Monday, May 17, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 199

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 199*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/199.html

ध्येयाच्या वाटेत येणाऱ्या अडचणी व्यक्तीची परीक्षा घेण्यासाठीच येत असतात. एकदा ही अडचण सर झाली, तर यशाचे शिखर सर व्हायला फारसा वेळ लागत नाही. क्रिकेटमधील भवितव्य घडण्याच्या मार्गावर असतानाच, वडिलांचा अचानक झालेला मृत्यू आणि यामुळे निर्माण झालेली अनेक संकटं यावर मात करून यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...

5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील वकील, तर आई गृहिणी होती. त्याचे पाच जणांचे कुटुंब एका भाड्याच्या घरात राहायचे. घरातील सर्व त्याला प्रेमाने 'चिकू' म्हणायचे. 

चिकूला अगदी बालवयातच क्रिकेटची गोडी लागली. गल्ली क्रिकेट खेळायला सुरुवात करताच, त्याच्या वडिलांनी त्याला एका क्रिकेट अकादमीत प्रवेश घेऊन दिला. त्यावेळी तो नऊ वर्षांचा होता. "चिकूनं भारतीय संघाकडून क्रिकेट खेळावं" ही वडिलांची इच्छा. त्यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या. प्रशिक्षक राजीवकुमार शर्मा यांनी त्याच्याकडून कसून मेहनत करवून घेतली.

खेळांमध्ये विशेष आवड असल्याने तो जेमतेमच अभ्यास करायचा. 2002 मध्ये तो 15 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धात खेळू लागला. 2006 ला त्यांची निवड 17 वर्षाखालील स्पर्धेसाठी झाली आणि इथूनच त्यांचा क्रिकेटचा एक नवीन प्रवास सुरू झाला. पण, घडलं वेगळंच. याच वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी दिल्ली संघाकडून त्याची निवड झाली. कर्नाटक विरुद्ध दिल्ली असा अतिशय महत्वाचा सामना होणार होता. प्रथम श्रेणी क्रिकेट म्हणजे भारतीय संघाचे दरवाजे उघडण्यासाठीची गुरुकिल्ली होय. हा सामना त्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. पण,अचानक त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि भवितव्य कि कर्तव्य ? वडील कि त्यांचे स्वप्नं ? या मोठ्या प्रश्नात तो अडकला. सरतेशेवटी त्याने निर्णय घेतला. वडिलांचे अंत्यसंस्काराचे 'कर्तव्य' उरकून, दुसऱ्याच दिवशी 'भवितव्य' घडविण्यासाठी मैदानावर उतरला. यावेळी त्याने दिल्ली संघासाठी 90 धावांची दर्जेदार कामगिरी करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेने तो अधिक गंभीर झाला. या कामगिरीमुळे तो त्याच्या स्वप्नांपूर्तीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला.

विविध स्पर्धातील त्याच्या चमकदार कामगिरीने त्याची निवड 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी झाली, तीही कर्णधार म्हणूनच. इकडे त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 19 वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरले आणि तिकडे भारतीय मुख्य संघातील त्याच्या निवडीवरही शिक्कमोर्तब झाले. डिसेंबर 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने पदार्पण केले आणि वडिलांचं स्वप्नं पूर्ण केलं. आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा 'चिकू' म्हणजेच 'विराट कोहली' होय. 

विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू. अनेक विक्रम त्याने प्रस्थापित केले आहेत, करत आहे आणि भविष्यातही करेल. एक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून तो प्रसिद्ध आहे. पण, त्याचा इथपर्यंतचा प्रवास खूपच खडतर आहे. वडील त्याचे मार्गदर्शक. त्यांच्या निधनाने विराटचा मार्गही बदलला असता. पण, तो खंबीरपणे उभा राहिला. स्वतः ला काय करायचं आहे ? हे त्यानं खूप कमी वेळेत ठरविले आणि त्याप्रमाणे तो मार्गस्थ झाला. स्वप्नपूर्तीच्या मार्गात अडचण आली, तरी ती बाजूला सारून पुढे जाण्यातच यश अवलंबून असतं. नेमका हाच संदेश कोहलीच्या जीवनातून मिळतो.

2011 चे विश्र्वचषक जिंकून देण्यात विराटचा महत्वाचा वाटा आहे. अनेक विक्रम त्याने प्रस्थापित केले आहेत. 2017 साली भारत सरकारने 'पद्मश्री पुरस्कार' देऊन सन्मानित केलं आहे. म्हणूनच, तो एक यशवंत आहे.


🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*







No comments: