Thursday, April 2, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 134


🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 134

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/134.html

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक 21 वर्षांचा तरुणाला अपंगत्व आले. आलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी तो शिक्षक बनला. त्या दिव्यांग शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

धरतीचा स्वर्ग म्हणताच ओठांवर एकच नाव येतं, ते म्हणजे काश्मीर. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या राज्याला दहशतवादी कारवायांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा स्वर्ग, नर्क होतोय की काय ? अशी शंका वाटते आहे. कित्येक कुटुंबं या दहशतवादी कारवायांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. अशाच एका दहशतवादी हल्ल्याला अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहाडा या दुर्गम खेड्यातील एका तरुणाला सामोरे जावे लागले.

21 मार्च 1996 चा तो दुर्दैवी दिवस. त्याच्या काकांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. झालेल्या गोळीबारात काकांचा मृत्यू झाला आणि पाठीत गोळी लागल्याने तो कायमचाच अपंग झाला. स्वतः ला ना उठता यायचं. ना बसता. चालणं तर दूरच. हे सारं घडलं, त्यावेळी तो केवळ 21 वर्षांचा होता. या परिस्थितीत तो वर्षभर अंथरुणावरच पडून होता.

सगळं काही गमावून बसलेला तो, एकेदिवशी आपल्या पुढील जीवनाचा विचार करत बसला होता. बाहेर लहान मुलांचा दंगा ऐकु येवू लागला. त्याच्या डोक्यात एक विचार आला. तसे त्याने त्या मुलांना घरात बोलावून घेतलं आणि सुरू झाला एक नवा अध्याय. त्याने मुलांची शिकवणी सुरु केली. तो शिक्षक बनला. त्याच्या जगण्याला आधार मिळाला. जीवन जगण्याचा नवा मार्ग मिळाला. चार वर्ष तो अंथरुणावर बसूनच मुलांची मोफत शिकवणी घेऊ लागला. यामुळेच त्याचा आत्मविश्वास वृध्दींगत झाला.

आता तो पुढील शिक्षणासाठी बाहेर पडला. यामुळेच तर त्याला दिव्यांगांच्या समस्यांची जाणीव झाली. त्याला त्याच्या जीवनाचे नवे ध्येय गवसले. आपले संपूर्ण जीवन दिव्यांगांसाठी अर्पण करण्याचा त्याने निर्धार केला. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कामाला सुरुवात केली. 2007 साली आपल्या आजीच्या नावाने दिव्यांग मुलांसाठी शाळेची स्थापना करून अध्यापनाला सुरुवात केली. आजवर या शाळेच्या माध्यामातून शेकडो मुलांना शिक्षण दिले आहे,तेही मोफत. यासाठी गेली दोन दशकं तो झटतो आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने "पदमश्री" हा मानाचा किताब देवून त्याचा गौरव केला आहे. तो दिव्यांग शिक्षक म्हणजेच जावेद अहमद टाक होय.

अपंगत्व असणं किंवा अपंगत्व येणं हा काही आपला दोष नाही. पण, अपंग राहणं हा मात्र आपला दोष आहे. जावेद यांना जीवनात बदल घडविण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच त्यांच्या समोर मार्ग खुले झाले. आपल्या वाट्याला आलेल्या अपंगत्वावर मात करत जावेद यांनी नवा इतिहास रचला आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

"स्वप्नं पाहणं" हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. "स्वप्नं वास्तवात आणणं" हे आपलं कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. हाच धडा घेवून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 जेसिका कॉक्स, विल्मा रूडाल्फ, अरूनिमा सिन्हा, दीपा मलिक, प्रांजल पाटील, निकोलस विजिसिक या सारख्या अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या यशवंतांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.



















No comments: