Thursday, May 6, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 188

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 188*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/188.html

क्रिकेट हा आकड्यांचा खेळ. हेच आकडे विक्रम प्रस्थापित करत असतात. कोणी फलंदाजीत, तर कोणी गोलंदाजीत तर कोणी क्षेत्ररक्षणात विक्रम प्रस्थापित करत असतो. आजवर अनेक क्रिकेटपटूंनी नाना तऱ्हांचे विक्रम प्रस्थापित केले आहेत. खेळलेल्या एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात, तो शून्यावर बाद झाला नाही. त्याने हा एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला. तसेच, 1983 चा विश्वचषक भारताला जिंकून देण्यात त्याने मोलाचा वाटा होता. त्या खेळाडूची ही प्रेरणादायी कथा.


11 ऑगस्ट 1954 रोजी लुधियाना, पंजाब येथे एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची प्रचंड आवड. त्याच्या आवडीने पुढे जाऊन, त्याचे भवितव्य घडवले. शालेय जीवनात त्याने अनेक स्पर्धेत सहभाग घेतला. आपल्या खेळीने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. यामुळेच त्याची निवड पंजाब राज्याच्या क्रिकेट संघात झाली. पंजाबसाठी खेळताना त्याने अनेक दमदार कामगिरी केल्या. 1977-78 मध्ये दुलिप ट्रॉफीत उत्तर विभागाकडून खेळताना दक्षिण विभागाविरुद्ध 173 धावांची मोठी खेळी होती. ज्यामुळे त्याच्या राष्ट्रीय संघातील निवडीची दारे खुली झाली. 1978 साली वयाच्या 24 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात तर,1979 साली कसोटीत संघात त्याची निवड झाली. मधल्या फळीचा फलंदाज म्हणून त्याने अनेक उपयुक्त खेळ्या केल्या. यामुळे, त्याची निवड 1983 सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी झाली.


विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिलाच सामना वेस्टइंडीज या सलग दोन वेळच्या विजेत्या संघासोबत पडली. 76 धावांत 3 बाद असे भारताचे धावफलक होते. अशा कठीण प्रसंगी तो मैदानात उतरला. सामन्याची सर्व सुत्रे हाती घेतली. त्याने एका बाजूने खिंड लढविली. 89 धावांची निर्णायक खेळी केली. ज्यामुळे भारताने 262 पर्यंत मजल तर मारलीच, शिवाय हा सामना भारताने जिंकून विजयी सलामी दिली. या सामन्याचा तो नायक ठरला. यानंतर अनेक महत्वपूर्ण खेळी करून त्याने भारताची विजयाची बिकट वाट सोपी केली. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत त्याने एकूण 240 धावांची खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघ विश्वविजेता होऊ शकला. 1983 चा विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणारा तो खेळाडू म्हणजेच यशपाल शर्मा होय. 


यशपाल शर्मा यांचा आजवरचा प्रवास वाचला तर, अनेकांना त्यांचा प्रवास संघर्षमयी वाटणारच नाही. भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशाच्या क्रिकेट संघात अंतिम अकरामध्ये स्थान प्राप्त करणे. ही सोपी गोष्ट नाही. यासाठी कोणताही वशिला उपयोगी पडत नाही.अंगी कौशल्यच असावे लागते आणि हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी सरावाची नितांत गरज असते. हा सराव करण्यासाठी शर्मा यांनी दिलेला वेळ, केलेले परिश्रम याबाबी विचारात घेणे गरजेचे आहे. शेवटी कष्टाशिवाय यश मिळत नाही. हेच सत्य आहे.


यशपाल शर्मा यांनी भारतासाठी 42 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये ते एकदाही शून्यावर बाद झाले नाहीत. हा एक विक्रमच आहे. असा विक्रम करणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत.


🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*



No comments: