Tuesday, May 18, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 200

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 200*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/200.html

'नेतृत्व' हे मॅनेजमेन्टच्या अनेक तत्वांपैकी एक महत्वाचे तत्व. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका निश्चित ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी, त्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज असते. आपल्या प्रतिभाशाली नेतृत्वाने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या, सामान्यातील असामान्य खेळाडूंची ही प्रेरणादायी कथा...

7 जुलै 1981 ला तत्कालीन बिहार आणि सध्याच्या झारखंड मध्ये असलेल्या एका छोट्याशा शहरात, एका सामान्य राजपुत परिवारात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील स्टील मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये व्यवस्थापक होते, तर आई गृहिणी होती. 

बॅडमिंटन आणि फुटबाॅल या खेळांमधे त्याला अधिक रूची. आपल्या शाळेतील फुटबाॅल संघाचा तो चांगला गोलकिपर म्हणुन ओळखला जायचा. पण, शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्याने तो सल्ला मानला आणि त्यासाठी अपार कष्ट घेऊ लागला. 

10 वी नंतर त्याने क्रिकेटला गांभीर्याने घेण्यास सुरूवात केली. यासाठी त्याने शिक्षणासोबत तडजोड केली.12 वी नंतर शिक्षण सोडले आणि संपूर्ण वेळ क्रिकेटसाठी देऊ लागला. याचे परिणाम लवकरच दिसू लागले. विविध स्पर्धांतील कामगिरीच्या आधारावर 1999 मध्ये त्याला रणजी ट्राॅफी खेळण्याची संधी मिळाली. वयाच्या 20 व्या वर्षी त्याला खेळ कोटयातुन रेल्वे स्थानकावर ट्रॅव्हलिंग टिकीट परीक्षक (टीटीई) पदावर नोकरी मिळाली. 

सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही त्याची क्रिकेटची आवड कमी झाली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारावर 2003 साली त्याची निवड 'भारत अ' संघात झाली. येथेही त्याने नेत्रदीपक कामगिरी केली आणि भारताच्या मुख्य संघाचे दरवाजे खुले केले. 23 डिसेंबर 2004 ला बांग्लादेश विरूध्द त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला. पहिल्यावहिल्या सामन्यात त्याने निराशाजनक कामगिरी केली. पण, तरीही त्याला पुन्हा संधी मिळाली. यावेळी मात्र जिद्दीने आणि जोमाने पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात 148 धावा काढून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले. तो सातत्याने करत असलेल्या दर्जेदार कामगिरीमुळे त्याला संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आले. त्याने हे शिवधनुष्य लिलया पेलले. आपल्या नेतृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर 2007 चे T-20 व 2011 सालचे एकदिवसीय विश्वचषक जिंकून संघाला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर नेऊन ठेवले. भारतीय संघाला दोन विश्वचषक जिंकून देणारा तो एकमेव कर्णधार म्हणजेच महेंद्रसिंग धोनी होय. 

धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने T.20 विश्वचषक 2007, एकदिवसीय विश्वचषक 2011 व चॅंपियन्स ट्राॅफी 2013 या आयसीसी द्वारा आयोजित सर्व तऱ्हेच्या स्पर्धा जिंकणारा पहिलाच कर्णधार आहे.

एकाग्रता, निर्णयक्षमता, जबाबदारी स्विकारणं, स्वत:चं ऐकणं, पराभवातून शिकणं, परिस्थिताचा स्विकार करणं, सर्वांना सोबत घेऊन जाणं, कठीण प्रसंगी पुढाकार घेणं, शेवटपर्यंत प्रयत्न करणं आणि पराकोटीचा संयम हे धोनीचे विशेष गुण. अनेक संघर्षांनंतर आणि जीवनातील चढ-उतारानंतर धोनीने क्रिकेट विश्वात स्वतःला सिद्ध केलं आहे. कोणतही कार्य दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे केलं तर, यश नक्की मिळतं. हे धोनीकडे पाहिल्यावर पटतं.

2 एप्रिल 2018 मध्ये 'पद्मभुषण' या देशातील तिसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने धोनीला गौरवान्वित करण्यात आले आहे. म्हणूनच,तो एक यशवंत आहे.

मित्रहो, गेल्या पंचवीस दिवसापासून आपण 'यशवंत-एक प्रेरणास्त्रोत' च्या आठव्या पर्वाचे आवडीने वाचन करत आहात. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच ही लेखनमाला 200 व्या भागापर्यंत येऊन पोहोचली आहे. आठव्या पर्वाचा हा प्रवास आपल्याला कसा वाटला ? ते नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत.


🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: