Wednesday, March 25, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 126

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 126*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


भारत-पाकिस्तान च्या फाळणीनंतर भारतात आलेल्या एका बारा वर्षाच्या, दुसरी नापास शीख मुलाचा थक्क करणारा हा प्रेरणादायी प्रवास...

भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर एक बारा वर्षाचा शीख मुलगा, आपल्या वडिलांसोबत भारतात आला. फाळणीनंतर भारतात आलेल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागल्याचे, वेगवेगळ्या लेखातून, चित्रपटातून आपणांस माहिती झालेले असेलच. 

स्वतःचा जीव मुठीत घेऊन आलेला तो बारा वर्षाचा, दुसरी नापास मुलगा, पोट भरण्यासाठी पंजाब येथील मानसा रेल्वस्थानकावर रेवड्या आणि डाळ विकण्याचे काम करू लागला. इथे थोडे दिवस काम केल्यानंतर तो पटियाला या ठिकाणी आला. तेथे देखील त्याने पोट भरण्यासाठी लहान-सहान काम केले. 

1951 साली चंदिगड या ठिकाणी आला. खऱ्या अर्थानं चंदीगडला आल्यानंतर त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. या ठिकाणी त्याने केळी विकण्याचा गाडा सुरू केला. हळूहळू फळ विक्रीच्या व्यवसायात त्याचा जम बसू लागला. गरिबीचे चटके सोसल्याने आणि कष्ट करण्याची प्रचंड तयारी असल्याने,त्याने या व्यवसायात भरपूर पैसे मिळविले. तो करोडपती झाला. या व्यवसायाने त्याचे कुटुंब स्थिर झाले. 

1981 सालं त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं सालं. या वर्षी त्याची भेट त्याच्या आजीशी झाली. ती गरीब आणि गरजूंना लंगर (मोफत अन्नदान) द्यायची. आजीच्या या सेवाभावी वृत्तीचा त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडला आणि त्याने त्याच वर्षी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पहिले लंगर दिले. गरीब गरजू लोकांना दिलेल्या लंगरमुळे त्याला प्रचंड मोठे समाधान प्राप्त झाले. ज्याचे आयुष्य अनेक संकटं, दुःख, यातना यांनी भरलेलं होतं, त्याला या लंगरमुळे मोठे समाधान प्राप्त झाले. आणि त्याने दररोज लंगर देण्याचा संकल्प सोडला. 

आज तब्बल 39 वर्षे, वयाच्या 85 व्या वर्षी कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त असतानादेखील, ही व्यक्ती नियमितपणे चंदिगड च्या PGI हॉस्पिटल बाहेर, गरीब, गरजू रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना मोफत लंगर देण्याचे काम अव्याहतपणे करत आहे. त्याच्या या कामामुळे त्याला चंदिगड मधील लोक "लंगरबाबा" या नावाने हाक मारतात. ते लंगर बाबा म्हणजेच "जगदीशलाल अहुजा" होय

कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, गेली 39 वर्ष अव्याहतपणे लंगरबाबा लंगर देण्याचे काम करत आहेत. ते केवळ स्वतःला मिळणाऱ्या आत्मिक समाधानासाठी. हे समाधान मिळविणे. हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे.ते मिळविण्यासाठीच ते वयाच्या 85 व्या वर्षी देखील नियमित पणे लंगरचे आयोजन करतात. 

लंगरबाबा यांच्या जीवनातून यशस्वी होण्यासाठी मिळणारा बोध म्हणजे सातत्य आणि नियमितपणा होय. याशिवाय, विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी वय आणि पैसा या गोष्टी कुठलाच अडथळा निर्माण करू शकत नाहीत. हेही ध्यानात येते.

आपली अर्ध्याहून अधिक संपत्ती त्यांनी लंगर देण्यात खर्च केलेली आहे. परंतु, ते काम अव्याहतपणे सुरूच आहे. भारत सरकारने लंगरबाबांच्या या अनमोल अशा कार्याची दखल घेऊन त्यांना 2020 सालचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले आहे. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!





No comments: