Saturday, May 1, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 183

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 183*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


25 जून 1983 हा भारतीय क्रिकेट इतिहासातील अत्यंत अविस्मरणीय दिवस. याच दिवशी भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने जोरदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या एका दृढ निश्चयी खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...


24 सप्टेंबर 1950 रोजी एका क्रिकेट खेळणाऱ्या कुटुबांत जिमीचा जन्म झाला. त्याच्या वडिलांनी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले होते. ते स्वातंत्र्यानंतर भारतीय संघाचे पहिले कर्णधार होते.


क्रिकेटचे वारसा घरातूनच मिळाल्याने, जिमीने भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्नं उरी बाळगले. स्वप्नपूर्तीसाठी तो जीवतोड मेहनत करू लागला. विविध स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर डिसेंबर 1969 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली. जिमी ने एकापेक्षा एक सरस कामगिरी करत बापाचा वारसा पुढे चालविला. भारतीय संघातील आपले स्थान भक्कम रहावे. यासाठी तो अधिकाधिक धडपड करू लागला. आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करू लागला. 


1982 साली भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला. इंडिज चे गोलंदाज आपल्या उंचीचा वापर करून शॉर्ट पीच बॉल टाकायचे. या माऱ्यापुढे भारतीय फलंदजांचा टिकाव लागत नव्हता. जिमीची शॉर्ट पीच बॉल न भिरकावता येण्याची समस्या जगजाहीर होती. मायकल होल्डिंग्स या इंडिज च्या गोलंदाजाने जिमीच्या याच वीक पॉईंटचा फायदा उठवायचे ठरवले. त्यांने पहिलाच चेंडू फेकला, जो थेट जिमीच्या यांच्या हनुवटीवर येऊन आदळला.त्याला मोठी दुखापत झाली. जोराचा रक्तस्त्राव सुरू झाला. इस्पितळात नेले. हनुवटीला सहा टाके पडले. अर्ध्या तासाने जिमी ड्रेसिंग रूममध्ये परतला. तोच भारताने एक विकेट गमावली. सततच्या खराब प्रदर्शनामुळे जिमी ला टीम बाहेर जावे लागले होते. यावेळेस उत्तम कामगिरी करून भारताला जिंकवू. असे जिमीला वाटले होते. पण, अचानक झालेल्या दुखापतीने त्याच्या या स्वप्नावर पाणी फेरले. ड्रेसिंग रूम मध्ये बसलेल्या जिमीला मनाशी केलेला निश्चय आठवत होता. दृढनिश्चयाने तो बॅट घेऊन मैदानावर आला.होल्डिंग्सने यावेळीही शॉर्ट पीच बॉल टाकला. जिमी ने मात्र पूल शॉट मारला आणि चेंडूला सीमापार केले. या सामन्यात 80 धावा करून स्वतःला सिद्ध केले. तो दृढनिश्चयी जिमी म्हणजेच महिंदर अमरनाथ होय. 


'डर के आगे जीत है !' हा एक सुप्रसिद्ध, अर्थपूर्ण आणि महिंदर अमरनाथ यांच्या कर्तबगारीला साजेसा असा संवाद. जीवनातील विविध प्रसंगांची रचना व्यक्तीची परीक्षा घेण्यासाठी झालेली असते. या परीक्षेत तुम्ही कशी भूमिका घेता ? यावर यश अवलंबून असतं. सामोरा जाणारा यशस्वी होतो. पण, माघारी परतणारा प्रवाहातून बाजूला पडतो. 

महिंदर अमरनाथ जीवनातील कठीण प्रसंगाना निश्चयाने तोंड देत राहिले. म्हणून, ते यशाच्या शिखरावर विराजमान होऊ शकले.

मोहिंदर अमरनाथ यांनी 1983 च्या विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वाची कामगिरी केली होती. उपांत्य सामन्यात त्यांनी 46 धावा करून, 2 विकेट्सही घेतल्या. शिवाय, वेस्ट इंडिज विरुद्धच्या अंतिम सामन्यात 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि 3 विकेट्सही घेतल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे ते उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामनावीरही पुरस्कार होते.


बीसीसीआयने त्यांची क्रिकेट क्षेत्रातील कामगिरी पाहून 2009 साली त्यांना 'सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित केले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.


मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com




*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*

No comments: