Tuesday, May 11, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 193

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 193*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/193.html


भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक मिळवून देणाऱ्या, मशिदीमध्ये मुअज्जिन म्हणून काम पाहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलाची ही प्रेरणादायी कथा...

27 ऑक्टोंबर 1984 रोजी गुजरात येथील बडोदा शहरात 'गुड्डू'चा जन्म झाला. त्याचे वडील मशिदीमध्ये 'मुअज्जिन' म्हणून काम करायचे. (मुअज्जिन ही अशी व्यक्ती आहे,जी मशिदीत प्रार्थनेला(अजाण) हाक मारते. मुस्लिम समुदायासाठी अचूक प्रार्थनेचे वेळापत्रक सुनिश्चित करण्यात मुएझिन महत्वाची भूमिका बजावते.) मशिदीच्या मागे एका छोट्याशा घरात त्यांचे पाच जणांचे कुटुंब राहायचे. घराची परिस्थिती अगदी जेमतेमच.

गुड्डू ला अगदी बालवयातच क्रिकेटचे वेड लागले. वयाच्या तेराव्या वर्षी ज्युनियर क्रिकेट स्पर्धेत सहभाग होत, आपल्या क्षमतेचा परिचय सर्वांना करून दिला. यांनतर विविध वयोगटात खेळताना उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. त्याने टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्नं पाहिले. त्यासाठी तो झटू लागला. तो उत्तम गोलंदाजी करायचा पण, त्याचा विशेष प्रभाव पडत नव्हता. म्हणून, त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. तो उत्तम फलंदाज कधी झाला? हे त्यालाही कळले नाही. 

दत्ता गायकवाड या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने गुड्डूला प्रशिक्षण दिले. त्याची निवड प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये झाली. 2003-04 साली नवोदित खेळाडूंच्या स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली.म्हणून, त्याची निवड 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात झाली. 19 व 22 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात गुड्डू ने केलेल्या कामगिरीच्या जोरावर, 2003 साली त्याची निवड ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी झाली. या कसोटी दौर्‍यात त्याला फारशी विशेष कामगिरी करता आली नाही. पण, आघाडीचा गोलंदाज झहीर खान जखमी झाल्याने, त्याला एक संधी आणखी मिळाली. 

ऑस्ट्रेलिया, भारत आणि झिम्बाब्वे संघामधील त्रिकोणी मालिकेसाठी गुड्डूची निवड झाली. यावेळी मात्र, मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं आणि पदार्पणाच्या मालिकेतच तब्बल 16 बळी घेऊन भारतीय संघात आपले स्थान भक्कम केले. 2007 सालच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात 16 धावा देत 3 बळी घेऊन संघाला टी-20 विश्वचषकाचा पहिला मानकरी होण्यात मोलाचा हातभार लावला. तो अष्टपैलू खेळाडू 'गुड्डू' म्हणजेच 'इरफान पठाण' होय.

2010 साली इरफान कमरेमध्ये 5 फ्रॅक्चर झाले होते. त्याच्या फिजिओथेरपिस्टने त्याला सांगितले होते की, तो आता कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही.पण, त्याने स्वप्नं पाहणे बंद केले नाही. ऑपरेशननंतर त्याने खूप मेहनत केली आणि पुन्हा टीम इंडियामध्ये परतला. तुमचं यश हे तुमची गरिबीवर अवलंबून नसतं. तर,ते तुमच्या क्षमतेवर अवलंबून असतं. तुम्हांला कितीही मोठा आजार जडला असला तरी, त्यातून उभं राहून पुन्हा आपलं ध्येय साध्य करू शकता. हे इरफान च्या प्रवासावरून लक्षात येतं. 

गरीबी आणि आजारपण यातून उभं राहून इरफान पठाण ने आपलं भवितव्य घडवलं आहे. म्हणूनच, तो आज यशाच्या शिखरावर आहे. म्हणूनच,तो एक यशवंत आहे.

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: