Saturday, December 8, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 78

याअमेरिकेतीलभाग 78 

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 78*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*अमेरिकेतील एका अँग्री यंग लेडीच्या नवऱ्याला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली. या निवडणुकीत तिच्या मदतीची अपेक्षा नवऱ्याने केली. तिने मदत करण्यापूर्वी एक अट ठेवली, “जर का नवऱ्याने ती अट मान्य केली, तर ती त्याला या निवडणुकीत त्याचा केवळ प्रचारच  करणार नाही, तर त्याला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवूनच दम घेईल.” तिने आपल्या नवऱ्याला मदत केली का ? तिचा नवरा राष्ट्रपती बनला का ? नवऱ्यासमोर ठेवलेली ती अट कोणती ? काय तिचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात..*

17 जानेवारी 1964 रोजी, तिचा जन्म शिकागो येथील, एका सामान्य कुटुंबात झाला. तिचे वडील पाणीपुरवठा विभागातील एक कर्मचारी, तर आई एका शाळेमध्ये सचिव म्हणून काम करायची. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून ती शिकागो शहरात नोकरीस लागली. विद्यार्थी दशेत असतानाच ती राजकारण सक्रिय झाली. ‘जे पोटी, तेच ओठी’ अशी तिची ओळख होती. अशातच तिची ओळख पेशाने वकीलच असलेल्या, एका तरुणाशी झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी ऑक्टोंबर 1992 मध्ये लग्न केले.

नवरा हुशार, चाणाक्ष, बुद्धीमान होता. शिवाय एक लेखक, समाजसेवक आणि राजकारणी म्हणून अल्पावधीतच त्याने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्ष अतिशय आनंदात गेली. लग्न होऊन पाच-सहा वर्ष उलटून गेली होती. ती अजूनही आई होऊ शकली नव्हती. तिचे काही वेळा गर्भपात देखील झाले होते. तिची आई बनण्याची शक्यता फारच कमी होती. हा तिच्या आयुष्यातला अतिशय खडतर आणि संघर्षाचा काळ होता. नवरा-बायकोचे मतभेद निर्माण झाले होते. दोघांनी वेगळं व्हायचं जवळजवळ पक्क केलं होतं. पण,त्यांनी एकदा मॅरेज काउन्सलिंगचा मार्ग निवडला. मतभेद दूर झाले. तिने आयव्हीएफ अर्थात इन विट्रो फर्टिलायझेशन या उपचार पद्धतीची मदत घेऊन आई बनण्याचा निर्णय घेतला. या काळात तिचा नवरा राजकारणात अधिक सक्रिय झाल्यामुळे, आयव्हीएफ चे उपचार तिला एकट्यानेच करावे लागले. आयव्हीएफ उपचार पद्धतीने तिने 1998 साली एका आणि 2001 साली दुसऱ्या मुलीला जन्म दिला. 

2008 अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली. तिच्या नवऱ्याने आपल्या पक्षातून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळावी, यासाठी दावेदारी दाखल केली. तिनेही आपल्या पतीची बाजू अतिशय भक्कमपणे आणि जोरदारपणे मांडली आणि त्याला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळण्यास मदत केली. या निवडणुकीत तिच्या मदतीची अपेक्षा नवऱ्याने केली, तेव्हा तिने आपल्या नवऱ्यासमोर सिगरेट सोडण्याची अट ठेवली. त्याने सिगरेट सोडली. ती नवऱ्याच्या सोबत प्रचारात उभी राहिली. आपल्या नवऱ्याची बाजू जनतेसमोर अतिशय भक्कमपणे मांडली. तिचा नवरा विजयी झाला. *तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला. तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजेच बराक ओबामा आणि ती अमेरिकेची फर्स्ट लेडी मिशेल ओबामा.*

*प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असतेच. बराक ओबामांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर त्यांची राजकारणातील वाटचाल यशस्वी होण्यामध्ये, त्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनविण्यामध्ये,त्यांचा संसार सुखाचा आणि उत्तम होण्यामध्ये मिशेल ओबामा यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. जीवनातल्या अनेक खडतर प्रसंगात, आपल्या पतीच्या पाठीशी ठाम राहिल्या. बराक ओबामा यांना अमेरिकेचा राष्ट्रपती बनवता-बनवता, त्या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्यावहिल्या आफ्रिकन अमेरिकन फर्स्ट लेडी बनल्या. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: