Monday, November 12, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 26

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या यशस्वी लोकांचे जीवन आणि त्यांच्या संघर्ष आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारा असा असतो.

यशवंतांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांची यशोगाथा यशवंत - एक प्रेरणास्रोत च्या पहिल्या पर्वात आपल्या समोर मांडला होता.
वाचकांनी पहिल्या पर्वात दिलेल्या भरघोस प्रतिसादातून, मिळालेल्या प्रेरणेतून, दुसऱ्या पर्वातील लेखनाला सुरुवात करतो आहे. हे पर्व ही आपल्या पसंतीस उतरेल. अशी आशा आहे.

काही माणसं अशी कामं करतात कि,सारं जग त्यांना लक्षात ठेवतं. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ही माणसं यशाच्या अतिउच्च शिखरावर पोहचतात. ज्यामुळे त्यांना विसरणे केवळ अशक्य होऊन जाते. आज आपण अशा एका क्रिकेटपटूबद्दल जाणून घेणार आहोत की,ज्याचं नाव ऐकताच प्रतिस्पर्धी  खेळाडूंच्या अंगावर काटा उभा राहतो.

आज यशाच्या शिखरावर असलेल्या या खेळाडूला आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले आहे.
घरी अत्यंत दारिद्र्य.
दोन वेळच्या जेवणासाठी याच्या कडे पैसे नसायचे. बऱ्याच वेळा उपाशीपोटी झोपी जावे लागे.
आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या खेळाडू ला प्लास्टिक च्या बाटल्या आणि कचरा सुद्धा उचलावा लागला.
एकदा तर त्याला चोरी सुद्धा करावी लागली.
अतिशय दारिद्र्यामुळे त्याला शिक्षण सुद्धा अर्धवट सोडून द्यावे लागले.
असं म्हणतात की, '' एखाद्या व्यक्तीला जर काही करून दाखवायचं असेल, तर प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर तो आपलं काम यशस्वी करून दाखवतोच." असंच काहीसं या क्रिकेटपटूच्या बाबतीत घडलं. वयाच्या 19 व्या वर्षी तो एक चांगला फलंदाज बनला. आपल्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर एक उत्तुंग षटकार ठोकला आणि आज तो षटकारांचा बादशहा म्हणून ओळखला जातो. तो बादशहा म्हणजेच क्रिस गेल.

आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 1 धाव करू शकणारा गेल विश्वचषक स्पर्धेत द्विशतक झळकवणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

आपण कोठून आलो आहोत? यापेक्षा आपल्याला कोठे जायचं आहे? यावर लक्ष ठेवून मार्गक्रमण करणारी लोकंच यशाच्या शिखरावर पोहचतात.

आपल्यात असणारी जमेची बाजू ओळखून गेलनी यशाचा पल्ला गाठला. म्हणूनच, तो मला एक यशवंत वाटतो.

आपल्या आयुष्यात अनेक संकटरुपी यॉर्कर येत असतात. या यॉर्कर्स ना आपण घाबरलो तर, आपण बाद झालोच म्हणून समजा. पण, असे यॉर्कर ओळखून, त्याचं संधीत रूपांतर केलं पाहिजे. तरच अशी संकटं 'सीमारेषे' पार होतील आणि आपला यशाचा मार्ग मोकळा होईल. आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटरुपी यॉर्कर वर कसा षटकार ठोकावा ? याचा धडा क्रिस गेल कडून शिकायला मिळतो.




No comments: