Monday, March 30, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 131

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 130*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

आजवर आपण स्पायडर मॅन, बॅटमॅन सारख्या 'रिल हिरोज' च्या बाबतीत खूप ऐकलंय आणि पाहिलंयही. बरीच वर्षं हे 'रिल हिरोज' आपल्या मनामध्ये घर करून आहेत. " रियल हिरो " चा हा प्रेरणादायी प्रवास...

आसाम. सप्त भगिनींचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य. ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात वसलेलं, चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं आणि अनेक वैशिष्ट्यांनी नटलेलं राज्य. याच राज्यात ब्रह्मपुत्रेच्या तीरावर वसलेल्या मिशिंग ट्राईब खेड्यात,1963 साली मोलई चा जन्म झाला. 

1979 सालची एक घटना. ब्रह्मपुत्रा नदीला मोठा महापूर आला. महापुरामुळे बेटावर आश्रय घेतलेले शेकडो साप मारून पडलेले मोलई च्या निदर्शनास आले. 16 वर्षाचा मोलई. अतिशय संवेदनशील मनाचा. परिसरात, निसर्गात घडलेल्या घटनांचा अतिशय बारकाईने विचार करणारा. 

"असे का घडले ?" हे शोधण्यासाठी त्याने गावातील लोकांना विचारणा केली. "बेटावर मोठ्या प्रमाणात वाळू आहे. शिवाय वारंवार येणाऱ्या महापुरामुळे बेटावरील सर्वच झाडे वाहून गेल्यामुळे, एकही झाड शिल्लक नसल्याने, सापांना सावली मिळाली नाही. त्यामुळे साप वाळूत तडफडून मेले." असे कारण त्याला समजले. शिवाय "बेटावर झाडे लावणे." हा एकच उपाय असल्याचे लोकांनी त्याला सांगितले. 

त्या बेटावर मोठ्या प्रमाणात झाडे असावीत. असं स्वप्नं त्यानं पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी, तो संवेदनशील बालक मोलई कामाला लागला. नावेने अर्धा तास प्रवास करून नदी पात्र पार करून, तेवढाच वेळ चालत जाऊन ब्रह्मपुत्रेच्या त्या बेटावर, वाळवंटात त्याने 20 झाडे लावून सुरुवात केली. 

अतिशय तीव्र इच्छेने पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरतंच. त्याच वर्षी वनविभागाने त्या बेटावर 200 एकर परिसरात झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली. मोलईदेखील या मोहिमेत रोजंदारीवर सहभागी झाला. पाच वर्ष काम करून वनविभागाचे कर्मचारी निघून गेले. पण, मोलई ला ते संपूर्ण बेट हिरवंगार करायचं होतं. त्याने स्वतःला या कामी वाहून घेतले.

दररोज न चुकता बेटावर जाणे.आणखी झाडे लावणे.झाडांची काळजी घेणे. हा त्याचा नित्यक्रम. गेली 40 वर्षे तो हेच काम न चुकता, न कंटाळता, अखंडपणे सुरू आहे. एक- एक झाड लावत त्याने आजवर 1250 एकर परिसरात जंगल उभे केले आहे. तेही अगदी निस्वार्थी भावनेनं. कोणत्याही शासकीय मदती शिवाय. त्यामुळेच त्याचा गौरव "द फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया" असा केला जातो. तो फॉरेस्ट मॅन म्हणजेच जादव पेयांग उर्फ मोलई. 

"प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे!" हे सुभाषित मोलई यांच्यासाठी तंतोतंत लागू पडते. त्यांनी गेली 40 वर्षे मोलई न थकता, न थांबता आपण योजिलेलं काम अखंडपणे करत वाळवंटात जंगल फुलविलं. 

यशस्वी होणं म्हणजे केवळ श्रीमंत होणं नव्हे. तर यशस्वी होणं म्हणजे आपली स्वप्नं सत्यात आणणं होय. आपलं स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी अथक कष्ट करण्याची प्रेरणा मोलई यांच्या जीवन प्रवासातून मिळते. 

मोलाई यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 2015 साली पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद !!!!!


🎯 एका विक्षिप्त मुलाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/08/105.html




No comments: