Saturday, March 28, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 130

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 भाग - 130


जीवनात वाईट अनुभव प्रत्येकाच्याच वाट्याला येत असतात. काही वाईट अनुभव मागे फिरण्यास कारणीभूत ठरतात, तर काही नव्या जोमाने, नव्या उमेदीने आणि दुप्पट वेगाने काम करण्यास प्रेरित करतात. अशा व्यक्तींच्या पुढे काळ सुद्धा नतमस्तक होतो. आजच्या भागात एका सायकल दुरुस्ती करणाऱ्या 80 वर्षाच्या तरुणांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग... 

अयोध्या म्हणजे राम जन्मभूमी. याच जन्मभूमीत 1940 साली, एका मुस्लिम कुटुंबात शरीफ जन्माला आला. नावाप्रमाणेच सभ्य असणारा शरीफ आपल्या कुटुंबियांच्या छत्रछायेखाली लहानाचा मोठा झाला. पोटासाठी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करू लागला. कामविता झाल्याने घरच्यांनी त्याचे दोनाचे चार-हात केले.

लग्नानंतर शरीफ चा संसार अतिशय सुखाचा सुरू झाला. तीन मुलांनी घर भरलं. मुलं मोठी झाली. कमावती झाली. त्यामुळे शरीफ ला आता सुखाचे दिवस आले होते. पण.... शरीफ चे हे सुखाचे दिवस नियतीला मान्य नसावेत. त्यामुळेच खूप मोठं दुःख शरीफच्या वाट्याला आले.

1993 सालची ही घटना. शरीफचा 22 वर्षाचा मुलगा,कामानिमित्त परगावी गेला. एक-दोन दिवस उलटल्यानंतरही तो परत आला नाही. म्हणून, शरीफने शोधाशोध सुरू केली. एका महिन्यानंतर मात्र त्याच्या मृत्यूची बातमी समजली. अज्ञातांनी खून करून,मृतदेह रेल्वे रुळाच्या शेजारी फेकला होता. त्याच्या कपड्यावरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटली. परंतु,पोलिसांनी बेवारस समजून त्यावर अंत्यसंस्कार देखील केले होते.

आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूने शरीफ जितका दुःखी झाला, त्यापेक्षा अधिक दुःख त्याच्या मृतदेहावर आपणांस अंत्यसंस्कार करता आले नाहीत. याचा झाला. 

घडला प्रसंग बाका होता. आपण जिवंत असताना देखील आपल्या मुलावर बेवारस समजून अंत्यसंस्कार करण्यात आले. याची सल मनात घर करुन होती. जी वेळ आपल्या मुलावर आणि आपल्यावर आली, ती वेळ कोणावरही येवू नये. याच भव्य विचारातून, "परिसरातील बेवारस मृतदेहांवर स्वतः अंत्यसंस्कार करण्याचा" एक भव्य विचार जन्माला आला आणि शरीफ ने  हा जगावेगळा संकल्प केला. त्यावेळी शरीफ 53 वर्षांचा होता. आपले वय आणि आर्थिक समस्या या अनेक अडचणींवर मात करत शरीफ आपला संकल्प आज अखेर तडीस नेत आहे.

आजवर तब्बल 3000 पेक्षा जास्त हिंदू आणि 2500 पेक्षा जास्त मुस्लिम बेवारस मृतदेहांवर शरीफने विधिवत अंत्यसंस्कार केलेले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच परिसरातील लोक त्यांना "बेवारस मृतदेहांचा मसिहा" म्हणतात. हा "बेवारस मृतदेहांचा मसिहा" म्हणजेच मोहम्मद शरीफ उर्फ चाचा शरीफ होय.

जे दुःख, ज्या यातना आपल्या वाट्याला आल्या, त्या इतरांच्या वाट्याला येऊ नयेत. बेवारस मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार व्हावेत. केवळ याच उद्दात विचाराने चाचा शरीफ यांनी कामाला सुरुवात केली. ते आज 80 वर्षांचे आहेत आणि त्यांचे कार्य एखाद्या तरुणाप्रमाने आजही सुरूच आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची,कार्याची दखल घेऊन भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 

चाचा शरीफ यांच्या जीवनाचा हा प्रवास पाहिला तर ,एक गोष्ट लक्षात येते की,संकटं,अडचणी, दुःखद प्रसंग व्यक्तीची परिक्षा पाहण्यासाठीच असतात. या काळात थांबला तो संपला. माणसाचा निर्धार ज्यावेळी पक्का असतो, त्यावेळी वय व विकारासारख्या समस्या सुद्धा जवाइतक्या लहान वाटते आणि पर्वतासारखे भव्य कार्य उभे राहते. चाचा शरीफ यांचा निर्धार पक्का होता. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 केवळ दोन किलो वजन असलेल्या,नऊ रोगांनी ग्रासले,अर्धांगवायू सारख्या आजाराने तिचा डावा पाय निकामी झालेल्या आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार डावा पाय कधीच जमिनीवर टेकू न शकणाऱ्या मुलीने आपल्या मेहनतीने, जिद्दीने एक इतिहास रचला. कोण ती यशवंत ?? तिने कोणता इतिहास रचला ?? जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/08/104.html


1 comment:

Unknown said...

Congratulations sir