Friday, May 7, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 189

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 189*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/189.html


एखादी संधी हातून निसटली म्हणून नाराज न होता, नव्या संधीचा शोध घेतला पाहिजे. 1983 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग असलेल्या आणि 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स' पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या एका क्रिकेटपटूला, वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षीच दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकावा लागला. असे असले तरीही नाऊमेद न होता, नव्या उमेदीने, नव्या जोमाने नवीन संधी शोधून आपले भवितव्य घडविणाऱ्या एका क्रिकेटपट्टूची ही प्रेरणादायी कथा... 

27 मे 1962 रोजी एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील डॉक्टर. त्यामुळे मुलांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे. असे वडिलांचे वाटे. यासाठी मुलांना एका नामांकित शाळेत प्रवेश घेतला. तो मात्र, याउलट वागायचा. वर्गात शेवटच्या बाकावर बसायचा. अभ्यासापेक्षा खेळात रमायचा.

नववीत असताना त्याच्या शाळेने पहिल्यांदाच क्रिकेटचा संघ तयार केला. टेनिस, विटी-दांडूवरून त्याची गाडी क्रिकेटवर स्थिरावली होती. त्यामुळे संघात स्थान तर मिळालेच. शिवाय, कर्णधार म्हणून जबाबदारी ही मिळाली. गिल्स शील्ड ट्राफी स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकावले. यामुळे 17 व्या वर्षीच त्याची निवड महाराष्ट्राच्या रणजी संघात झाली. नंतर 19 वर्षाखालील क्रिकेट संघातही निवडला गेला. यामुळे भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. 1981 साली इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 1983 च्या विश्व विजेत्या संघाचा तो महत्वाचा भाग बनला. 

1985 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड चैंपियनशिप ऑफ क्रिकेट मध्ये त्याने महत्वपूर्ण कामगिरी केली. त्यामुळे त्याला 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स' पुरस्काराने सन्मानित केलं गेेलं. याच दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात त्याने सलग सहा षटकार मारून गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. सलग सहा षटकार मारणारा, तो 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स' म्हणजे रवी शास्त्री होय.

कारकीर्द ऐन रंगात असताना त्यांना दुखापतीने पछाडले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षीच त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकावा लागला. सूर्यास्तानंतर सूर्योदय होतच असतो. अठरा महिन्यांच्या विश्रांतीनंतर समलोचकाच्या भूमिकेत त्यांचा सूर्योदय झाला. 'फलंदाजी' आणि 'गोलंदाजी' सोबत त्यांची 'बोलंदाजी' देखील अप्रतिम केली. यामुळे रसिकांच्या मनावरील त्याचे गारुड विरले नाही.

एखादी संधी आपल्याकडून हिरावून गेली असली तरी, नाराज व्हायची गरज नाही. दुसऱ्या संधीसाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे. तिचा शोध घेण्याची आणि त्याचं सोनं करण्याची वृत्ती आपल्यात जागृत असली पाहिजे. अवेळी निवृत्त झाल्यानंतर समालोचक आणि प्रशिक्षक या सारख्या विविध संधी शोधून, शास्त्री यांनी त्या साधल्या. म्हणूनच, ते यशाच्या शिखरावर विराजमान आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: