Tuesday, March 31, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 133


🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 133

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/133.html


मुंबईमध्ये आयकर विभागात चांगल्या पदावर असलेल्या अंकल नी, एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, नोकरी सोडून दिली. या अंकल चे पुढे काय झाले असावे ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

अंकल यांचा जन्म केरळमधला. ते मुंबई येथे आयकर विभागात एका उच्च पदावर कार्यरत होते. नोकरी सोडण्याचा अन् वेगळं काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. या विचाराला बळकटी दिली, ती भारत भ्रमणाने. या प्रवासात वेगवेगळ्या भागात जाऊन स्थानिक समस्या जाणून घेतल्या.

जीवन जगण्यासाठी, केवळ पैसे मिळविण्यापेक्षा एक उत्तम मार्ग त्यांना सापडला. जीवनाचे नवे ध्येय त्यांना गवसले आणि 1979 साली नोकरी सोडून ईशान्य भारतातील, अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागातील, वंचित मुलांची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन, लोहित या जिल्ह्यात काम करायला सुरुवात केली. 1996 पर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून एका संस्थेत काम केले.

मुलांच्या विकासात पुस्तकांचे, ग्रंथांचे स्थान मोठे आहे. यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होते. असे त्यांचे मत होते. ग्रंथालयांचे महत्व ओळखून, 2007 मध्ये लोहित युवा ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून, बांबोसा ग्रंथालयांची उभारणी सुरू केली. आज संपूर्ण अरुणाचल प्रदेशात 13 बांबोसा ग्रंथालय आहेत आणि यामध्ये लोकसहभागातून जमा केलेली, तब्बल 10000 पुस्तके आहेत. त्यांनी ग्रंथालये सर्वसामान्यांच्या जवळ नेण्याचे काम केले. मुलांसाठी ते स्तंभ लेखन करतात. यामुळेच ते परिसरात "अंकल मूसा" या नावाने ओळखले जातात. हे "अंकल मूसा" म्हणजेच "सत्यनारायण मुंदयुर" होय. 

शिक्षण आणि वाचन संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी गेली चार दशकं ते अरुणाचल प्रदेशात काम करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव भारत सरकारने त्यांना 2020 सालाचा पद्मश्री हा मानाचा किताब देऊन केला आहे. 

विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली माणसं ध्येय पूर्ण होई पर्यंत झटतच राहतात. मग काळाचं आणि वेळेचं भानंच राहत नाही. ध्येपूर्तीसाठी त्याग महत्त्वाचा असतो. नोकरीचा,पैशाचा आणि ऐन उमेदीच्या चार दशकांचा त्याग अंकल मूसा यांनी केला आहे. यामुळेच ते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकले आणि म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
*श्री संदीप पाटील, दुधगाव.*
*9096320023.*




🎯 अॅपल कंपनीतून हकालपट्टी केल्यानंतर नाराज न होता, निराश न होता धैर्याने काम करून पुन्हा अॅपल कंपनीत मानाचे स्थान मिळविणाऱ्या व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/08/106.html

No comments: