Wednesday, December 12, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 82

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 82*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

एक टेनिस खेळाडू बनविण्यासाठी, एका पालकांनी आपल्या गर्भातल्या बाळावर टेनिसचा गर्भसंस्कार केला. त्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली. ती मुलगी टेनिस खेळाडू बनली का ? जिच्यावर गर्भ संस्कार झाले, ती महिला कोण ? गर्भसंस्काराचा फायदा झाला का ? तिला टेनिस खेळाचा चक्रव्यूह ' स्मॅश ' करता आला का ?  काय आहे तिचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात...*

अमेरिकेतील मिशिगन येथील आफ्रिकन– अमेरिकन असलेल्या, औरेसिन नामक स्त्री ला आई होण्याची चाहूल लागली होती. त्यावेळी पती रीचर्डने, गर्भात आकार घेणाऱ्या बाळाला, टेनिस खेळाडू बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने औरेसिनला, टेनिसवर आधारित पुस्तके आणून दिली. टेनिस सामान्यांचे व्हिडिओ दाखवले. यासोबतच, तिला टेनिस मॅच पाहण्याचा आग्रह देखील केला. रीचर्ड यांना वाटायचं की, गर्भातले बाळ आईच्या माध्यमातून टेनिसविषयी प्रेरित होईल आणि बाळाची टेनिस खेळाडू बनण्याची, वाट सोपी होईल.

26 सप्टेंबर 1981 रोजी, औरेसिनने एक मुलीला जन्म दिला. ती चार वर्षाची झाली, त्यावेळी तिच्या वडिलांनी, तिच्या हातात टेनिसचे रॅकेट दिले. आपल्या तीन बहिणींसोबत, ती टेनिस खेळू लागली. तिच्या वडिलांनी टेनिसच्या सरावावर अधिक भर दिला. तिच्यावरती केलेल्या संस्कारांचा, घेतलेल्या श्रमाचा परिणाम म्हणूनच, साडेचार वर्षाची असतानाच, तिने आपली पहिली स्पर्धा जिंकली. दहा वर्षाची होताहोता, तिने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेवून, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. तिने वयाच्या तेराव्या वर्षापासून, कडक उन्हांमध्ये सहा–सहा तास सराव केला. याच खडतर सरावाने, तिच्या मजबूत बाहुंसारखाच, तिचा हेतू सुद्धा मजबूत बनला. ती वडिलांच्या कडक तालमीत तयार झाली.

1995 पासून तिने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये, आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यावेळी तिचा जागतिक क्रमवारीतील क्रमांक 304 होता. ती वर्षभरातच पहिल्या 100 मध्ये पोहोचली. तिच्या या कामगिरीने, संपूर्ण जगाचे लक्ष तिच्याकडे केंद्रित झालं. 2002 हे तिच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष राहिलं. याच वर्षी तिने सर्व सामने जिंकले आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाली. *2003 मध्ये, तिने वर्षभरातील सारे ग्रॅण्ड स्लॅम जिंकले आणि इतिहास बनवला. तिच्या या पराक्रमामुळे, तिला एक टोपणनाव मिळाले ' सेरेना स्लॅम '. ती ' सेरेना स्लॅम ' म्हणजेच सेरेना विल्यम्स होय.*

टेनिस आणि जीवन यात बरंच साम्य आहे. खेळातील प्रतिस्पर्धी म्हणजे एक संकटच. तो आपल्यासमोर वेगवेगळी आव्हानं उभी करत असतो. ती आव्हानं केवळ गर्भसंस्काराने, रंगरूपाने परतावून लावता येत नाहीत. त्यासाठी अंगी गुणवत्ता असावी लागते. ही गुणवत्ता सातत्याच्या आणि खडतर सरावाच्या संस्काराने निर्माण होते. सेरेनाने देखील पराभव आणि दुखापत, यातून येणारं मानसिक दडपण, नैराश्य यासारख्या समस्यांना ' स्मॅश ' करत, 39 वेळा ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करून, यशाचं शिखर काबीज केलं. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर, अमेरिकेला ऑलंपिक स्पर्धेत 4 सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: