Wednesday, November 21, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 71

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 71*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*सन 2000 सिडनी ऑलम्पिकमध्ये,कर्णम मल्लेश्वरी ने वेटलिफ्टिंग मध्ये ब्राँझ मेडल मिळवले. ते ऑलम्पिकमध्ये भारतीय महिलेने मिळवलेले पहिलेच पदक होते. तिने मिळवलेल्या पदकाचा खूप मोठा परिणाम हरियाणातील एका व्यक्तीवर झाला. त्याने विचार केला, "जर कर्णम मल्लेश्वरीसारखी एक मुलगी पदक जिंकू शकते, तर माझी ही मुलगीदेखील पदक जिंकू शकते." असा विचार ज्या व्यक्तीने केला, त्याच्या मुलीने त्याचे स्वप्नं पूर्ण केले का? ती मुलगी कोण? जाणून घेऊ आजच्या भागात.चला तर मग...*

हरियाणा राज्यातील, भिवानी जिल्ह्यातील बिलाली एक छोटसं गाव. या गावात मुलींचं जन्माला येणं, एक शापच मानलं जायचं. मुलींचा जन्म झाल्यावर आनंद होण्याऐवजी दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखी अवस्था त्या गावातल्यांची व्हायची. एवढंच नाही तर, मुलींना शाळेत जाण्यावर मनाई होती. अशा परिस्थितीत 15 डिसेंबर 1988 रोजी त्या गावात एका मुलीचा जन्म झाला. आजही आपल्या देशात मुलांच्या जन्माची अपेक्षा करणारी अनेक कुटुंब आहेत. त्यांपैकीच एका कुटुंबात या मुलीचा जन्म झाला. या कुटुंबात जन्माला येणारी ती पहिलीच. पण, मुलाच्या अपेक्षेने तिच्या आई वडिलांनी आणखी तीन मुलींना जन्म दिला. तिचे वडील आपल्या काळातील, एक प्रसिद्ध पैलवान  आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक होते. 

सन 2000 सिडनी ऑलम्पिकमध्ये, कर्णम मल्लेश्वरीने, वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझ मेडल मिळवले. आपलीही मुलगी असा पराक्रम करू शकेल. असा विश्वास मनी बाळगून वडिलांनी आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. जे वय भातुकली खेळण्याचे नटण्या-मुरडण्याचे होतं, त्या वयात तिला जोर बैठका आणि व्यायाम करावा लागे. तालमीमध्ये तासन् तास कसरत करावी लागायची. तालमीत असणाऱ्या मुलांसोबत कुस्ती खेळावी लागायची. ज्या गावात मुलींच्या शिक्षणावर बंदी होती. त्या गावात ती कुस्ती खेळत होती. यामुळे तिला खूप टीकांना सामोरे जावे लागले. खूप बोल ऐकून घ्यावे लागले. ती कुस्ती खेळायची म्हणून, ती बिघडली आहे. असा समज गावातील इतर पालकांनी आपल्या मुलींवर बिंबवून, तिच्याशी बोलणे, खेळणे बंद करून एक प्रकारे तिला वाळीत टाकले. पण, तिने आणि तिच्या कुटुंबाने याकडे दुर्लक्ष करून आपले संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रित केले.

जर हेतू मजबूत असेल आणि तो पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. नेमकं हेच तिच्या बाबतीत घडलं. तिच्या प्रयत्नांना यश आलं. सन 2009 साली राष्ट्रकुल कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. *सन 2010 साली दिल्लीमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 55 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकले. असा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. ती फर्स्ट लेडी म्हणजेच गीता फोगट होय.*

*गीताचा जन्म ज्या बिलाली गावात झाला, ते सामान्य आणि पुरातनवादी विचारांचा पगडा असलेलं गाव होतं. बिलाली गावात मुलींनी जन्म घेण्यापूर्वीच त्यांची हत्या केली जायची. जरी एखाद्या मुलीचा जन्म झाला तरी, आनंदाऐवजी दुःखचं व्हायचे. मुलींना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. अशा गावात जन्म घेऊन सुद्धा गीताने केलेला पराक्रम म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल. गीताच्या पराक्रमानंतर बिलाली आणि हरियाणातील हजारो गावे बदलली आहेत. तेथील लोकांचे विचारही बदलले आहेत. आता मुलीच्या जन्माचे दुःख न करता,तेथील लोक आनंद साजरा करून स्वागत करत आहेत. मुलींना मुलांसारखे स्वातंत्र्य मिळाले आहे. या सर्वाचे श्रेय गीता फोगट यांना जाते. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: