Thursday, May 13, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 195

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 195*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/195.htm


एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या एका तरुणाने उत्तम गोलंदाज होऊन, भारतीय संघात स्थान मिळवण्याचं स्वप्नं उराशी बाळगलं. स्वप्नंपूर्तीच्या मार्गात अनेक अडथळे आले. आर्थिक चणचण त्यांपैकीच एक. एका खाजगी कंपनीत तुटपुंज्या पगारावर काम करून, आपलं ध्येय गाठणाऱ्या एका खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...


7 ऑक्टोबर 1978 रोजी महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथे एक सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील फोटोग्राफर, तर आई शिक्षिका म्हणून काम करायची. असं असलं तरी, घरची आर्थिक परिस्थिती मात्र अगदी जेमतेमच. 


अगदी बालवयातच त्याला क्रिकेटची गोडी लागली. पुढे जाऊन मोठा क्रिकेटपटू होण्याचं त्यानं स्वप्नं पाहिलं. त्याच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम त्याच्या आई वडिलांनी केलं. फक्त शालेय शिक्षण पूर्ण करणं. ही एकमेव अट त्याच्यासमोर ठेवण्यात आली. त्यानेही अगदी मनापासून शालेय शिक्षण पूर्ण केले. 


क्रिकेट प्रशिक्षण घेण्यासाठी तो मुंबईत आला. त्याचे जवळचे नातेवाईक मुंबईत वास्तव्यास होते. त्यांच्या छोट्याशा खोलीत राहिला. “मुंबई नेशनल क्रिकेट क्लब” मध्ये प्रवेश घेतला. येथे कोच सुधीर नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पैशांची टंचाई भासू लागली असता, एका खाजगी कंपनीत तुटपुंज्या पगारावर काम करायला सुरुवात केली. पण, आपलं स्वप्नं अर्ध्यातच सोडलं नाही.


2000 साल त्यासाठी मोठी संधी घेऊन आलं. याचं वर्षी त्याचं प्रथम श्रेणी, एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. बडोदा संघाकडून खेळताना त्याने आपल्यातील प्रतिभेचा प्रभाव पाडला. सटीक गोलंदाजी करत, 43 वर्षानंतर संघाला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या दमदार कामगिरीने भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. 


3 ऑक्टोंबर 2000 रोजी केनिया विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला संधी मिळाली. या सामन्यात 3 बळी घेऊन, संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी केली. एक भेदक गोलंदाज म्हणून लौकिक प्राप्त केला. 2003 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. त्याने दमदार कामगिरी बजावली. भारतीय संघ तब्बल वर्षानंतर प्रथमच अंतिम सामन्यात धडकला. पण,अंतिम सामन्यात यश मिळवून देण्यात तो सफशेल अपयशी ठरला. 


वारंवार होणारी दुखापत, हरवलेली लय, वाढलेली तीव्र स्पर्धा, यामुळे संघात भक्कम स्थान निर्माण करण्यात त्याला अपयश आले. संघातून वगळलं गेलं. यामुळे तो बिलकुल नाराज झाला नाही. वेगवेगळ्या स्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊन, त्याने कामगिरीत सुधारणा केली. स्वतःला सिद्ध केलं. पुन्हा एकदा संधी मिळविली. त्याचं सोनं केलं. 2007 च्या विश्वचषकातील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरी नंतरही, त्याने आपली लय कायम ठेवली.


2011 सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. या स्पर्धेत त्याने "नकलबॉल" ही गोलंदाजीतील नवी युक्ती जागतिक क्रिकेटला दिली. शिवाय, सर्वाधिक बळीही घेतले. त्याच्या या धमाकेदार कामगिरीने 2011 सालच्या विश्वचषकावर भारताने आपले नाव कोरले. 2011 सालचा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणारा तो गोलंदाज म्हणजेच 'जहीर खान' होय.


जीवनात अनंत अडचणी असतात आणि यावर उपायही असतात. उपाय शोधण्यासाठी आपल्याकडे फक्त नजर असायला हवी. झहीर खानसमोरही अनंत अडचणी होत्या. सर्व अडचणींवर मात करून, त्यानं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यामुळेच तो यशाच्या शिखरावर पोहोचू शकला. म्हणूनच, तो एक यशवंत आहे.


🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*



No comments: