🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 72*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
*मार्च 2015 साली एका महिलेला भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा पुरस्कार दिला. सर्वात कमी वयात हा मानाचा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच महिला ठरली. एवढ्या कमी वयात तिला हा पुरस्कार का देण्यात आला असावा ? असा कोणता पराक्रम तिने केला ? पद्मश्री पुरस्कार मिळवणारी ती तरुणी कोण ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग.*
5 जुलै 1995 रोजी हैदराबाद येथे तिचा जन्म झाला. आई आणि वडील दोघेही हॉलीबॉल चे प्रसिद्ध खेळाडू होते. तिच्या वडिलांना मानाचा अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तिच्या रक्तातच खेळाप्रती विशेष आवड होती. तिला हॉलीबॉल आवडायचे. पण, एका कार्यक्रमात पी. गोपीचंद यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होत होता. हा समारंभ पाहण्यासाठी ती उपस्थित होती. त्यावेळी तिचे वय सहा ते सात वर्षे असावे. त्या पुरस्कार समारंभाचा तिच्यावर खुप मोठा प्रभाव पडला आणि तिने बॅडमिंटन हा खेळ निवडला. त्यालाच आपले साध्य बनविले. वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. वयाच्या 8 वर्षापासूनच तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. तिचा पहिला संघर्ष म्हणजे प्रवास. ती ज्या ठिकाणी राहायची तेथून, तिचे प्रशिक्षण स्थळ 56 किलोमीटर इतके दूर होते. इतके अंतर पार करून, ती दररोज प्रशिक्षणस्थळी पोहोचायची. तेही अगदी वेळेत.
2004 साली पी गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली, वयाच्या नवव्या वर्षीच, तिने दहा वर्षाखालील एक टूर्नामेंट जिंकली. हा तिच्या आयुष्यातला पहिलाच विजय होता. इथून पुढे तिच्या विजयाची कमान चढतीच राहिली. सन 2009 ला तिने कनिष्ठ आशियाई बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत कास्य पदक पटकावलं आणि साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतलं.
ऑलिंपिकमध्ये देशासाठी पदक मिळवणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्नं असतं. तसे ते तिचे ही होतंच. 2016 साली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ती फायनलमध्ये पोहोचली. पण, सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. *ऑलम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये रौप्य पदक मिळवणारी, ती पहिली भारतीय महिला बनली. ती फर्स्ट लेडी म्हणजेच पी.व्ही.सिंधू होय.*
*सिंधूच्या व्यक्तिमत्त्वाची एक खास गोष्ट म्हणजे, ती कधीच हार मानत नाही. ती सदैव प्रयत्न करत राहते. 56 किमी अंतरावर असलेल्या प्रशिक्षण स्थळी,ती अगदी वेळेत दाखल व्हायची. या प्रसंगावरून खेळाप्रतीचं, तिचं समर्पण लक्षात येतं. अगदी लहान वयातच, तिनं आपलं ध्येय निश्चित केलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी, ती तेंव्हापासूनच खडतर श्रम करत आली होती. त्यामुळेच, ती अगदी कमी कालावधीत यशाच्या शिखरावर पोहोचू शकली. आपलं ध्येय निश्चित करणं आणि त्यासाठी सर्वस्व अर्पण करणं. हाच बोध आपल्याला सिंधूच्या जीवनप्रवासातून मिळतो. 2015 साली भारत सरकारने, पद्मश्री हा किताब देऊन, सिंधूचा गौरव केला आहे. हा किताब मिळवणारी ती सर्वात तरुण महिला ठरली. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.*
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!
No comments:
Post a Comment