Tuesday, March 31, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 132

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 भाग - 132

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/132.html

सप्त भगिनींचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील, मेघालय राज्यातील एका आदिवासी महिला शिक्षिकेचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ आजच्या भागात... 

मेघालय राज्यातील जयंतिया हिल्स जिल्हामधील मुलीह या छोट्याशा गावात एका गरीब आदिवासी, शेतकरी कुटुंबात 1967 साली ट्रिनिटी चा जन्म झाला. लहानपणापासून हुशार आणि चौकस. आपल्या या गुणांच्या जोरावर तिने शिक्षिकेची नोकरी मिळविली. पण, तरीही तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळविणे, आवश्यक वाटू लागल्याने, 2003 साली ती शेती व्यवसायाकडे वळली.

या वर्षी तिने शेतात हळदीचे उत्पादन घेतले.पण, उत्पन्न कमी मिळाल्याने ती निराश झाली. हा तिचा फसलेला पहिला प्रयत्न. शेजारपाजारच्या महिलांनी तिला नोकरीवरच लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. पण, ट्रिनिटी हार मानणाऱ्यातील नव्हती. त्यामुळे तिने अधिक सजगपणे पुढे जाण्याचा निर्धार केला.

आपले शेतीतील उत्पादन कसे वाढविता येईल ? यासाठी ती अधिक चौकशी करू लागली. हळद आणि लागवडी विषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू लागली. तेंव्हा तिला एक गोष्ट लक्षात आली की, ती आणि तिचे गावकरी ज्या जातीच्या हळदीचे उत्पादन घेतात, ती दर्जा, मागणी, किंमत आणि उत्पादनाच्या बाबतीत अतिशय कमी होती. त्यामुळे जास्त उत्पन्न मिळवून देणारी हळदीची जात निवडूनच त्याची लागवड करावी. या निष्कर्षाप्रत ती आली.

नव्या हळदीच्या जाती बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी तिने कृषी विभाग आणि मसाला बोर्ड यांच्याशी संपर्क साधला. बोर्डाने तिला ऑरगॅनिक प्रमाणपत्र दिले आणि तिचा मार्ग सुकर झाला. या वर्षी तिने लॅकाडाँग जातीची अधिक गुणकारी आणि मागणी असलेली हळदीची लागवड केली. तिचे उत्पन्न तिप्पट झाले.

ज्या महिलांनी तिला टोमणे मारले. त्याच महिला आता तिच्याकडे लॅकाडाँग जातीची हळद लागवड करण्याबाबत सल्ला मागू लागल्या. ट्रिनिटी शेतकऱ्यांची शेती शिक्षिका बनली. तिने गावातील सर्व महिलांना कृषी विभाग आणि मसाला बोर्ड यांच्याशी जोडले. त्यांना ऑरगॅनिक प्रमाणपत्र मिळवून दिले. आज ट्रिनिटी च्या मार्गदर्शनाखाली तब्बल 900 शेतकऱ्यांनी एकत्रित 1000 हेक्टर जमिनीवर लॅकाडाँग जातीची हळद लागवड करून स्वतःचे उत्पन्न तिप्पट केले आहे. शिवाय दरवर्षी हळदीचे सुमारे 30 हजार टन इतके उत्पादन घेतले जात आहे. अशी कामगिरी करणारी ट्रिनिटी परिसरात "टर्मरिक ट्रिनिटी" या नावाने प्रसिद्ध आहे. ही "टर्मरिक ट्रिनिटी" म्हणजेच "ट्रिनिटी सायू" होय.

ट्रिनिटी यांनी स्वतःचे उत्पन्न तर वाढवलेच, शिवाय आपल्या सोबत अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ केली आहे. ट्रिनिटी यांच्या शेतीक्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने 2020 सालचा पद्मश्री हा मानाचा किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 

ट्रिनिटी यांना आपल्या पहिल्यावहिल्या प्रयत्नात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. टोमणे देखील ऐकावे लागले. मानसिक त्रास सहन करावा लागला. आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. झालेल्या नुकसानीमुळे शेती सोडण्याचा, स्वतःपुरता स्वार्थी विचार करण्याचा मार्ग त्यांच्यापुढे होता. परंतु, तोट्यात असलेली शेती नात्यात आणून स्वतःला सिद्ध करायचा, आणि आपल्या सोबत आपल्या समाजाचे उत्पन्न वाढविण्याचा त्यांचा निर्धार होता. आपल्या समोर असलेली समस्या सोडविण्यासाठी, त्याचा सखोल अभ्यास करूनच, ती समस्या मुळापासून उखडून टाकता येवू शकते. याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्या "टर्मरिक ट्रिनिटी" होऊ शकल्या.  म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
*श्री संदीप पाटील, दुधगाव.*
*9096320023.*



🎯 शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोल वृध्दी हा मोलाचा सल्ला देणाऱ्या शेती शास्त्रज्ञाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/10/122.html



No comments: