Saturday, December 15, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 84


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 84*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

एक नशेच्या आहारी गेलेल्या, वाया गेलेल्या अन् वयाच्या सतराव्या वर्षीच, गर्भवती बनलेल्या, एका आईच्या खडतर प्रवासाची, ही प्रेरणादायी कथा...

2 एप्रिल 1975 रोजी डायने एम आणि माइकल माल्लेट यांच्या पोटी तिचा जन्म झाला. बालपण अतिशय वाईट अनुभवांनी भरलेले. याकाळात शेजारी–पाजारी अन् नातेवाईकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

वयाच्या नवव्या वर्षी, तिला गायन आणि अभिनयात तिला आवड निर्माण झाली. दहाव्या वर्षापासून स्थानिक टी.व्ही. वर ती कार्यक्रम करू लागली. किशोर वयातच ती दारू आणि ड्रग्स च्या आहारी गेली. एकदा तर तिने नशेतच, शाळेतील काही वस्तू पेटवून दिल्या. यामुळे प्रशासनाने तिला शाळेतून निलंबीत केले. या प्रकारामुळे तिने पालकांचा विश्वास  गमावला. आपल्या चैनीसाठी तिने ड्रग्स ची विक्रीदेखील केली. 15 व्या वर्षी तिची भेट एका तरुणाशी झाली होती. दोघे प्रेमात आकंठ बुडाले. पण,नंतर तोही तिला सोडून गेला.

ती नैराश्याच्या गर्तेत सापडली. तिने स्वतःला ट्रक च्या समोर झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, ती वाचली. स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची तिने तयारी केली. यासाठी तिने धर्मगुरूंचा सल्ला घेतला. धर्मगुरूंमुळे तिला जगण्याचे नवे बळ मिळाले. नवा आत्मविश्वास मिळाला.

सोडून गेलेला प्रियकर, काही दिवसांनी परत तिच्याकडे आला. पुन्हा एकदा दोघे प्रेमात आकंठ बुडाले. पण, हा आनंद, पाहिल्यासारखाच क्षणभंगुर ठरला. ती 17 व्या वर्षीच गर्भवती बनली. गर्भपात करणे आणि बाळाला जन्म देणे. या दोनच पर्यायांपैकी, तिने दुसरा निवडला आणि एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर लगेचच दोघेही पुन्हा विभक्त झाले. आता मुलाला पालनपोषणाची सर्वस्वी जबाबदारी, तिच्या एकटीवर आली होती. ती अधिक सजग अन् जबाबदार बनली. तिच्या मुलाला वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच संगीतात गोडी निर्माण झाली. कधी तो गिटार वाजवायचा, तर कधी ड्रम. तिने त्याचे छंद जोपासले. तो 12 वर्षाचा असताना, त्याच्यातल्या उत्तम गायकाचा शोध तिला लागला. तिने त्याच्या या गुणाला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं. तिला स्वतः गायनातील ज्ञान असल्याने, ती त्याचा घरातच गायनाचा सराव घेऊ लागली. मुलाला रेडिओ वर गाण्याची संधी मिळावी, म्हणून रेडियो स्टेशनच्या चकरा मारू लागली. पण, त्याचं वय पाहता त्याला नाकारलं जाऊ लागलं. तिने प्रयत्न करायचे थांबविले नाहीत.

विविध स्पर्धात सहभागी होण्यासाठी,ती मुलाला प्रोत्साहित करू लागली. त्याच्या गाण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून  youtube  वर प्रसारित करू लागली. तो गोड गळ्याचा असल्याने, अल्पावधीतच त्याची गाणी आणि तो, दोन्ही लोकप्रिय झाली. आली. एका कंपनी सोबत, त्याचा करार झाला. त्याचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला. त्याच्या आवाजात एव्हढी जादू होती कि, अल्पावधीतच तो स्टार झाला. तो स्टारगायक म्हणजेच जस्टीन बिबर आणि या जस्टीनचं करीयर अल्पावधीतच घडविणारी त्याची आई म्हणजेच पेट्रीसिया मॅल्लेट(बिबर).

पेट्रीसिया यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर आहे. बालपणी झालेले अत्याचार, त्यातून लागलेली व्यसने, निर्माण झालेली बंडखोरी, अल्पवयात झालेले प्रेम, त्यातून आलेले मातृत्व आणि नवऱ्याने झटकलेली जबाबदारी, एकटं पालकत्व या सर्वातून मार्ग काढत त्यांनी आपल्या मुलाचं भविष्य घडविले आहे. मुलाचं करियर घडविताना, स्वतः चं  करियरदेखील घडविलं आहे. मुलाचं करियर घडविताना, स्वतः चं  करियरदेखील घडविलं आहे. त्या एक चित्रपट निर्मात्या,उत्तम लेखिका म्हणून सर्वश्रुत आहेत.

जीवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगापासून पळ काढण्यासाठी, लोकं व्यसनांचा, आत्महत्येचा मार्ग निवडतात. व्यसन आणि आत्महत्या हा समस्यांवरील पर्याय नाही. त्याच एक समस्या आहेत. ज्यावेळी जीवनाला एखादे ध्येय मिळते, तेंव्हा जगण्याला नवे बळ मिळते. व्यसन आणि आत्महत्येसारख्या, मैदान सोडण्यास भाग पडणाऱ्या समस्याच, आपोआप मैदान सोडून बाजूला होतात. आपण आपल्या जीवनाचे साध्य निश्चित केले पाहिजे. पेट्रीसिया यांना आपल्या मुलाच्या आणि त्याच्या करियरच्या निमित्ताने जीवनाला नवे साध्य मिळाले. त्यांच्या जगण्याला नवे बळ मिळाले. मुलाचं भविष्य घडविताना, त्यांनी स्वतः चं  भविष्यही घडविलं आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.



जस्टीन बिबर चा संघर्ष वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

No comments: