरमॅन होते. तिच्या आईने, मुलीच्या करियरसाठी नोकरी सोडली. ती उत्तम प्रकारे नृत्य करायची. शिवाय ती क्रिकेट ही उत्तम प्रकारे खेळायची. तिच्या वडिलांची इच्छा होती कि ,तिने क्रिकेटर बनावे. जेव्हा तिच्या गुरूंनी क्रिकेट आणि नृत्य या पैकी एक निवडण्यास सुचवले, तेव्हा मात्र तिने क्रिकेटची निवड केली आणि स्वतःला झोकून दिले.
वयाच्या 10 व्या वर्षी तिच्या क्रिकेटमधील प्रशिक्षणाची सुरुवात झाली. तिने ज्या वयात, ज्या काळात क्रिकेटची बॅट हातात धरली होती, त्या काळात मुली फक्त भातुकलीचा खेळ खेळायच्या. त्यामुळे तिला बऱ्याच वेळा क्रिकेटचा सराव मुलांसोबत करावा लागायचा. या काळात तिला अनेक बोचऱ्या टिकांनी हिणवण्यात आलं. मुलं सहजपणे म्हणायची, "अरे मुलगी आहे. हळू चेंडू टाक. तिला जखम होईल." यासारख्या टीकामुळे तिने धीर सोडला नाही. तिने हिंमत सोडली नाही.
आपल्या मेहनतीच्या जोरावर, वयाच्या चौदाव्या वर्षी, तिने भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळविले. तब्बल दोन वर्षानंतर, तिला आपला पहिला सामना खेळण्याची संधी प्राप्त झाली. प्राप्त संधीचं, तिनं सोनं केलं आणि शतक झळकाविलं. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. 2013 साली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या जागतिक क्रमवारीत, ती पहिल्या स्थानावर विराजमान झाली, शिवाय याच वर्षी भारतीय संघाची कर्णधार बनली. तिच्या नेतृत्त्वाखाली 2017 सालच्या विश्वचषक स्पर्धेत, भारतीय संघ उपविजेता ठरला. महिला संघाची, आजवरची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. क्रिकेटमधील तिच्या अतुलनीय कामगिरीमुळे, तिला "महिला क्रिकेटची तेंडुलकर" म्हणून गौरविले जाते. ती खेळाडू म्हणजेच, मिताली राज होय.
जेव्हा आपल्या समोर एकापेक्षा अधिक पर्याय असतात, तेव्हा निवडलेला पर्याय, सर्वोत्तम बनवण्यासाठी, अतोनात कष्ट करावे लागतात. आपण निवडलेल्या पर्यायामुळे आपल्यावर अनेक टीका होण्याची शक्यता असते. पण, निवडलेला पर्याय योग्यच आहे, हे सिद्ध करण्यासाठी आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची, धमक आपल्या अंगी असली पाहिजे. ही धमक आपल्या अंगी निर्माण होण्यासाठी, सातत्य आणि मेहनत या गोष्टी महत्वाच्या असतात.
भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!
No comments:
Post a Comment