Saturday, May 8, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 190

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 190*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/190.html

फाळणीनंतर भारतात आलेल्या, एका लाकूड व्यावसायिकाच्या पोटी जन्माला आलेल्या आणि आपल्या कर्तबगारीने भारतीय क्रिकेट विश्वात अढळ स्थान निर्माण केलेल्या एका धीरोदात्त खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...

6 जानेवारी 1959 रोजी एका कुटुंबात त्याचा जन्म झाला.चंदीगड येथे त्याचे वडील लाकडाचा व्यवसाय करायचे. त्यांना एकूण सात अपत्ये. त्याचा क्रमांक सहावा. 

शालेय जीवनात त्याला क्रिकेटची गोडी लागली. अशातच प्रेम आझाद या प्रसिद्ध गुरूचे मार्गदर्शन त्याला लाभले. गुरूचे मार्गदर्शन आणि त्याचे परिश्रम फळाला येऊ लागले. विविध स्पर्धात त्याने आपला दबदबा निर्माण केला. यामुळे वयाच्या 16 व्या वर्षीच त्याची निवड हरियाणा संघात झाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने दर्जेदार कामगिरी केली. म्हणून 1978 साली त्याची निवड भारताच्या मुख्य संघात झाली. त्यावेळी भारतीय संघात पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अगदी कमी कालावधीतच त्याने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखले जाऊ लागले.

त्याच्या गुणवत्तेची,कौशल्याची, कर्तुत्वाची जाण 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत पाहायला मिळाली. भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी धडपड करत होता. साखळी सामन्यातील शेवटचा सामना झिम्बाब्वे या संघासोबत होता. 'करो या मरो' सारखी स्थिती भारतीय संघाची होती. झिम्बाब्वेसारख्या नवशिक्या संघाने भारताची अवस्था 4 बाद 9 अशी करून ठेवली. अशा कठीण प्रसंगी तो मैदानात उतरला. सामन्याची सुत्रे हाती घेतली. एकट्याने खिंड लढविली. तडाखेबाज 175 धावांची नाबाद खेळी करून, त्याने संघाला विजयी केले. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वविजेतेपदही पटकाविले. तो 'हरियाणा तुफान' म्हणजेच 'कपिल देव निखंज' होय.

जीवनात बर्‍याचदा 'करो या मरो' सारखी स्थिती निर्माण होत असते. आपल्यातील क्षमतेचा कस पाहणाऱ्या परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात केलेलं कधीही बरं. असे प्रसंग तुम्ही कोण आहात ? तुम्ही काय करू शकता ? याची जाणीव जगाला करून देत असतात. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कपिल यांना त्याच्या क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. या कठीण प्रसंगात त्यांनी आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं. यामुळेच ते संघाला विश्वविजेतेपद मिळवून देऊ शकले. 

कपिल यांनी कसोटी सामन्यात 400 हून अधिक बळी 4000 हून अधिक धावा केल्या आहेत. असा पराक्रम करणारे ते जगातील एकमेव खेळाडू आहेत. क्रिकेटमधील त्यांच्या सेवेबद्दल 1991 मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 


🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: