Sunday, May 2, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 184

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 184*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/184.html


1983 च्या वर्ल्ड कपमधील झिम्बांबे विरुद्ध कपिल देव यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी आजही सर्वांच्या स्मरणात असेल. 17/5 असे भारताचे धावफलक होते. या कठीण प्रसंगात कपिलदेव यांच्यासोबत एक फलंदाज दुसऱ्या बाजूने उभा होता."तुम्ही जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहात. सध्याची स्थिती 'करो या मरो' सारखी आहे आणि आपल्याला मारूनच मारायचं आहे."असे सांगून त्यांना प्रेरित करत होता. कपिल देव यांनी या सामन्यात 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली आणि हा सामना जिंकून भारताने सेमी फायनल सामन्यात प्रवेश केला. 1983 चे विश्वचषक जिंकण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या एका खेळाडूचा हा प्रेरणादायी प्रवास...

29 डिसेंबर 1949 मद्रास (सध्याच्या चेन्नई) मध्ये किरी चा जन्म झाला. वडील एक सरकारी कर्मचारी होते. किरी ज्या परिसरात राहायचा, तेथे एक क्रिकेटवेडा इसम राहायचा. तो परिसरातील मुलांना एकत्र करून क्रिकेट खेळायचा. एकेदिवशी असाच क्रिकेट खेळण्यासाठी मुलांना त्याने जमा केले. 10-11 वर्षाच्या किरीला त्याने विकेट किपर ची जबाबदारी दिली. यष्टिरक्षणाची कोणताच अनुभव नसलेल्या किरीने जवळ पडलेल्या विटा उचलून चेंडू अडविण्याचे काम केले. हा किरीचा क्रिकेट खेळण्याचा पहिला अनुभव. यानंतर त्याला या खेळाची आवड निर्माण झाली. 

1967 साली किरीची निवड इंग्लंड मधील शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी झाली. या स्पर्धतील दमदार कामगिरीमुळे त्याची निवड तत्कालीन मैसूर सध्याच्या कर्नाटक संघात प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी झाली. प्रथम श्रेणी क्रिकेट मधील सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर 1971 साली त्याची निवड भारतीय क्रिकेट संघात अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून झाली. 1976 साली न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला पहिल्यांदा संधी मिळाली. पहिला सामन्यात फारशी कामगिरी करता आली नाही. पण, दुसऱ्या सामन्यात 6 झेल पकडून एका विश्व विक्रमाशी त्याने बरोबरी केली. 

1983 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम संघात स्थान मिळविण्यात तो यशस्वी झाला. मिळालेल्या संधीचं सोनं केलं. झिम्बांबे विरुद्धच्या सामन्यात कपिल देव सोबत नवव्या विकेटसाठी 126 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिलाच शिवाय, अंतिम सामना जिंकून विजेतेपद मिळविण्यातही त्याने मोलाचा हातभार लावला. 1983 चे विश्वचषक जिंकण्यात मोलाचा वाटा असणारा 'किरी म्हणजेच सैयद मुजतबा हुसैन किरमानी' होय. 

किरमानी यांनी क्रिकेट कारकीर्दीत अनेक चढउतार अनुभवले आहेत. अनेकदा संघातून वगळण्यातही आले. भारतीय संघात निवड होऊनही, पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी त्यांना पाच वर्षे वाट पाहावी लागली. पण, निराश न होता, ते प्रयत्न करत राहिले. पराकोटीचा संयम होता. त्यांच्या प्रयत्नात सातत्य होते. 

किरमानी यांना 1983 च्या विश्व चषक स्पर्धेत "सर्वोत्तम यष्टिरक्षक" म्हणून गौरविण्यात आले. शिवाय, भारत सरकार ने 1982 साली "पद्मश्री" पुरस्काराने सम्मानित केले आहे. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत.

मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*



No comments: