Friday, May 14, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 196

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 196*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


कसोटी क्रिकेटमध्ये डावाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्याच चेंडूवर एखाद्या फलंदाजाला बाद करण्याचा विक्रम तब्बल 114 वर्ष अबाधित होता. हा विक्रम भारताच्या एका फिरकीपट्टूने मोडीत काढला. सॉफ्टवेयर इंजीनियर असलेल्या या भारतीय फिरकीपट्टूचा हा प्रेरणादायी प्रवास...

17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नई,तमिळनाडू येथे एका सधन कुटुंबात ऐशचा जन्म झाला. त्याचे वडील एक जलदगती गोलंदाज. ते एका स्थानिक क्लबसाठी खूप काळ क्रिकेट खेळत होते. त्याची आई गृहिणी, मुलाच्या करिअरकडे विशेष लक्ष देणारी. 

'मुलानं क्रिकेटर व्हावं.' ही वडिलांची इच्छा. त्यानुसार ऐशनं क्रिकेटचे धडे गिरवले. त्याचे पहिले गुरू वडिलचं. शाळास्तरीय क्रिकेटमध्ये त्यानं ठसा उमटविला. पण, तो चौदा वर्षांचा असताना, त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली अन् घरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. या दुखापतीमुळे तो पुन्हा क्रिकेट खेळेल की नाही ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तब्बल एक वर्षाच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा मैदानात उतरला. तेंव्हा त्याच्या आत्मविश्वासानं  सर्व वादळ शांत केलं. आता नव्या शाळेत प्रवेश घेतला. तिथे नवे प्रशिक्षक लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा खेळ बहरला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो नावारूपास आला. 2003/04 साली 17 वर्षाखालील भारतीय संघात निवड झाली . 

2006 साली तामिळनाडू संघात निवड झाली. पहिल्या मोसमात त्याने केलेल्या बहारदार कामगिरीमुळे,पुढील मोसमात संघाच्या कर्णधारपदी त्याची निवड झाली. पुढे 2009 साली त्याची निवड IPL साठी झाली. चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपल्या संघात घेतले. 2010 च्या पर्वात त्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचे दरवाजे आपोआप खुले झाले. त्याचवर्षी झिम्बाब्वे विरुद्ध T-20 व श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय  क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. 2011 साली वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून 9 गडी बाद करून 'सामनावीर' पुरस्काराचा मान मिळविला. तसेच, या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी करून 'मालिकावीर' पुरस्कारही मिळाला. असा पराक्रम करणारा तो अष्टपैलू खेळाडू ऐश म्हणजेच "रविचंद्रन अश्विन" होय.

सर्वात जलद 50,100,150,200,250,300 बळी मिळविणारा अश्विन हा पहिलाच गोलंदाज आहे. कसोटीमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला फिरकीपटू आहे. भारताकडून 400 कसोटी बळी घेणारा तो केवळ चौथा गोलंदाज आहे. असे आणि यासारखे कित्येक विक्रम त्याच्या नावावर आहेत. 

अश्विन ने क्रिकेटमध्ये भवितव्य घडवित असताना, बी.टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु, त्याचं पहिलं प्राधान्य क्रिकेट होतं. बर्‍याचदा, आपल्याकडे प्लॅन 'ए', 'प्लॅन 'बी' या सारखे कित्येक 'प्लॅन' तयार असतात. परंतु, नेमकं प्राधान्य कोणत्या प्लॅन ला द्यायचं ? हे मात्र निश्चित नसतं. त्यामुळे, पदरी अपयश येण्याची दाट शक्यता असते. हे अपयश टाळण्यासाठी, सर्वप्रथम कोणत्या 'प्लॅन' ला प्राधान्य द्यायचं ? हे निश्चित करायला हवं.  त्यानुसारच, मार्गक्रमण करायला हवं. तरच, यशाचं शिखर लवकर सर होईल.

'आईसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर' हा मानाचा  पुरस्कार पटकाविणारा तो केवळ तिसराच भारतीय आहे.म्हणूनच, तो एक यशवंत आहे.

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*


No comments: