Wednesday, May 12, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 194

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 194*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/194.html

वडिलांचा मृत्यू,पाच बहिणी, त्यांचे लग्न, कुटुंबाची अन् वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळून, स्वतःचे, वडिलांचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या, भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या एका खेळाडूचा हा प्रेरणादायी प्रवास...

3 जुलै 1980 रोजी जालंधर ,पंजाब येथील एका सधन शीख कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील व्यावसायिक आणि आई गृहिणी. त्यांना सहा अपत्ये. पाच मुली आणि हा एकटाच. त्याला क्रिकेटचे वेड. सतत क्रिकेट खेळायचा. तो अभ्यासात अगदी साधरणच. वयाच्या बाराव्या वर्षी त्याच्या क्रिकेटमधील प्रशिक्षणाला सुरुवात झाली. 

त्याचं कुटुंब मोठं. वडिलांचा व्यवसाय आणि पाच बहिणी,त्यांची लग्नं. याची जबाबदारी जाणून क्रिकेट खेळणं बंद करून वडिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी तो सरसावला. पण, वडिलांनी त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून, भारतीय संघात खेळावं. असं सुचविलं. त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. 

त्याच्या पहिल्या प्रशिक्षकांनी त्याला उत्तम फलंदाज म्हणून घडविण्यावर भर दिला. पण,प्रशिक्षकांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्याची रवानगी दुसऱ्या प्रशिक्षकांकडे करण्यात आली. या प्रशिक्षकांनी त्याच्यातील गोलंदाजीचे कसब हेरले. त्याला सर्वोत्तम गोलंदाज घडविण्यावर त्यांनी भर दिला. यासाठी त्याला खडतर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो गोलंदाज म्हणून घडू लागला. त्याची मेहनत फळास आली आणि 19 वर्षाखालील भारतीय संघात आणि पंजाब संघात स्थान मिळाले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने दर्जेदार कामगिरी केली. यामुळे भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. 25 मार्च 1998 रोजी बंगळूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली. या सामन्यात त्याला फारशी उत्तम कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला संघातून डच्चू देण्यात आला. 

अशातच सन 2000 साली त्याच्या वडिलांचे निधन झाले. घराची व व्यवसायाची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर पडली. स्वप्नं आणि जबाबदारी यातून त्यानं जबाबदारी निवडलं. परंतु, स्वप्नं पूर्ण करणं. ही सुद्धा एक जबाबदारी आहे. याची जाणीव घरच्यांनी करून दिल्यानं, त्यानं पुन्हा आपलं लक्ष क्रिकेटवर केंद्रित केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याला लय सापडली. तसेच, आघाडीचा गोलंदाज कुंबळे जखमी झाल्याने, 2001 साली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी साठी त्याची निवड झाली. मिळालेल्या संधीचं सोनं केलं. पहिल्या कसोटीत 8 बळी मिळवले. दुसऱ्या कसोटीत हॅटट्रिक केली. असा पराक्रम करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम हॅटट्रिक करणारा तो 'टर्मिनेटर', 'भज्जी' म्हणजेच 'हरभजनसिंग प्लाहा' होय.

वडिलांचा मृत्यू झाल्यावर, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भज्जीवर पडली. शिवाय, वडिलांचा व्यवसाय, बहिणींचे लग्न आणि स्वतःचं भवितव्य याचाही भार होताच. त्याचे भवितव्य अजूनही अधांतरीच होते. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तो झगडत होता. अशा कठीण प्रसंगात तो कौटुंबिक जबाबदारी पार पाडत, स्वतःच्या स्वप्नांसाठी धडपडत राहिला. अथक परिश्रमानंतर त्याला संधी मिळाली आणि भारतीय क्रिकेटमध्ये त्यानं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

2007 व 2011 चे विश्वचषक जिंकून देण्यात भज्जीचा मोलाचा वाटा होता. क्रिकेटमधील त्यांच्या सेवेबद्दल 2009 साली भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने त्याला सन्मानित केले आहे. म्हणूनच, तो एक यशवंत आहेत. 

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.



*धन्यवाद...*

No comments: