Thursday, April 29, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 182

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 182*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा ही सध्या भारतीय क्रिकेटची अशी काही नावे आहेत की, जी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच अनेक जाहिरातीमध्ये ते चमकत आहेत. पण, भारतीय क्रिकेट मधील सर्वप्रथम जाहिरात करणारा खेळाडू कोण हे आपणांस ठाऊक आहे का ? त्या खेळाडूबद्दल तुम्हाला माहिती आहे काय ? त्या लोकप्रिय खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...

31 ऑक्टोबर 1895 रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे त्याचा जन्म झाला. त्याचे आजोबा वकील. त्याचबरोबर ते अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये सक्रिय होते. घराची स्थिती उत्तम. अगदी बालवयातच त्याने क्रिकेटर होण्याचे स्वप्नं पाहिलं. वेळोवेळी तशी संधीही मिळत गेली.

1916 साली वयाच्या 21व्या वर्षी त्याला विद्यालयाच्या संघातून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याच्या दर्जेदार कामगिरीनं त्याचा आत्मविश्वास दुणावला. पुढे अनेक सामन्यात त्याने आपले कौशल्य पणाला लावले. स्वतःला सिद्ध केले. यामुळेच वयाच्या 37 व्या वर्षी त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. 1932 साली भारताने आपला पहिला कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध त्याच्याच नेतृत्वाखाली खेळला. कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू बनला. 

या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याचा हाताला जबर दुखापत झाली. खेळता येणं अशक्यच होतं.  असे असतानाही तो पहिल्या डावात खेळलाच. त्याने 40 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या सामन्यात भारताचा पराभव झाला. पण, या खेळीमुळे सर्वत्र त्याचे कौतुक झाले. त्याच वर्षी इंग्लंड मधील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने सहभाग नोंदवत आपले कसब दाखविले. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याला 1933 साली 'विस्डेन प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारा तो केवळ चौथाच भारतीय ठरला. तो खेळाडू म्हणजेच 'कोट्टारी कनकैया अर्थात सी.के.नायडू' होय.

1936 साली नायडू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत ते खेळतच राहिले. येथे त्यांनी धमाकेदार कामगिरी केली. प्रचंड लोकप्रियता मिळविली. यामुळेच 1941 साली नायडू यांनी 'बाथगेट लिवर टॉनिक' या कंपनीसाठी जाहिरात केली. जाहिरात करणारे ते पहिलेच भारतीय ठरले.

"बच्चा काबिल बनो, काबिल ! कामयाबी तो साली झक मार के पीछे भागेगी !" हा थ्री इडियट चित्रपटातील एक छोटासा पण, मोठा अर्थपूर्ण संवाद. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी 'लायक' बनलं, तरच 'नायक' होता येतं. यश, पैसा, प्रसिध्दी आपोआप प्राप्त होते. पण, 'लायक' होण्यासाठी जीवापाड कष्ट घ्यावे लागतात. तिथं कारणं सांगून चालणार नाही. कसोटी संघात स्थान मिळवताना, पहिल्या कर्णधारपदाची जबाबदारी घेताना नायडू यांनी वयाचं, दुखपतीचं कारण सांगितलं नाही. स्वप्नं पूर्तीसाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली. म्हणूनच, ते कामगिरीच्या बळावर यशस्वी अन् लोकप्रिय होऊ शकले. 

सी.के.नायडू यांच्या क्रिकेटमधील सेवेबद्दल 1956 साली भारत सरकारने 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*



No comments: