Monday, May 3, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 185

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 185*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/185.html


1983 चं विश्वचषक भारताने जिंकलं. या विजयाचं सर्वाधिक श्रेय कपिल देव, मोहिंदर अमरनाथ आणि मदनलाल यांना दिलं जातं. पण, या संघात असा एक खेळाडू होता, ज्याने दिलेल्या योगदानामुळं भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचू शकला आणि विश्वचषक जिंकू शकला. या विजयाचं श्रेय त्याला फारसं मिळालं नाही. त्या खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...


19 जुलै 1955 रोजी बंगळुरू येथे एका अँग्लो इंडियन कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड. ही आवड त्याने जपली. 


शालेय जीवनात अनेक खेळांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. एकदा तर भाला फेकण्याचा राष्ट्रीय विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केला. तसेच, फुटबॉल आणि हॉकीमध्येही त्याने शाळेचे प्रतिनिधित्व केले. यासोबतच त्याला क्रिकेटची ही प्रचंड आवड होती. तो अनेक खेळात पारंगत. तेंव्हा कोणता खेळ निवडायचा ? हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. 


जेंव्हा आपल्या समोर अनेक पर्याय असतात, तेंव्हा उत्तम असणारा एकच पर्याय आपल्यास निवडावा लागतो किंवा निवडलेला पर्याय उत्तम ठरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्याने समोर असणाऱ्या अनेक पर्यायापैकी एक पर्याय क्रिकेट निवडलं.


शालेय क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटक संघात त्याची निवड झाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने दर्जेदार खेळी केली. यामुळेच, त्यांची निवड भारतीय क्रिकेट संघात झाली. 1979 साली पाकिस्तानविरुद्ध च्या कसोटी सामन्यात त्याची निवड झाली आणि भारताकडून क्रिकेट खेळणारा तो पहिलाच अँग्लो इंडियन ठरला.


क्रिकेटमधील आजवरच्या कामगिरीच्या जोरावर 1983 च्या विश्व चषक स्पर्धेसाठी त्याची निवड अंतिम संघात झाली. या स्पर्धेत त्याने जीवाचे रान केले. अनेक सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. परिणामी, भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला. क्लाइव लॉयड सारख्या मातब्बर खेळाडूला त्याने बाद केले आणि अंतिम सामना आपल्याकडे खेचून घेतला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक तब्बल 18 खेळाडू बाद केले. भारताने विश्व चषक जिंकला. सर्वाधिक 18 बळी घेणारा आणि भारताला विश्वचषक जिंकून देणारा, तो पहिला अँग्लो इंडियन खेळाडू म्हणजेच रॉजर बिन्नी होय. 


भारताला विश्वचषक जिंकून देण्याचं श्रेय रॉजर बिन्नी यांना मिळालं नाही. याचा अर्थ त्यांना यश मिळालंच नाही. असा होत नाही. त्यांनी केलेली कामगिरी नजरेआड करून चालणार नाही. म्हणून, केलेल्या कामचं श्रेय कोणी देवो, अथवा न देवो. आपण आपलं काम करत राहायला हवं. 


2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात 19 वर्षाखालील संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. या संघाचे प्रशिक्षक रॉजर बिन्नी होते. भारताला तब्बल दोन विश्वचषक जिंकून देण्यात बिन्नी यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.


मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*



No comments: