Wednesday, May 19, 2021

यशवंतच्या निमित्ताने पर्व 8

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *यशवंतच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/8.html

सर्व वाचक मित्रांना माझा सस्नेह नमस्कार🙏

"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेखमालेच्या आठव्या पर्वातील अंतिम भाग अर्थात 200 वा भाग नुकताच हातावेगळा झाला. पहिल्या सात पर्वांसारखेच हे आठवे पर्व ही अतिशय यशस्वी ठरले. त्यास वाचक मित्रांनी उदंड प्रतिसाद दिला. भारतासह 19 देशातील एकूण 49000+ वाचकांच्या भेटी आणि 262 फॉलोअर्स मिळाले. ही बाब माझ्यासाठी सुखावह आहे. 

मागील वर्षी जून महिन्यात "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेखमालेच्या सातव्या पर्वाचा अंतिम भाग प्रकाशित केला होता. तद्नंतर काही नैमित्तिक भागांचे लेखनही केले. पण, सलग लेखन करणे जमले नाही. "पुन्हा लेखनाची सुरुवात करावी." असे मनोमन वाटू लागले. पण, लिखाणाचा दुवा सापडत नव्हता. अशा परिस्थितीत बरेच महिने गेले. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आणि पुन्हा एकदा 'लॉकडाऊन' झाले. आता काय करायचं ? हा विचार मनात रुंजी घालू लागला. 

दि. 22 एप्रिल रोजी झी मराठी या वाहिनीवर 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय विनोदी मालिकेचा प्रोमो पाहण्यात आला. 24 एप्रिल हा सचिन तेंडुलकर याचा जन्मदिवस. या निमित्ताने 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर विशेष कार्यक्रम होणार होता आणि क्षणातच मला आठव्या पर्वाच्या लेखनाचा दुवा ही मिळाला आणि त्याचाच वाढदिनी शुभारंभ करण्याचं निश्चित केलं.

भारतातील काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या जीवनातील संघर्षावर आणि त्यातून मिळणार्‍या प्रेरणेवर हे संपूर्ण पर्व आधारित राहिले. अनेक तरुण-तरुणी कोणत्या तरी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करत असतात. हे कार्य तडीस नेताना अपयश आलं तर, नैराश्य येण्याची दाट शक्यता असते. अशावेळी एखाद्या 'आयडॉल'चा संघर्षशाली प्रवास 'बूस्टर डोस' चे काम करतो. भारत हा क्रिकेटवेडा देश. क्रिकेट खेळ जीव की प्राण असणारे अनेकजण भेटतील. काही क्रिकेटपटू तर तरुणांच्या गळ्यातील 'ताईत' बनले आहेत. 'आयडॉल' बनले आहेत. त्यांच्या इथंवरच्या संघर्षाची आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचा उहापोह या आठव्या पर्वात केला आहे. 

एका उदात्त विचाराने सुरू झालेल्या आठव्या पर्वाचा प्रवास, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाड्यात जाऊन पोहोचला. अनेक नावाजलेल्या समूहांनी याची दखल घेतली आणि त्यांनी "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" चे काही भाग आपल्या व्हाट्सअप समूहावर प्रसारित केले. यामुळेच हे लेखन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्यास मदत झाली. त्याबद्दल या समूहांचा मी शतशः आभारी आहे. 

माझे लेखन सर्वदूर पोहविण्याचे खूप मोठे काम काही मित्रांनी केले आहे. त्यांचेही मनःपूर्वक आभार.

नेहमीप्रमाणेच अनेक वाचकांनी लेखन कौशल्याचे कौतुक केले. काहींनी विचारांना गती मिळाल्याचे कळविले. याच आठव्या पर्वाच्या काळात ब्लॉगला तब्बल 49000 वाचकांनी भेटी दिल्या आहेत. तसेच, 2 लक्ष वाचक भेटींचा टप्पाही याच काळात पूर्ण झाला. हा प्रतिसाद आणि प्रतिक्रियामुळे मला लेखनास ऊर्जा मिळते.

मित्रहो, असेच प्रेम "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" वर आपण सदैव करावे. हीच या निमित्ताने आपणास विनंती. लवकरच एका नव्या विषयासह,नव्या यशवंतांसह नवव्या पर्वात आपल्या भेटीला येईलच. तोपर्यंत नमस्कार.. 

धन्यवाद...




No comments: