Friday, May 14, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 197

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 197*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/197.html

एका गोलंदाजांने एक आगळावेगळा विक्रम केला. हा विक्रम आजवर फक्त दोनच गोलंदाज करू शकले आहेत. त्या गोलंदाजाच्या पराक्रमाने प्रभावित होऊन, बंगलोरमध्ये एका सर्कलला त्याचे नाव देण्यात आले. त्या विक्रमादित्य गोलंदाजांची ही प्रेरणादायी कथा...

17 ऑक्टोंबर 1970 रोजी बंगलोरमध्ये एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण बंगलोरमध्येच पूर्ण केले. अगदी बालपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड. वयाच्या तेराव्या वर्षी बेंगलोर येथील एका क्लबशी तो जोडला गेला. बी एस चंद्रशेखर हा खेळाडू त्याला खूप आवडे. त्यांच्यासारखाच उत्तम गोलंदाज होऊन, भारतीय संघात स्थान मिळवण्याचं त्याचं स्वप्न बनलं. वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत तो मध्यमगती गोलंदाजी करायचा. पण, त्याने मोठ्या भावाच्या सल्ल्याने लेग-स्पीन गोलंदाजी करायलाही सुरुवात केली.

1990 साली श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय व इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात त्याने पदार्पण केले. पहिल्या कसोटीत 3 विकेट घेतल्या खऱ्या. पण, सुरुवात काहीशी खराब झाल्याने त्याला संघातून वगळण्यात आले. तो प्रयत्न करत राहिला. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश आलं. 1992 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 1999 साली दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, शेवटच्या डावात, त्याने पाकिस्तानच्या 10 फलंदाजांना बाद करत, नवा इतिहास घडविला. असा पराक्रम करणारा जीमी लेकरनंतरचा तो दुसराच गोलंदाज ठरला. तो 'जंबो' गोलंदाज म्हणजेच 'अनिल कुंबळे' होय. 

2002 साली वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजी करत असताना त्याचा जबडा फ्रॅक्चर झाला. असे असतानाही त्याने सलग 14 षटके गोलंदाजी करत ब्रायन लाराची विकेट घेतली होती. त्याच्या या कृतीने त्याने अनेकांची मने जिंकली. या प्रसंगातून त्याच्या जिद्दी स्वभावाचे, चिकाटी वृत्तीचे व लढाऊबाण्याचे दर्शन होते. एखाद्या कठीण प्रसंगाशी तुम्ही लढता ? कि शरण जाता ? यावर तुमचे पुढचे यश अवलंबून असते. कुंबळे त्याच्या प्रत्येक कठीण प्रसांगाशी लढला. म्हणूनच, तो जगातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 

क्रिकेट खेळताना कुंबळेने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्याने मॅकेनिकल इंजिनियरींगची डिग्री पूर्ण केली. 2005 साली भारत सरकारने 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे. म्हणूनच, तो एक यशवंत आहे.


🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: