Monday, May 3, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 186

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 186*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/186.html


1983 चे विश्वचषक जिंकून देण्यात, मोलाचा वाटा असणाऱ्या एका खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...


20 मार्च 1951 रोजी अमृतसर पंजाब येथे मडीपा चा जन्म झाला. त्याचे वडील मिठाईचे दुकान चालवायचे. तो दुकानातील छोटी मोठी कामे करायचा. लहानपणापासूनच त्याला खेळाची प्रचंड आवड. क्रिकेट त्याचा जीव की प्राण. दररोज सकाळी 7 वाजता तो क्रिकेट खेळायला मैदानावर जायचा. भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्नं त्यानं पाहिलं. यासाठी तो जीवापाड मेहनत करत होता.


शालेय जीवनात अनेक स्पर्धांमध्ये मडीपाने आपले कौशल्य दाखविले. त्याच्या खेळीने त्याची निवड पंजाब संघात झाली. मडीपाने सुरुवातीला पंजाब आणि नंतर दिल्लीकडून खेळत प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने दर्जेदार कामगिरी केली. याचं कामगिरीच्या जोरावर त्याची निवड भारतीय संघात झाली आणि त्याचे स्वप्नं पूर्णत्वास आले. 1974 साली इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. यानंतर तो भारतीय संघाचा अविभाज्य घटकच बनला. अनेक सामने कधी चेंडूच्या तर कधी बॅटच्या साह्याने भारताला जिंकून दिले.


1983 च्या विश्वचषकात त्याने अविस्मणीय कामगिरी केली. यामुळे भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला. अंतिम सामन्यात भारताची गाठ, दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या वेस्टइंडिज संघाशी होती. भारताने प्रथम फलंदाजी करत 184 धावांचे आव्हान वेस्टइंडीज समोर ठेवले. व्हीव रिचर्ड्सने मडीपाच्या एका षटकात 3 चौकार लगावले होते. त्यामुळे कर्णधार कपिल, काहीही केल्या, त्याला पुढील षटक देण्यास तयार नव्हता. मडीपा एक षटक देण्याची वारंवार विनंती करत होता. बराच वेळ मैदानावर विचारविनिमय सुरू होता. सरतेशेवटी कपिल राजी झाले. मडीपाने आपले संपूर्ण कसब पणाला लावले आणि त्याच षटकात व्हीव रिचर्ड्स ला बाद करून सामन्याचे संपूर्ण चित्रच पालटवले. या सामन्यात मडीपाने 3 बळी घेतले आणि भारताने विश्वचषक जिंकला. भारताला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणारा तो मडीपा म्हणजेच मदनलाल होय. 


ध्येय साध्य करताना एखाद्या प्रयत्नात अपयश आलं तर, आत्मविश्वास गमावण्याची शक्यता असते. अशा परीक्षेच्या काळात वारंवार प्रयत्न करत राहिल्याने संकटांचा आत्मविश्वास ढिला होतो. ते ध्येयाच्या मार्गातून बाजूला होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो. अंतिम सामन्यात मदनलाल यांनी हेच केलं. म्हणून, ते आपले ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकले.


मदनलाल यांच्या क्रिकेटमधील भरीव योगदानाबद्दल 1989 साली अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 


मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*



No comments: