Monday, May 10, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 192

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 192*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/192.html

पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आलेल्या अपयशानंतर, भारतीय क्रिकेटसंघातून वगळण्यात आलेल्या आणि तब्बल वीस महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पुन्हा संघात स्थान मिळवणाऱ्या, आपल्या स्फोटक फलंदाजीने, स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या, एका धीरोदात्त खेळाडूंची ही प्रेरणादायी कथा...

20 ऑक्टोंबर 1978 रोजी दिल्लीतील एका जाट परिवारात त्याचा जन्म झाला. प्रेमाने त्याला गोलू म्हणायचे. त्याचे वडील एक धान्य व्यापारी आणि आई गृहिणी. त्यांना असलेल्या चार अपत्यांपैकी गोलूचा क्रमांक तिसरा. लहानपणापासूनच गोलूला क्रिकेटची आवड. 

एकदा क्रिकेट खेळताना त्याचा दात तुटला. म्हणून, वडिलांनी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली.  अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. परंतु, गोलूने आणि आईने खूपच आग्रह केल्यानंतर वडिलांनी परवानगी दिली. क्रिकेटवर गोलूने अधिक 'लक्ष' दिले खरे.पण, अभ्यासाकडे 'दुर्लक्ष' केले. 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला त्याने आपला आदर्श मानला होता.

विविध स्तरावरील स्पर्धेत गोलूने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. 1997 साली दिल्लीच्या संघात त्याची निवड झाली. दुलिप करंडक स्पर्धेत गोलूने केलेल्या दमदार कामगिरीमुळे, त्याची निवड 19 वर्षाखालील भारतीय संघात झाली. येथेही त्याने आपल्यातील क्षमतेची जाणीव सर्वांना करून दिली. यामुळेच, 1999 साली मुख्य भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. 

पाकिस्तान विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ एका धावेवर बाद झाल्याने, आपल्यातील प्रतिभेची छाप सोडता आली नाही.तो सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे, गोलूला संघातून वगळण्यात आले. नाराज न होता, त्याने पुन्हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करायला सुरुवात केली.

तब्बल वीस महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर 2000 साली झिम्ब्बाबे विरुद्ध पुन्हा एकदा संघात स्थान मिळविण्यात गोलूला यश आले. 2001 मध्ये श्रीलंका आणि न्युझीलंड ट्राय सीरिजमध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतले पहिले अर्धशतक झळकावले. याच सीरीजमध्ये त्याने अवघ्या 69 चेंडूमध्ये शानदार शतक झळकावत, अवघ्या जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. 

एक-एक पायरी चढत विक्रमांचा शिखर सर केला. 'मुलतानचा सुलतान', 'नजफगड चा नवाब', 'आधुनिक क्रिकेटचा जेन मास्टर' अशी ओळख प्राप्त केली. क्रिकेटचं मैदान गाजवणारा तो ढाण्या वाघ म्हणजेच वीरेंद्र सेहवाग होय.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सेहवाग क्रिकेटमध्ये भवितव्य घडवण्यासाठी एका प्रसिद्ध प्रशिक्षकांकडे गेला होता. त्यांनी त्याला तीन दिवस थांबण्यास सांगितले. चौथ्या दिवशी नेटमध्ये सरावासाठी बोलवले. केवळ चारच चेंडू टाकल्यानंतर त्यांनी सेहवागला बाहेर बोलविले. यावर नाराजीच्या स्वरात तो म्हणाला, "काय झाले सरजी ?" प्रशिक्षक म्हणाले, "पहिले तीन दिवस मी तुझे धैर्य आजमावले आणि तू जे चार चेंडू खेळलास, ते आजवर या अकॅडमीमधील एकही मुलगा खेळू शकला नाहीस. त्यामुळे मी तुला प्रशिक्षण देणार आहे." 

आपले नियोजित ध्येय गाठायचे असेल तर, आपल्याकडे धैर्य असायलाच हवे. निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यानंतर, त्याने संयम सोडला नाही. सेहवागने पुनरागमन करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि पुन्हा एकदा संधी मिळविली. यावेळी मात्र संधीचं सोनं करण्यात तो यशस्वी ठरला. सेहवाग प्रचंड धीरोदात्त होता. म्हणूनच, त्याला दुसरी संधी मिळविता आली. म्हणूनच, कसोटीत दोन त्रिशतक आणि एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकविणारा तो एकमेव होऊ शकला. म्हणूनच,तो एक यशवंत आहे.

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: