Monday, November 12, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 30

कमी वयात यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या व्यक्तींकडे कोणतीही जादूची कांडी असत नाही. ते तर त्यांच्या मेहनतीचं फळ असतं. त्यांनी आपल्यातल्या ' बेस्ट ' ला वेळीच ओळखलेलं असतं आणि त्याच्यावरच त्यांचा अधिक ' फोकस '  असतो.

असा एक तरुण आहे. ज्याची निर्मिती दररोज आपल्या सोबत असतेच. आपल्यातल्या बेस्ट ची त्याला लहानपणीच जाणीव झाली. त्याला दिशा मिळाली. त्यानं आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर साऱ्या जगाला एकाच धाग्यात बांधलं. कमी वयात यशस्वी झाला. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं.
आता तुम्हांला प्रश्न पडला असेल. साऱ्या जगाला एका धाग्यात बांधणारा तो धागा कोणता? त्या तरुणानं असं काय केलं? कि,तो कमी वयात यशस्वी झाला. तो तरुण यशवंत कोण? जाणून घेऊया आजच्या भागात. चला तर मग..

आईवडील डॉक्टर असणाऱ्या एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्यामुळं लहानपणापासूनच त्याला संगणक हाताळायला मिळाला. त्याची संगणकातील आवड पाहून वडिलांनी त्याला रागावण्याऐवजी, खच्चीकरण करण्याऐवजी त्याला  प्रेरणा, पाठबळ दिली. त्याच्यासाठी एका शिक्षकाची सोय केली. ज्या वयात आपली मुलं गेम खेळतात, त्या वयात त्यानं गेम बनवायला सुरुवात केली. वडील दवाखान्यात असताना त्यांच्या संपर्कात राहता यावे. यासाठी त्यानं एक संगणकीय सॉफ्टवेअर देखील बनवलं.

बालपणात संगणकाविषयी निर्माण झालेली आवड, त्यावर जडलेलं प्रेम कॉलेजमध्ये सुद्धा कायम राहिलं. कॉलेज जीवनातच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आपल्याला व आपल्या मित्रांना सदैव संपर्कात राहता यावे. गप्पा मारता याव्यात. या हेतूने त्याने एका वेबसाईटची निर्मिती केली. एक अशी वेबसाईट कि, ज्यावर जगात कुठेही राहणाऱ्या व्यक्ती आपसात संपर्कात राहतील. गप्पा मारतील. फोटो,व्हिडीओ पाहतील. हीच तर सुरुवात होती भविष्यातल्या त्सुनामीची. आपण आणि आपले मित्र यांसाठी मर्यादित असलेल्या या वेबसाईटची सुरुवात होती. जगाला एकत्र बांधणाऱ्या धाग्याची आणि तो धागा म्हणजेच फेसबुक. आणि त्याचा निर्माता असलेला तो तरुण म्हणजेच.........बरोबर ओळखलं. मार्क झुकेरबर्ग.

प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला खुप मोठा संघर्ष हा ठरलेलाच असतो. मार्क ला मिळालेले यश हे सहज साध्य नव्हते. त्याचा विचार भव्य होता, म्हणून त्याच्या समस्या देखील भव्यच होत्या. व्यवसायातील शून्य अनुभव, भांडवलाची कमतरता, बेभरवशी लोक आणि सर्वात महत्त्वाचे त्याचं कमी असलेलं वय. तरी सुद्धा त्यानं धाडस केलंच आणि आज तो जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अग्रभागी आहे म्हणूनच मार्क एक यशवंत आहे.

माझं वय नाही. माझ्याकडे अनुभव नाही. भांडवल नाही. मी हे करू शकणार नाही ? यासारख्या नकारात्मक विचारांना  मार्क ने भीक घातली नाही. त्याचा स्वतःवर,आपल्यातल्या ' बेस्ट ' वर त्याचा विश्वास होता. म्हणूनच तो आज यशाच्या अत्युच्च शिखरावर आहे.






No comments: