Sunday, May 16, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 198

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 198*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


एका सर्वसामान्य आणि बिकट आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेल्या एका मुलाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर, आज भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. त्या खेळाडूचा 'झिरो ते हिरो' पर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास...

30 एप्रिल 1987 मध्ये नागपूर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील एका खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करायचे. त्यांच्या तुटपुंज्या पगारात चार जणांचे कुटुंब चालविणे शक्य नसल्याने, वडिलांनी त्याची रवानगी मुंबई येथे असलेल्या त्याच्या आजोबा व काकाकडे केली. हा त्याच्या जीवनातील 'टर्निंग पॉईंट' ठरला. 

त्याच्या वयाबरोबर त्याची क्रिकेटची आवड अधिकाधिक वृद्धिंगत होत होती. त्याची ही आवड जाणून, त्याच्या काकांनी त्याला एका क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. येथे त्याला दिनेश लाड या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याच्या आर्थिक परिस्थितीची पुरेशी कल्पना असल्याने लाड यांनी त्याला मोफत मार्गदर्शन केले. शिवाय, क्रिकेटसाठी उत्तम सुविधा असलेल्या, एका आंतरराष्ट्रीय शाळेत त्याला प्रवेश मिळवून दिला. तसेच, त्याच्या चार वर्षाच्या फीची बक्षीस स्वरूपात तरतूदही केली. प्रशिक्षकांनी दाखविलेल्या विश्वासाने, त्याचा आत्मविश्वास वाढीस लागला. तो यशाची एक-एक शिखरे सर करू लागला. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळाले. 

23 जून 2007 रोजी आयरलैंड विरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2007 सालचा T-20 विश्वचषक जिंकून देण्यात त्याने मोलाचा हातभार लावला. यानंतर मात्र त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. त्याच्यावर अनेक टीकाही झाल्या. त्याने पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुन्हा जोर लावला. जीवतोड मेहनत केली. पुन्हा एकदा संधी मिळविली. यावेळी मात्र त्याने अफलातून कामगिरी केली. 2 नोव्हेंबर 2013 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून स्वतःला सिद्ध केले. द्विशतक झळकाविणारा तो केवळ तिसराच भारतीय खेळाडू बनला. तो 'हिटमॅन' म्हणजेच रोहित शर्मा होय.

रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटमधील आघाडीचा खेळाडू. त्याने स्व:कर्तृत्वाने भारतीय क्रिकेट स्वतःचा ठसा उमटविला आहे. त्याचा हा प्रवास मुळीच सोपा नाही. खरंतर, यश हे गरीबी अथवा श्रीमंती बघून मिळत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीच्या अंगी क्षमता असाव्या लागतात. त्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सातत्य असावं लागतं. रोहितकडे त्या क्षमता होत्या. त्या क्षमतेच्या जोरावर त्याला विविध संधी प्राप्त झाल्या. बिकट आर्थिक परिस्थितीतूनही मार्गक्रमण करत, आज तो यशाच्या शिखरावर विराजमान आहे. 

एकदिवसीय सामन्यात जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा(264)करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. तो एकदिवसीय सामन्यामध्ये तीन द्विशतक करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. म्हणूनच, तो एक यशवंत आहे.

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*


No comments: